महाराष्ट्र - तेलंगणा संपर्क तुटला! पोडसा पूल पाण्याखाली

18 Aug 2025 13:03:59

चंद्रपूर : (Podsa bridge) राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार आगमन केले आहे. महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली गेल्यामुळे महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मुसळधार पावसामुळे वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदी दुथडी भरून वाहत असून पुलावरून पाणी वाहू लागले. पोडसा पूल, जो महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडतो, तो पाण्याखाली गेला आहे, ज्यामुळे दोन्ही राज्यांमधील संपर्क तुटला आहे. जिल्हाच्या शेवटचा टोकावर असलेल्या हा पूल दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.

वर्धा नदीला आलेल्या पूरामुळे विरूर-वरुर मार्गासह अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. वर्धा - वैनगंगा नदीकाठावरील हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा पुलावरून वर्धा नदीचे पाणी जात असल्याने, दोन्ही राज्यांमधील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. यासोबतच, चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे.



Powered By Sangraha 9.0