संघर्षातून नावारूपाला आलेले उद्योजक

18 Aug 2025 11:54:52

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उद्योजक म्हणून नावारूपाला आलेल्या कल्याणमधील रमेश महिपत देशमुख यांच्या संघर्षमय प्रवासाविषयी...

घरी अठराविश्वे दारिद्य्र होते, मात्र रमेश यांचे शिकण्याचे वेड आणि ओढ मोठी. शिकण्याची जिद्द आणि प्रगतीची महत्त्वाकांक्षा असल्यामुळेच, रमेश यांनी प्राथमिक शिक्षण वाकडी आणि माध्यमिक शिक्षण जामनेर येथे यशस्वीपणे पूर्ण केले. लहानपणीच अकस्मात वडिलांचे आधारछत्र हरपले, त्यावेळी रमेश चौथीत शिकत होते. त्यांचे वडील महिपत हे शेती व्यवसाय करीत, तर आई चंद्रभागाबाई गृहिणी होत्या. वडील गेल्यानंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. वडील गेले तेव्हा रमेश यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते; पण आई, लहान भाऊ आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कामधंदा शोधण्याची जबाबदारी रमेश यांच्यावरच आली. रमेश यांच्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आल्याने, त्यांनी पुढील उच्च शिक्षण थांबवून अत्यंत धाडसाने व साहसाने कुटुंबाला आधार देण्यासाठी मुंबईची वाट धरली. मुंबईत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी काहीतरी काम मिळेल, असा त्यांना ठाम विश्वास होता. त्याच विश्वासाने त्यांनी कल्याणमध्ये राहत असलेल्या मामाचे घर गाठले. सुरुवातीला जगण्यासाठी व स्थिरावण्यासाठी लेबर कॉन्ट्रॅटरकडे अत्यल्प पगाराची नोकरी पत्करली. यावेळी त्यांना १५० रुपये मिळत असत. त्यांपैकी १०० रुपये मामांना खानावळीपोटी द्यावे लागत आणि उरलेले ५० रुपये आई आणि भाऊ यांच्या उदरनिर्वाहासाठी ते पाठवत असत.

‘बी. पी. जोशी कंपनी’त नोकरी करत असतानाच रमेश यांनी १९८४ साली, कोजागिरीच्या शुभमुहूर्तावर भागीदारीत ‘एस. एस. कर्वे ट्रान्सपोर्ट कंपनी’ची स्थापना केली. त्यानंतर मात्र उत्तरोत्तर त्यांची भरभराट झाली. प्रगतीची, उन्नतीची आणि समृद्धीची दालने त्यांच्यासाठी खुली झाली. २००७ साली स्वतःच्या हिमतीवर उद्यमशील व उद्योगशील कल्याण नगरीत ‘ऐश्वर्या क्रेन सर्व्हिस’ आणि ‘आर. एम. देशमुख ट्रान्सपोर्ट’ या दोन कंपन्यांचीही मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. सद्यस्थितीत त्यांच्याकडे नऊ क्रेन, पाच ट्रक आणि २५ लोकांचा स्टाफ आहे. हे त्यांच्या दूरदृष्टीचे, अथक परिश्रमाचे, त्यागाचे, अजोड निष्ठेचे व अखंड संघर्षाचे फलित आहे.

जन्मभूमी जळगाव जिल्ह्यातील वाकडी हे गाव असले, तरी त्यांनी कर्मभूमी म्हणून कल्याण शहराचीच निवड केली. अत्यंत खडतर, कठीण, प्रतिकूल व आव्हानात्मक परिस्थितीशी दोन हात करत, कल्याण शहरात आपल्या अफाट कर्तृत्वाने, अचाट कौशल्याने व असीम कष्टाने ‘क्रेन सर्व्हिस आणि ट्रान्सपोर्ट’ क्षेत्रात उत्तुंग यशाचे यशोशिखर गाठले. त्यामुळेच २०११ साली उद्योग व सेवा क्षेत्रातील अतुलनीय व अभूतपूर्व योगदानाबद्दल ‘महाराष्ट्र विधान परिषदे’चे तत्कालीन उपसभापती स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, ‘अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती’ कल्याण यांच्यावतीनेही, दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा व मानाचा २०२४चा ‘राज्यस्तरीय वंजारी समाजभूषण पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

परोपकारी वृत्ती व दानशूरता अंगी ठासून भरल्यामुळे केवळ आपल्या स्वतःच्या कुटुंबाचेच नाही, तर गावाकडील चुलत भाऊ, भाचे, गरजू, गुणी मुलांना, रुग्णांनाही त्यांनी आर्थिक मदतीचा हात दिला. तसेच, अनेकांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले. त्यामुळेच आज कुणी शिक्षक, कुणी पोलीस तर कुणी ‘एमएसईबी’मध्ये अखंड सेवा देत आहेत. ’गावाचे काहीतरी देणे लागतो’ या भावनेतून रमेश यांनी शाळेसाठी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक वर्गखोलीही बांधून दिली. ग्राममंदिरासाठीही आर्थिक मदत पुरविली. १९७५ साली रमेश यांची मंदाकिनी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली गेली. मंदाकिनी यांचे माहेरदेखील जळगावमधील एका छोट्याशा खेड्यातच होते. रमेश यांनी विवाहानंतर पारनाका येथे घर घेतले. मामाच्या घरातून रमेश आता स्वतःच्या घरात स्थलांतरित झाले.
सामाजिक काम करीत असताना त्यांनी मुलांनाही घडविले, उच्च शिक्षित केले, सुसंस्कारित केले. त्यामुळेच थोरला मुलगा मुकेश कल्याण जनता सहकारी बँकेच्या घाटकोपर शाखेमध्ये शाखाप्रमुख, तर लहान मुलगा रुपेश हा रमेश यांच्यासोबत यशस्वीपणे उद्योग सांभाळत आहे. मंदाकिनी यांनी या खडतर प्रवासात रमेश यांना खंबीरपणे साथ दिली. संसाररथाचे समर्पित भावनेने त्यांनी सारथ्य केले; त्यामुळेच संसाररथाला योग्य दिशा व योग्य गती लाभली. याचे श्रेय रमेश नेहमीच त्यांच्या पत्नीला देतात. सध्या दोन मुले, सुना, चार नातवंडे असे सर्वजण एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यांचा धाकटा मुलगा त्यांना व्यवसायात साथ देत असून, आता हा व्यवसाय अजून वाढविण्याचा त्याचा मानस आहे.

समुद्र कितीही अथांग असला, तरी आकाश त्याला व्यापून उरतं. वादळे कितीही आली, तरी कल्पवृक्ष त्याला थोपवून धरतो ही व्याप्ती आणि शक्ती ज्यांच्यात आहे, असे रमेश देशमुख यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व कायमच यशस्वी ठरतात. रमेश यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0