अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे युवक काँग्रेसचे महासचिव आणि पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शनिवार, १६ ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी राज्यसभा खा. डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार रामदास तडस, आ. राजेश वानखेडे यांच्यासह अन्य मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "देव, देश, धर्म, संस्कृतीने प्रेरित झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी भारतीय जनता पक्षात स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. २०४७ मध्ये जगातील सर्व देशांना भारताची गरज पडणार आहे. असा भारत निर्माण करण्याचा संकल्प प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे. या संकल्पाला साथ देण्याकरिता विक्रम ठाकरे आज भाजपमध्ये आले आहेत. अनिल बोंडे यांनी हिरा असलेला कार्यकर्ता शोधून भाजपमध्ये आणला आहे. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला आणि त्याने मायावी कंसाला समाप्त केले. आता विक्रम ठाकरे यांना मायावी काँग्रेसला पूर्ण भूईसपाट करण्याचे काम करायचे आहे. विक्रम ठाकरे यांच्या पक्षप्रवेशाने या मतदारसंघात प्रचंड बळ मिळाले आहे. यापुढेही अनेक पक्षप्रवेश होणार आहेत," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "आजचा पक्ष प्रवेश हा अमरावती जिल्ह्याच्या संपूर्ण काँग्रेस पक्षाला धक्का देणारा आहे. उत्तर महाराष्ट्रात कुणाल पाटील यांनी काँग्रेस सोडली. पश्चिम महाराष्ट्रात अनंतराव थोपटे यांच्या परिवाराने काँग्रेस सोडली. मराठवाड्यात सुरेश वरपूडकर, अशोक चव्हाण यांनीही काँग्रेस0 सोडली. पंतप्रधान मोदीजींनी समाजाच्या कल्याणाकरिता संकल्प केला असून तो संकल्प मोडून काढण्यासाठी काँग्रेसची टीम काम करत आहे," अशी टीकाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....