भिवंडी : भिवंडी शहराचे चित्र बदलण्याचे काम महायुतीचे सरकार करणार असून, एक नागरी शहर म्हणून भिवंडी शहराचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे मनोरे लावून हंडीतील लोणी शेवटच्या घटकांपर्यंत पोचविणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
भाजपा, कपिल पाटील फाउंडेशन, समन्वय युवा प्रतिष्ठान, संस्कार प्रतिष्ठान यांच्या वतीने भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राज्याचे वन मंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश चौगुले, जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, प्रशांत पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कारकिर्दीत अनेक विकासकामे करण्यात आली, याचा आवर्जून उल्लेख करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी शहराच्या विकासाची ग्वाही दिली. यापूर्वी विकासाच्या दृष्टीकोनातून भिवंडीत विकासकामे करण्यात आली. यापुढील काळात भिवंडी शहराचे संपूर्ण चित्र बदलण्याचे काम महायुतीचे सरकार करेल. एक नागरी शहर म्हणून भिवंडी शहराचा विकास करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून पाकच्या पापाची हंडी फोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची हंडी आणखी उंचीवर पोचली आहे. महायुतीचे सरकार विकासाचे उंच मनोरे रचून हंडीतील विकासाचे लोणी शेवटच्या घटकापर्यंत पोचवेल. त्यासाठी नागरिकांनी साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी शहर व लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या योगदानाचा माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आवर्जून उल्लेख केला. तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.