विषाणूजन्य आजारांचा वाढता धोका

18 Aug 2025 12:04:41

पुणे आणि नाशिक येथील ‘रेस्यू चॅरिटेबल ट्रस्ट’चा वन्यजीव उपचार व पुनर्वसन केंद्रांमध्ये दाखल होणारे भारतीय लांडगे अनेकदा अपघाती दुखापती किंवा जीवघेण्या विषाणूजन्य आजारांनी त्रस्त असतात. काही प्रकरणांमध्ये रस्ते अपघातामुळे लांडग्यांना दुखापत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत लांडग्यांचा मृत्यू विषाणूजन्य आजारांमुळे मोठ्या संख्येने होत आहे. यासाठी कारणीभूत ठरत आहे, ‘कॅनाईन डिस्टेंपर व्हायरस’ (उऊत) आणि काही वेळा रेबीज.

गेल्या तीन वर्षांत किमान १५ भारतीय लांडग्यांचा मृत्यू ‘सीवीडी’मुळे झाला आहे, तर एका लांडग्याला रेबीज झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकरणामध्ये एकसारखा घटक आढळतो, तो म्हणजे लांडग्यांचा भटया कुत्र्यांशी आलेला नियमित संपर्क. हा संपर्क प्रामुख्याने कचरा फेकण्याच्या ठिकाणी किंवा कुक्कुटपालनातील कचरा ज्याठिकाणी फेकला जातो, तिथे होतो. माळरान परिसंस्थेच्या विखंडनामुळे आणि मानवी वस्ती वाढत असल्यामुळे अशी संपर्क क्षेत्र अधिक सामान्य होत आहेत. नैसर्गिक अधिवास कमी झाल्यामुळे लांडग्यांना मानवी वस्तीत असलेल्या भागातून प्रवास करावा लागतो किंवा बरेचदा तिथेच राहावे लागते. ज्यामुळे त्यांचा सवांसर्गजन्य(संसर्गजन्य) आजार पसरवणार्‍या भटया कुत्र्यांशी संपर्क वाढतो.

‘कॅनाईन डिस्टेंपर’ हा एक ‘पॅरामिसोव्हायरस’द्वारे (रिीर्राूुेींर्ळीीी) होणारा आजार आहे. हा आजार शरीरातील अनेक अवयव प्रणालींवर आघात करतो. लांडग्यांमध्ये सुरुवातीला या आजाराची लक्षणे ही श्वसनाची संबंधित असतात. उदा. अनुनासिक स्त्राव(स्राव). त्यानंतर उलटी, अतिसार यांसारखी पाचनतंत्रातील लक्षणे दिसतात आणि अखेरीस मध्यवर्ती मज्जासंस्थेवर आक्रमण होते. या तीव्र लक्षणांनी ग्रासल्यानंतर कंप सुटणे, हालचालींचा समन्वय गमावणे, फिट येणे वा वर्तनात बदल होणे ही अंतिम टप्प्यातील न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसतात. बहुतेक वेळेस लांडगे उपचारासाठी आणले जाईपर्यंत व्हायरसने भरपूर नुकसान केलेले असते. ‘रेस्यू’चे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुष्रुत(सुश्रुत) शिर्भाटे सांगतात की, बहुतेक लांडगे खूप उशिरा दाखल होतात. एकदा न्यूरोलॉजिकल चिन्हे दिसू लागल्यानंतर, ते परिणाम उलटण्यासाठी आम्ही वैद्यकीयदृष्ट्या काहीही करू शकत नाही. अशा विषाणूंच्या साथी वन्य प्रजातींसाठी अत्यंत घातक ठरतात. एका नोंदवलेल्या प्रकरणात, एका विशिष्ट प्रदेशातील १२ भारतीय लांडग्यांची पिल्ले एका पाठोपाठ एक मरण पावली. फक्त शेवटच्या जिवंत पिल्लाची ‘सीवीडी’साठी चाचणी करून पुष्टी करण्यात आली. ही घटना दाखवते की, ‘सीवीडी’ किती वेगाने आणि प्रभावीपणे संपूर्ण कळपाला बाधित करू शकतो. भारतीय लांडग्यांसारख्या आधीच संकटात असलेल्या प्रजातींना या विशेष फटका बसतो.

‘लायसाव्हायरस’मुळे (श्रूीीर्रींर्ळीीी) होणारा रेबीज, हा लांडग्यांना होणारा दुसरा व तितकाच जीवघेणा आजार आहे. याची पुष्टी करणे अजूनच कठीण असते. जर लांडग्यामध्ये ‘फ्युरियस’ प्रकारची लक्षणे (उग्र वर्तन, हल्लेखोर प्रवृत्ती) दिसून आली, तरच याचे निदान होते. मात्र, ‘डम्ब’ प्रकारात जेव्हा प्राणी शांत किंवा अशक्त होतो, तेव्हा याचे निदान करणे शय होत नाही. विशेषतः जर प्राणी जंगलातच मरण पावला, तर तपासणीची संधीही राहात नाही.

शवनिरीक्षणाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भारतीय लांडग्यांसह किमान १५ इतर वन्य प्रजाती हे मृत प्राण्यांचे अवशेष खाण्यासाठी एकाच शवावर येतात. हा प्रकार रोगाच्या प्रसारासाठी ‘हॉटबेड’ म्हणून काम करतो; विशेषतः जेव्हा भटके कुत्रेही तिथे येत असतात. मानवी क्षेत्र वाढून वस्ती आणि जंगल यांतील सीमा जेवढ्या धूसर होतील, तेवढ्या भटया जनावरांमधून वन्यजीवांमध्ये आजार पसरण्याचा धोका वाढत जाईल. म्हणूनच कचरा व्यवस्थापन सुधारणे, जैवविविधता असलेल्या भागांमध्ये भटया कुत्र्यांची संख्या नियंत्रित करणे आणि आजारांच्या चाचण्या व देखरेख यंत्रणा मजबूत करणे आता अत्यावश्यक झाले आहे.

नेहा पंचमिया
(लेखिका पुण्यातील ‘रेस्यू चॅरिटेबल ट्रस्ट’च्या अध्यक्ष आहेत.)

Powered By Sangraha 9.0