मराठ्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न राष्ट्रव्यापी केलं! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

18 Aug 2025 21:08:16

मुंबई, " नागपूरकर भोसले यांच्या घराण्याचा इतिहास म्हणजे आपल्या राज्याचा प्रेरणादायी आणि समृद्ध वारसा आहे. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे जे स्वप्न पाहिलं होतं. ते पुढे मराठ्यांनी राष्ट्रव्यापी करून दाखवलं व भारतावर एकछत्री अंमल प्रस्थापित केला " असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. " सेना साहेब सुभा " पराक्रम दर्शन या कार्यक्रमात ते बोलत होते.

दि. १८ ऑगस्ट रोजी, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तुसंग्रहलये संचालनालय, सांस्कृतिक कार्य संचालनलय, पु.ल. देशपांडे कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे " सेना साहेब सुभा " पराक्रम दर्शन या कार्यक्रमांतर्गत श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवार प्रदर्शनाचा व लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार, वांद्रे विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारती, श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या संचालक तेजस गर्गे, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी च्या संचालक मीनल जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची शौर्यगाथा सांगणारी एक दृकश्राव्य चित्रफीत प्रेक्षकांना दाखवण्यात आली. त्याचबरोबर श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या तलवारीची प्रतिकृती सदर करून, औपचारिक दृष्ट्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की " हिंदवी स्वराज्याचा प्रति इंग्रजांनी लुटून नेले होते, ते आपल्या महाराष्ट्रात आपण परत मिळवले की गर्वाची गोष्ट आहे. मराठ्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अखंड हिंदुस्तान एकत्रित आणला. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये अश्याच प्रकारे मराठ्यांचे वैभव आम्ही परत आणू" राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार तलवारीच्या परतीचा प्रवास विषद करताना म्हणाले की " श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची तलवार आपण भारतात आणली या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार राहण्याची मला संधी मिळाली ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ज्या तत्परतेने आपण ही तलवार लिलावातून परत मिळवली ही गोष्ट अभिमानास्पद आहे. श्रीमंत राजे रघुजी भोसले हे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी " विरासत से विकास तक" चा विचार आपल्याला दिला आहे. आपल्या संस्कृतीचं परंपरेचे वैभव जतन करून आपण भविष्याची वाटचाल करणार आहोत याच विचाराने राज्याचे सरकार काम करत आहेत. " याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना श्रीमंत राजे रघुजी भोसले यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले म्हणाले की " श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी युद्धामध्ये इंग्रजांवर विजय मिळवला, मात्र नंतरच्या काळात फितुरी व लुटीमुळे ही तलवार इंग्रजांनी परदेशी नेली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ही तलवार मायदेशी आली आहे याचा आम्हाला अभिमान आहे."

श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची तलवार दि. २५ ऑगसट पर्यंत, प्रभादेवीच्या पुलं देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलादालनात, इतिहास प्रेमींना बघायला मिळणार आहे. त्यानंतर ही तलवार नागपूरच्या वस्तुसंग्रहालयाकडे सुपूर्द केली जाईल.

पराक्रमाचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे.

" ओडिषा येथील जगन्नाथ पुरीचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. मात्र औरंगजेबाच्या काळात, त्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मुघलांच्या सत्ताकाळात तिथे भाविकांना अनेक अडचणी आल्या. मात्र, नागपूरकर भोसले यांनी आपल्या सत्ताकाळात मंदिराची व भाविकांची व्यवस्था बघितली, व त्यांच्या सत्तेच्या अंमलानंतर, या ठिकाणी एकही आक्रमण झालं आहे. तो प्रदेश कधीही पुढे मुघलांच्या अधिपत्याखाली गेला नाही. हा नागपूरकर भोसले यांचा समृद्ध इतिहास कुठेतरी हरवला आहे असं वाटतं, हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवा. हा इतिहास पोहोचवण्याचा निमित्त म्हणजे तलवार लोकार्पणाचा हा सोहळा"




Powered By Sangraha 9.0