मेंढपाळांशी सहसंबंध

    18-Aug-2025
Total Views |

भारतामधील भटके आणि वनवासी समुदायांचा देशातील वन्यजीवांशी शतकानुशतकांचा गाढ(दृढ) संबंध आहे. अनेक समुदाय जंगलातील उत्पन्नावर आणि काही वेळा वन्यप्राण्यांच्या मांसावर अवलंबून असतात. परंतु, त्यांच्या पारंपरिक पद्धतींमुळे वन्यजीवांच्या लोकसंख्येवर फारसा विपरीत परिणाम झालेला नाही. अलीकडच्या काळात अशा अनेक समुदायांचा अधिक बारकाईने अभ्यास होऊ लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे समुदाय आता राज्य यंत्रणा किंवा स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू असलेल्या मुख्य प्रवाहातील वन्यजीव संवर्धनकार्यात सहभागी होत आहेत.

अशाच समुदायांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील भटके मेंढपाळ, अर्थात माळरान जमिनीचे रक्षक. या समाजाचे वन्यजीव संवर्धनातील योगदान बहुतांश वेळा दुर्लक्षित राहते. पिढ्यान्पिढ्या मेंढ्या आणि शेळ्यांचे कळप घेऊन हे मेंढपाळ भारतातील ‘सवाना’ प्रकारच्या गवताळ प्रदेशात चरण्यासाठी फिरत आहेत. त्यांची ही चराईची(चरायची) पारंपरिक पद्धत खरं तर या परिसंस्थेचा नाजूक समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या जीवनपद्धतीने भारतातील एक गूढ शिकारी म्हणजेच भारतीय लांडग्याशी एक अभिन्न नाते निर्माण केले आहे. अधिवास नष्टता आणि शिकारामुळे भारतीय लांडग्यांचे नैसर्गिक भक्ष असलेले चितळ, काळवीट, ससा यांसारखे वन्यजीव कमी होत गेले, तेव्हा लांडग्यांनी मेंढपाळांच्या जनावरांवराचा मुख्य आहारात समावेश करून आपले अस्तित्व टिकवले. अनेक ठिकाणी तर हाच पशुधनाचा आधार लांडग्यांना नामशेष होण्यापासून वाचवणारा ठरला आहे. या परस्परावलंबी नात्यामुळे अनेक लोककथा जन्माला आल्या. जसे की, लांडगे मेंढपाळांबरोबर स्थलांतर करतात इ. मात्र, प्रत्यक्षात लांडग्यांचे कळप वर्षभर एकाच हद्दीत राहतात. पावसाळ्यात मेंढपाळ चराईच्या नव्या जागी स्थलांतर करतात, तेव्हा लांडगे अधिक दिसू लागतात. त्या काळात कळपाची संख्या पूर्ण असते आणि दिवसा सक्रिय राहिल्यामुळे त्यांचे निरीक्षण सोपे होते.

मात्र, यामुळे मानव-लांडगा संघर्ष पूर्णपणे नाहीसा झालेला नाही. गेल्या काही दशकांत कीटकनाशक सहज उपलब्ध झाल्यामुळे, पशुधनावर लांडग्यांचा हल्ला वाढला की कधीकधी बदला म्हणून विषप्रयोग करून त्यांना ठार मारले जाते. लांडग्यांची विणीची बिळं बुजवण्याच्या काही घटनादेखील नोंदवल्या गेल्या आहेत. तरीदेखील, या सगळ्या अपवादात्मक घटना असून एकूणच मेंढपाळ आणि लांडगे यांचे नाते हे सहजीवनाचेच आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये ज्या भागांत भटया मेंढपाळांची संख्या जास्त आहे, तिथेच लांडग्यांची उपस्थिती सर्वाधिक आढळते. त्यांच्या इतिहासाची आणि परस्पर अवलंबित्वाची ही ठोस खूण आहे. पिढ्यान्पिढ्या टिकून असलेले हे नाते केवळ सांस्कृतिक वारसा नसून ते गवताळ प्रदेशातील एका सर्वाधिक धोयात असलेल्या शिकार्‍याच्या अस्तित्वाला आधार देणारी मौल्यवान पर्यावरणीय भागीदारी आहे. अशा पारंपरिक समुदायांचे योगदान ओळखून त्यांना बळ देणे, हे केवळ गवताळ प्रदेशांचेच नव्हे, तर तिथल्या वन्यजीवांच्या भविष्याचेही रक्षण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

मिहिर गोडबोले
(लेखक ‘दि ग्रासलॅण्ड ट्रस्ट’चे अध्यक्ष आहेत.)