साहित्य संवादात ९० टक्के वाटा दृष्यांचा; ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी यांचे निरीक्षण

    17-Aug-2025
Total Views |

नागपूर :
साहित्यिक, लेखक आणि कवी हा अनुभुतीतून जाणवलेल्या गोष्टी साहित्यातून मांडत असतो. मात्र यात शब्दांचा वाटा हा केवळ ७ टक्के आहे. उर्वरित ९० टक्क्यांहून अधिक वाटा हा साहित्य घडविणाऱ्या लेखकाला दिसलेल्या दृष्यांचा असतो. त्यामुळे संवाद प्रक्रियेत दृष्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते, असे ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी येथे सांगितले.

साहित्य आणि मराठी भाषेच्या क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक जोशी यांचा मुंबई येथील एस. व्ही. एस. कला प्रतिष्ठानच्यावतीने विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हिंदी मोर भवन येथील नटराज सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर होते. व्यासपीठावर शासकीय राज्य कलाकार पुरस्कार प्राप्त प्रा. नंदकिशोर मानकर, प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. गजानन शेपाळ उपस्थित होते.

साहित्यात भाषा, शब्दांचा वाटा नगण्य असल्याचे नमूद करीत जोशी म्हणाले, भाषेला जसे व्याकरण असते तसेच चित्रकला आणि शिल्पकलांनासह इतर कलांनाही व्याकरण असते. ते समजले की समोर दिसत असलेल्या दृष्यांना मूर्त रुप मिळते. यातून घडलेला संवाद प्रवाही होतो. दुर्दैवाने आज संवादातले तंत्र आणि कौशल्य हरवत चालले आहे. साहित्य शिकविणारे मोजके १० टक्के प्राध्यापक साहित्यातले साक्षर आहेत. उर्वरित निरक्षर आहेत. माझे ते माझेच आहे. पण तुझेही माझेच आहे, अशी वृत्ती बोकाळत चालल्याने साहित्यातल्या मठाधिशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रारंभी प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. शेपाळ यांनी प्रास्ताविकातून भूमिका मांडली. शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे प्रा. विकास जोशी यांनी नेटके सूत्रसंचालन केले.