मुंबई : शालार्थ आय डी घोटाळ्यात शिक्षकांचा काही दोष नाही, उलट ज्या शाळा संचालकांनी बदमाशी केली आहे, त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे . या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी या संपूर्ण प्रकरणाबद्दल चर्चा केली असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नागपुरात नियोजन भवन येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते. शालार्थ आयडी प्रकरणी शिक्षकांना दिलासा देत बावनकुळे म्हणाले की, शाळा संचालकांनी शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या आधी त्यांना प्रलोभन देत खोट्या पद्धतीने शालार्थ आय डी तयार केले आणि त्यांची नियुक्ती केली आहे. अनेक शिक्षकांनी तर नोकरीसाठी कर्ज घेतले आहे. मात्र शाळा संचालकांनी गैरव्यवहार केले आहेत. त्यात शिक्षकांचा काहीही दोष नाही. शासन त्याना वाऱ्यावर सोडणार नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करून ठोस तोडगा काढला जाईल. उलट ज्या शाळा संचालकांनी बदमाशी केली आहे त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे. या संदर्भात पुन्हा एकदा शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या सोबत चर्चा केली जाईल असेही बावनकुळे म्हणाले.
पूरग्रस्त भागात तातडीची मदत पोहोचवली जात आहे.
राज्यात विविध ठिकाणी निर्माण झालेल्या पूरस्थितीवर राज्य सरकार सर्वतोपरी लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू आहे. ज्या भागात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे, त्या ठिकाणी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. पंचनामे सुरू असून जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय मुंबईतील वॉर रूम मधून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून आवश्यक तातडीची मदत पोहोचवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींवर टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, मतदार यादीचे पुनर्निरीक्षण ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवण्याची वेळ असताना काँग्रेसने काहीच कारवाई केली नाही. मात्र आठ महिन्यांनंतर राहुल गांधी यांनी "वेड्यासारखी वक्तव्ये" करणे योग्य नाही. काँग्रेस पक्ष लयाला जात असताना विरोधकांकडून निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर सतत आरोप केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तेव्हा ईव्हीएम चांगले, पण पराभव झाला की मशीन खराब असे म्हणणे चुकीचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. आक्षेप घ्यायचे असतील तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान घ्यावेत, परंतु पराभवानंतर पुन्हा मतदार यादीवर दोषारोप करणे योग्य नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
विकसित नागपूरचे स्वप्न
२०२९ पर्यंत विकसित नागपूर हे आमचे स्वप्न असून विकसित महाराष्ट्रासोबत विकसित नागपूर साकार करण्यासाठी तीन टप्प्यात नियोजन करण्यात येईल. बचत गटाच्या माध्यमातून पशुधन विकासासह विविध योजना राबवल्या जातील. जिल्हा नियोजन समितीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही त्यांनी नमूद केल