मुंबई : विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र चौंडी येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर उभारल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारकाच्या जलद विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारकडून निर्णायक पावले उचलली जात आहेत.
या प्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा म्हणून चौंडीच्या सिना नदीवर दोन बुडीत बंधारे बांधण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या कामासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सरकारने २१ लाख रुपयांची मंजुरी दिली आहे.
या बंधाऱ्यांमुळे परिसरातील सिंचन व्यवस्थेला चालना, पाणीपुरवठ्यात सुधारणा, नदीपात्राचे सौंदर्यवर्धन तसेच चौंडी व आसपासच्या भागातील पर्यटनाला मोठी गती मिळणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.