मुंबई : "भाषा हे वाचणारे, बोलणारे आणि लिहिणारेच जगवणार आहेत. बाकी कोणतंही राजकीय आंदोलन भाषेचं काहीही भलं करू शकणार नाही. त्यामुळे एकाच वेळी वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तके प्रकाशित होणं हे चपराकचं एक प्रकारचं साहित्यिक आंदोलनच आहे" असे मत लेखक, नाटककार अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले. चपराक प्रकाशनाच्या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
दि. १७ ऑगस्ट रोजी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवन येथे. चपराक प्रकाशनाच्या सात पुस्तकांच्या प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रमेश शिंदे यांनी लिहिलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र, निवृत्त प्रशासकीय अधिकारी गिरीश गोखले यांचे अरे सरकार सरकार हे आत्मकथन, संदीप वाकचौरे यांची शिक्षणरंग आणि भाषा आणि शिक्षण ही दोन पुस्तके, चंद्रलेखा बेलसरे यांचा ओव्हरटेक हा गूढकथासंग्रह, दीपाली जोगदंड यांचा फन वन हा बालकवितासंग्रह आणि घनश्याम पाटील यांचा धडक बेधडक हा राजकीय लेखसंग्रह प्रकाशित झाला. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अरूण नलावडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर उद्योजक राम कुतवळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अभिराम भडकमकर म्हणाले की "या सगळ्या पुस्तकातील विविधता खूप महत्त्वाची आहे. गेल्या काही दशकात ठरावीक प्रकारचा आशय आणि ठरावीक प्रकारचा विषय असेल आणि तो ठरावीक दृष्टिकोनातून लिहिलेला असेल तरच त्याला साहित्य मानायचा फार चुकीचा पायंडा पडलेला आहे. समीक्षकही ठरावीक प्रकारच्या विषयापलीकडची पुस्तकं ही पुस्तकं म्हणून ग्राह्य धरत नाहीत. अशा मोजपट्ट्या लावण्याचा अनिष्ट पायंडा पडत असताना अनेक विषयांवरील साहित्यिक दालनं उघडण्याची आवश्यकता आहे. ते काम चपराक प्रकाशनसारखी संस्था करत असल्यानं ते साहित्याच्या दृष्टिनं मोलाचं आहे."
ज्येष्ठ अभिनेते अरुण नलवाडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की " समाजासाठी लेखणी सरसावून सामान्य माणसासाठी उभं राहणारे घनश्याम पाटील यांच्यासारखे लेखक आपण जपले पाहिजेत. त्यांच्या खालचा पाया होऊन त्यांना खांद्यावर उचलून घेणं गरजेचं आहे. पुस्तकंच आपल्या राज्याला, देशाला जगवणार आहेत. वाचन हे जगण्याचं अत्यावश्यक साधन झालं पाहिजे. तरच संस्कृती जपली जाईल. त्यातून माणसं उभी राहतील आणि देश पुढे जाईल. त्यासाठी चपराकसारखी प्रकाशनं ताठपणे उभी राहायला हवीत. शरीर संपलं तरी विचार संपत नाहीत, हे सत्य रुजवणार्या अशा प्रकाशनसंस्था जगायलाच हव्यात." राम कुतवळ म्हणाले की ग्राहकांना काय हवं ते त्यानं सांगण्याच्या आधी आपल्याला कळायला हवं, असं व्यवस्थापनशास्त्र सांगतं. वाचकांची गरज अशीच चाणाक्षपणे हेरून चपराकची पुस्तके प्रकाशित होतात. समाजमाध्यमामुळं संभ्रमितपणाचं लेखन सातत्यानं पुढे येत असताना सर्व वयोगटातील वाचकांचा विचार करून त्यांच्यासाठी दरवर्षी शेकडो पुस्तके प्रकाशित करणार्या चपराकनं मराठी भाषेच्या विकासात हातभार लावला आहे.