उत्तराखंड विधानसभेत सादर होणार नवे अल्पसंख्यांक शिक्षण विधेयक

18 Aug 2025 17:04:32

नवी दिल्ली : उत्तराखंड मंत्रिमंळाने रविवारी एक महत्त्वाचा निर्णय घेऊन आजपासून (१९ ऑगस्ट) सुरू होणाऱ्या राज्य विधानसभेच्या अधिवेशनात उत्तराखंड अल्पसंख्याक शिक्षण विधेयक २०२५ सादर करण्यास मंजुरी दिली आहे.

उत्तराखंड विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १९ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत गैरसैन येथे होणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचे सरकार शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची तयारी करत आहे. सरकारने १ जुलै २०२६ पासून उत्तराखंड मदरसा शिक्षण मंडळ कायदा, २०१६ आणि उत्तराखंड गैर-सरकारी अरबी आणि फारसी मदरसा मान्यता नियम, २०१९ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी, उत्तराखंड अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था विधेयक २०२५ विधानसभेत सादर केले जाणार आहे.

या विधेयकाअंतर्गत, उत्तराखंड राज्य अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले जाईल, जे मुस्लिम, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी समुदायांनी चालवलेल्या शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रदान करेल. आतापर्यंत फक्त मुस्लिम समुदायाच्या मदरशांना अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा होता, परंतु नवीन विधेयकानंतर, इतर अल्पसंख्याक समुदायांच्या शैक्षणिक संस्थांनाही हा लाभ मिळेल.

विधेयकाची प्रमुख वैशिष्ट्ये

· प्राधिकरणाची स्थापना : उत्तराखंड राज्य अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरणात एक अध्यक्ष आणि ११ सदस्य असतील, जे राज्य सरकारद्वारे नामनिर्देशित केले जातील. अध्यक्षांना १५ वर्षांपेक्षा जास्त अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक असेल.

· मान्यता आवश्यक : सर्व अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना प्राधिकरणाकडून मान्यता मिळणे अनिवार्य असेल.

· शिक्षणाची गुणवत्ता : हा कायदा संस्थांच्या कामकाजात अडथळा आणणार नाही, परंतु शिक्षणाची गुणवत्ता आणि पारदर्शकता सुनिश्चित करेल.

· नोंदणीच्या अटी : संस्थांना सोसायटी कायदा, ट्रस्ट कायदा किंवा कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी करावी लागेल. जमीन, बँक खाती आणि मालमत्ता संस्थेच्या नावावर असाव्यात.

· देखरेख आणि पारदर्शकता : प्राधिकरण उत्तराखंड शालेय शिक्षण मंडळाच्या मानकांनुसार शिक्षण आणि मूल्यांकनाचे निरीक्षण करेल. आर्थिक अनियमितता किंवा सामाजिक सौहार्दाविरुद्धच्या कृतींवर मान्यता रद्द केली जाऊ शकते.

· भाषिक विकास : मान्यताप्राप्त संस्थांमध्ये गुरुमुखी आणि पाली भाषांचा अभ्यास शक्य होईल, ज्यामुळे या भाषांचा विकास होईल.


Powered By Sangraha 9.0