मुंबई: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापेक्षा सांगलीतील मानवनिर्मित सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यातील चितळ आणि सांबराच्या कळपातील वैयक्तिक प्राण्यांची संख्या आणि अधिवासाची घनता जास्त असल्याचे अभ्यासाअंती समोर आले (Sagareshwar sambar deer). कोल्हापूर वन्यजीव वन विभागाने 'वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट'च्या (डब्लूसीटी) तांत्रिक सहाय्याने सागरेश्वर अभयारण्यातील तृणभक्षी प्राण्यांवर सखोल अभ्यास केला (Sagareshwar sambar deer). या अभ्यासाअंती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी सागरेश्वर अभयारण्य महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे समोर आले आहे. (Sagareshwar sambar deer)
सांगली शहरापासून साधारण ५० किमी अंतरावर सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे. या अभयारण्याचे क्षेत्रफळ हे १०.८७ चौ.किमी असून एक लहान अभायरण्य आहे. सागरेश्वरच्या सभोवतालच्या टेकड्या पूर्वी डोंगराळ खुल्या गवता होत्या. ज्याठिकाणी गुरेढोरे मोठ्या प्रमाणात चरत असत. १९७० च्या दशकाच्या अखेरीस अनियंत्रित गुरे चराईमुळे येथील मोठे सस्तन प्राणी जवळजवळ नाहीसे झाले. त्यानंतर, १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला स्थानिक पर्यावरणवादी डी.एम. मोहिते यांनी या क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या प्रयत्नामुळे १९८५ साली हा परिसर वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित झाला. सद्यपरिस्थितीत हे वन्यजीव अभयारण्य पूर्व आणि पश्चिम भागात विभागले असून अभयारण्यातील ७५ टक्के क्षेत्राभोवती कुंपन आहे.
कुंपनाअलीकडेच सांबर-चितळ यांसारखे तृणभक्षी प्राणी राहत असल्यामुळे त्यांना संरक्षण मिळाले आहे आणि त्यांची संख्या जोमाने वाढली आहे. याच वाढत्या संख्येचा अभ्यास कोल्हापूर वन्यजीव वन विभागाने डब्लूसीटी संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाअंतर्गत करण्यात आला. या अभ्यासामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि संशोधकांनी अभयारण्यातील सांबर आणि चितळाच्या अधिवासाची घनता प्रामुख्याने अभ्यासली. ज्यामध्ये चितळाच्या अधिवासाची घनता ही प्रति चौरस किलोमीटर मागे ५४.१५ प्राणी आणि सांबराच्या अधिवासाची घनता ही प्रति चौरस किलोमीटर मागे ४९.५० प्राणी एवढी असल्याचे आढळून आले. अभयारण्याच्या पश्चिम भागात सांबर-चितळ आढळले. मात्र, अभयारण्याच्या पूर्व भागात मात्र केवळ सांबर मोठ्या संख्येने सापडले. महत्त्वाचे म्हणजे सागरेश्वर अभयारण्यातील आढळणाऱ्या सांबराच्या कळपात अधिकाधिक १७ सांबर आणि चितळाच्या कळपात अधिकाधिक ४५ चितळ संशोधकांनी नोंदवले. साबराच्या कळपातील प्राण्यांची इतक्या संख्या ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळणाऱ्या सांबरांच्या कळपातही आढळत नसल्याचे 'डब्लूसीटी'चे संशोधक गिरीष पंजाबी यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना अधोरेखित केले. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सांबर आणि चितळ स्थानांतरित करण्याच्या दृष्टीने सागरेश्वर अभयारण्य सक्षम असल्याचे पंजाबी म्हणाले. सागरेश्वर अभयारण्यातील तृणभक्षी प्राण्यांची गणना दरवर्षी आम्ही करत असून यापूर्वी सागरेश्वरमधील सांबरांचे स्थानांतरण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करणार असल्याची माहिती कोल्हापूर वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.
स्थानांतरणासाठी सागरेश्वर सक्षम
सागरेश्वर अभयारण्यात चितळ-सांबर या तृणभक्षी प्राण्यांची आपण अधिवास संवर्धनाच्या माध्यमातून वाढवली आहे. येत्या काही काळात या अभयारण्यामधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण वेळोवेळी सांबर आणि चितळांचे स्थानांतरण करणार आहोत. कारण, आपल्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवायची आहे. यासाठी चांदोली राष्ट्रीय अभयारण्यातील झोळंबी येथे पिंजरे तयार करण्यात आले आहेत. सागरेश्वरमधून तृणभक्षी प्राणी स्थानांतरित करुन घेतल्यास आपल्याला योग्य प्रतीचे तृणभक्षी प्राणी मिळतीलच शिवाय वाघांचा वावर वाढण्यासाठी आवश्यक असणारी तृणभक्षी प्राण्यांची संख्या देखील वाढेल. यापूर्वी देखील आपण सागरेश्वरमधून चितळांचे स्थानांतरण केले असून येत्या काळात कात्रज आणि सोलापूर प्राणी संग्रहालयामधून देखील आपण तृणभक्षी प्राण्यांचे स्थानांतरण करणार आहोत. - तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प