राहुल गांधी पक्ष टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाचा आधार घेतात; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

    18-Aug-2025   
Total Views |

नागपूर : राहुल गांधींना आपले नेतृत्व आणि पक्ष टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाचा आधार घ्यावा लागतो, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. सोमवार, १८ ऑगस्ट रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मतदार यादीचे पुर्नसर्वेक्षण रोजच सुरु असते. यामध्ये रोज मतदारांची नावे समाविष्ट होतात. ही निरंतर प्रक्रिया आहे. पण या मतदार यादीमध्ये कुणाचेही नाव समाविष्ट झाल्यास त्यावर आक्षेप घेण्याकरिता निवडणूक आयोग सर्व पक्षांना नोटीस देते. महाराष्ट्रात सर्वच पक्षांना अशा नोटीस आल्या आहेत. जेव्हा यावर आक्षेप घेण्याची वेळ होती तेव्हा काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्याने आक्षेप घेतला नाही. मतदार यादी अंतिम होईपर्यंत आक्षेप घेतला नाही. परंतू, निवडणूक हरल्यावर आठ महिन्यांनंतर ते आक्षेप घेत आहेत."

"जेव्हा नेतृत्व क्षीण होते, पक्ष लयास जातो तेव्हा दुसऱ्यावर आरोप करून आपली चमडी वाचवता येते. राहुल गांधींना आपले नेतृत्व आणि पक्ष टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाचा आधार घ्यावा लागतो. लोकसभेच्या निवडणूक जिंकले तेव्हा मशीन आणि मतदार यादी चांगली होती. परंतू, विधानसभेत पराभव झाल्यानंतर मशीन आणि मतदार यादी खराब झाली. अजूनही वेळ गेलेली नाही. विधानसभेच्या मतदार यादीवर पुन्हा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आता तुम्ही आक्षेप घेऊन समाधान करून घ्या. अन्यथा उद्या निवडणूका हरल्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राची यादी चुकीची आहे, असे म्हणतील," असा टोलाही त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, "सलग ५०-५० वर्षे तुमचे सरकार राहिले. मनमोहन सिंग यांच्या सरकारपासून ईव्हीएम प्रणाली लागू झाली. सतत ईव्हीएमवर आरोप करून त्यांना यातून काय साध्य करायचे आहे? पक्ष टिकवण्यासाठी देशाची नस समजावी लागते. काँग्रेस पक्षातील लोक रोज पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे कार्यकर्ते सांभाळता येत नसल्याने ते निवडणूक आयोगाला दोष देत आहेत," अशी टीकाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणा
"पावसामुळे झालेल्या प्रत्येक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुढचे तीन दिवस काही भागात रेड अलर्ट आहे. पावसामुळे जे काही नुकसान झाले त्या सर्वांनी नुकसान भरपाई जिल्हाधिकाऱ्यांच्या आपत्ती व्यवस्थापन अकाऊंटमधून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार नुकसान भरपाई देणार आहोत," असेही त्यांनी सांगितले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....