बोधगया : वास्तव आणि समाजमन

17 Aug 2025 11:31:43

"१९४९ सालचा ‘बोधगया मंदिर कायदा’ रद्द करा. बोधगया हे बौद्धांचे पवित्र स्थान आहे. त्यावर फक्त बौद्धांचाच अधिकार राहील. ‘बोधगया मंदिर व्यवस्थापन समिती’मध्ये हिंदूही आहेत. त्यांचे वर्चस्व नको,” असे म्हणत काही संघटनांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाचा बडगा उगारला आहे. महाराष्ट्रातही ‘वंचित बहुजन आघाडी’ने हाच मुद्दा उपस्थित केला, तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही असेच मत मांडले. पण, याबाबत समाजाचे मनोगत जाणून घेतले असता, गौतम बुद्धांनी सांगितलेली मंगल मैत्री आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एकजिनसी भारतीयत्वाचा मंत्र, यातूनच बोधगयेसंदर्भात मार्ग निघावा, असा निष्कर्ष समोर येतो. अशा या आंदोलनाचे विविध कंगोरे, बोधगयाचा इतिहास आणि वास्तवाचा मागोवा घेणारा हा लेख...

काही लोक मला म्हणतात की, भंडारा येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कुणी हरवले? तर मी म्हणतो नाही, आपल्या विरोधातली शक्ती मोठी आहे. तसेच, गौतम बुद्ध हे विष्णुचे अवतार नाहीत, हे सांगणारे माझ्याकडे पुरावे आहेत.” १८९५ सालचा निकाल आहे, असे ‘बोधगया मुक्ती’च्या नावाने आंदोलन करणार्‍या आकाश लामा यांचे वक्तव्य नुकतेच ऐकले. ‘बोधगया व्यवस्थापन समिती’वर संपूर्णतः बौद्ध समाज असावा, हे सांगताना आकाश यांनी हिंदू देवदेवता, श्रद्धा यांचा उच्चार का बरं केला असेल? त्यांनी यावेळी आवर्जून हेसुद्धा सांगितले की, पूर्वी त्यांचे स्वागत अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांनी केले होते. ही दोन नावे ऐकूनच मनात अनेक प्रश्न उभे राहिले. असो!

आकाश लामा म्हणतात त्याप्रमाणे, १८९५ साली इंग्रजांच्या न्यायालयात ‘बुद्ध विष्णुचे अवतार आहेत का?’ यावर काही निर्णय दिला गेला होता का, याचा मागोवा घेतला, तर आढळले की, १८९५ साली न्यायालयाने म्हटले होते की, बुद्धाला विष्णुचा अवतार मानणे, हा हिंदू परंपरेतील स्वीकृत दृष्टिकोन आहे. मात्र, बुद्ध विष्णुचा अवतार आहे की नाही, याबद्दल न्यायालयाने कोणतीही टिप्पणी केली नव्हती. अर्थात, बुद्ध विष्णुचा अवतार आहेत की नाही, हा या लेखाचा मुद्दा नाही. मुद्दा आहे, बोधगया आंदोलनामध्ये केल्या जाणार्‍या अशा प्रकारच्या प्रबोधनाचा(?) असो.

‘आम्हाला १९४९ सालचा बोधगया मंदिर कायदा नको. कारण, यातील नऊ सदस्यांपैकी चार सदस्य हिंदू आहेत. बोधगया बुद्धांच्या स्मृतिज्ञानाने पवित्र झाले. त्यामुळे ते बौद्धांच्या ताब्यात द्या,’ असे म्हणत काही संघटना आणि त्यात काही चिवर धारण केलेले भिक्खूही गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. ही मागणी पहिल्यांदा केली ती डॉन डेविड हेवाविथारने ऊर्फ अनगारिक धर्मपाल यांनी १८९१ साली. त्यांनी ‘बोधगया हे बौद्धांचे पवित्र स्थान आहे. इथे हिंदू महंत विष्णुची पूजा कशी करतात,’ असा प्रश्न उपस्थित करीत न्यायालयीन लढा दिला. खरं तर हे गृहस्थ मूळचे श्रीलंकेतले. सर एडविन अर्नोल्ड लिखित ‘द लाईट ऑफ एशिया’ या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी ‘महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्थादेखील स्थापन केली. संस्थेचे उद्दिष्ट होते, बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करणे आणि बौद्ध पवित्रस्थळे पुन्हा बौद्धांच्या ताब्यात आणणे. जगभर बौद्ध शिक्षण, वाङ्मय आणि ध्यान परंपरा यांचा प्रसार करणे. तेव्हापासून ते आजपर्यंत बोधगयेबद्दल काही आंदोलने यापूर्वीही झाली. कोर्टकचेर्‍याही झाल्या आणि आज पुन्हा अनगारिक धर्मपाल यांनी उपस्थित केलेला मुद्दाच काही संस्था-संघटनांनी उपस्थित केला आहे.

या विषयाच्या आणखीन खोलात जाण्यापूर्वी बोधगयेची सारांश रूपात माहिती घेऊ. जगभरातील बौद्ध समाजासाठीच नव्हे, तर हिंदूंसाठीही बोधगया महत्त्वाचे तीर्थस्थान. इसवी सन पूर्व ५३१च्या सुमारास बोधगया येथील निरंजना नदीच्या काठावर महाबोधी वृक्षाच्या खाली तथागत गौतम बुद्धांना ‘निब्बान’ म्हणजे ‘निर्वाण’ प्राप्त झाले. सम्राट अशोक (३०४२३२ इ. स. पूर्व) यांनी येथे वज्रासन आणि स्तंभ उभारले.त्यांनी येथे महत्त्वाचे बांधकाम केले, ज्यामुळे हे स्थळ जागतिक बौद्ध यात्रास्थळ म्हणून नावारूपाला आले. पुढे इसवी सन चौथ्या ते अकराव्या शतकात हिंदू राजा गुप्त सम्राट व पाल राजवंशाच्या काळात (बौद्ध आणि हिंदू दोन्ही धर्मांना समान न्याय होता) येथे मोठमोठे विहार, मंदिरे आणि स्तूप उभारण्यात आले. बोधगया आंतरराष्ट्रीय बौद्ध शिक्षणाचे केंद्र झाले. चीन, श्रीलंका, म्यानमार, तिबेट, नेपाळ येथील भिक्खू येथे मोठ्या संख्येने अध्ययनासाठी येत. मात्र, ११९३ साली तुर्क आक्रमक बख्तियार खिलजीने आजच्या बिहारच्या भूप्रदेशावर हल्ला केला. बाराव्या शतकानंतर तुर्क-मुस्लीम आक्रमणामुळे बोधगयातील विहार उद्ध्वस्त झाले. नालंदा आणि इतरही प्रमुख स्थळांचा विनाश केला. बौद्ध धर्म भारतात हळूहळू क्षीण झाला. इस्लामिक हिंसक आक्रमणकर्त्यांनी बोधगया विहार उद्ध्वस्त केले. मुस्लीम आक्रांतांचे गुलाम होऊन बौद्ध धम्म त्यागण्यास बौद्ध भिक्खूंचा नकार होता. धम्म वाचवण्याची त्यांनी शिकस्त केली. हिंसक अत्याचारातून जे बचावले, त्यांनी या स्थानापासून दूर जाऊन धम्माचे काम सुरू केले. मात्र, याच काळात बोधगयेमध्ये ‘विष्णुपाद’ हे हिंदूंचे मंदिरही होते. त्यामुळे या परिसरात देशभरातले हिंदूही भक्तिभावाने दाखल होत.

बोधगया संरक्षित करण्याची जबाबदारी इथल्या महंतांनी घेतली. साधारण तेराव्या-चौदाव्या शतकानंतर बोधगया हिंदू महंतांच्या ताब्यात गेले. त्यांनी त्यांच्यापरिने बोधगयेचे संवर्धनही केले. पुढे १८९१ साली अनगारिक धर्मपाल यांनी ‘महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया’ स्थापन करून महाबोधी मंदिर बौद्धांकडे परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. १८९५ साली कोलकाता उच्च न्यायालयाने निर्णयही दिला की, महाबोधी मंदिर हे महंतांच्याच नियंत्रणाखाली राहील. मात्र, बौद्ध इथे पूजाअर्चा करू शकतात. १९४९ साली ‘बोधगया मंदिर कायदा’ पारित झाला. त्याअंतर्गत १९५३ साली ‘बोधगया मंदिर व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात आली. समिती महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळते. या समितीध्ये एकूण नऊ सदस्य असतात. चार बौद्ध सदस्य, चार हिंदू सदस्य तसेच, एक सदस्य सचिव म्हणून नेमला जातो. गयाचे जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्षपद भूषवितात. २०१३ साली केलेल्या सुधारणांनुसार गैर-हिंदू व्यक्तीही या समितीची अध्यक्ष होऊ शकते. समितीमधील सदस्यांची मुदत तीन वर्षांची असते. मंदिराची दुरुस्ती, सुधारणा, भाविकांची सुरक्षा आणि तीर्थस्थानाची एकूणच देखभाल, याची जबाबदारी समितीची आहे. २००२ साली महाबोधी मंदिराला ‘युनेस्को’कडून ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून मान्यताही मिळाली. मात्र, सध्या ‘ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम’ आणि अन्य काही संघटना बोधगयावरून आंदोलन करीत आहेत.

‘बोधगया मंदिर कायदा’ रद्द करा, अशी त्यांची मागणी. मात्र, ‘बोधगया मंदिर व्यवस्थापन समिती’ १९४९च्या कायद्याचे समर्थन करते. संपूर्ण बौद्ध नियंत्रणाची जी मागणी आहे, त्यासंदर्भात न्यायालय/सरकार निर्णय घेईल किंवा भूमिका ठरवेल, असेही समितीचे मत दिसतेे. आज भारत विकासाच्या दिशेने अग्रेसर असताना देशात, समाजात अस्थितरता निर्माण करणार्‍या, फुटीची बिजे पेरणार्‍या अशा विषयांना समाजाने किती स्थान द्यावे? तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी जगायचे की आंदोलन, मोर्चे वगैरे करत बसायचे? असा प्रश्न उपस्थित होतो. पण, समाज जागृत आहे, म्हणूनच तर समाजाला कुणीही कितीही भ्रमित केले, तरी समाज तथागतांच्या मंगल मैत्रीवर आणि बाबासाहेबांच्या अखंड भारतीयत्वावर ठाम आहे. त्यामुळे बोधगया प्रकरणातही समाज आणि सरकार हे सम्यक भूमिका घेतील, यात संशय नाही.

बोधगया ही आध्यात्मिक राजधानी
कित्येक वर्षांपूर्वी बोधगयाला सिद्धार्थ मिळाले; पण बोधगयाने जगाला जे दिले ते भगवान बुद्ध म्हणजे ज्ञान, शांती आणि करुणेचे मूर्तिमंत प्रतीक. बोधगयाचा असा विकास करायचा आहे की, तो भारत आणि बौद्धजगतातील आध्यात्मिक राजधानी आणि सांस्कृतिक सेतू ठरेल.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

बोधगया बौद्धांसाठी अतिमहत्त्वाचे!
लुंबीनी, सारनाथ, कुशावर्त आणि बोधगया ही बौद्धांसाठी पवित्र स्थळे आहेत. प्रत्येक धर्मीयांना वाटतेच की, आपल्या धार्मिक स्थळांवर आपले संपूर्ण अधिकार असावेत. जगभरात तसे आहे देखील. त्यामुळे बोधगया प्रकरणी जे आंदोलन चालले आहे, यावर विचार करणे आवश्यक आहे. पण, हा देश सर्वांचा आहे. डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला भारतीयत्वाचा मंत्र दिला. त्यामुळे आपण बौद्ध म्हणून आपले हक्क मागताना इतर धर्मीय बांधवांशी आपले वैर निर्माण होऊ नये. शांती, करूणा आणि बंधुता हाच आपला मार्ग आहे. हिंदू आणि बौद्ध यांच्यात मंगल मैत्री कायम राहावी, सलोखा राहावा, ही इच्छा आहे. बोधगया विवाद सामंजस्याने सोडवावा, असे वाटते.
-अनार्य पवार, अध्यक्ष, अधिष्ठान सामाजिक संस्था

बोधगयेला जातीविवादात अडकवणे अयोग्
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातही बोधगयासंदर्भात विषय चर्चिला गेला होता. त्यावेळी त्यांनी त्या वादावर लक्ष दिले नाही. कारण, त्यांचा हिंदू धर्माला किंवा माणसांना विरोध नव्हता, तर अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि चुकीच्या चालीरिती व परंपरा यांना विरोध होता. त्यामुळे आपण हे समजून घेतले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या पहिल्या व अखेरच्या भाषणात "या देशाला एकसंध होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही व जेथे संविधानिक मार्ग उपलब्ध आहेत, तेथे बेकायदेशीर मार्ग चोखाळण्याची गरज नाही, ते अराजकतेचे व्याकरण ठरेल,” असे सांगितले होते, याचा विसर आपल्याला पडता कामा नये. हिंदू धर्म हा सर्वांत जास्त बुद्ध धम्माच्या जवळचा धर्म आहे. म्हणून बंधुत्वाचे, मैत्रीचे नाते टिकवणे आवश्यक आहे. त्यामुळे हे जे वाद सुरू आहेत, ते निरर्थक आहेत. हा कायदा संपला, तर महाबोधी विहारावरील बौद्धांना त्या ठिकाणी अधिकारच राहत नाही. त्यामुळे समाजाची ते दिशाभूल करीत आहेत. मित्राला शत्रू म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. बुद्धांनी ‘करणीमेय मेत्त सुत्ता’मध्ये सांगितले आहे की, सर्वांप्रति मैत्रिभाव ठेवा, मैत्रिपूर्ण विचार ठेवा, कोणचाही द्वेष करू नका. कितीही मतभेद व मनभेद असतील, तरी वादांचे व भेदांचे विषय बाजूला ठेवून एकत्र येण्याच्या व समाज सांधण्याच्या, समन्वयाच्या जागा एकमेकांना शोधाव्याच लागतील. या देशाला एकसंघ, एकजीव, एकजिनसी देश व्हावेच लागेल. सर्वांत महत्त्वाचे की, बुद्धांना जातिभेद मान्य नसल्यामुळे, बोधगयेला जातीविवादात अडकवणे अयोग्यच!
-अ‍ॅड. वाल्मिक निकाळजे, मानव अधिकार कार्यकर्ता

पंतप्रधान देश, समाजानुकूल मार्ग काढतील
आता काही लोक महाबोधी महाविहाराच्या मुक्तीबद्दल बोलतात. त्यांच्या विचारांचा मी आदर करतो. मात्र, ते म्हणतात की, महाबोधी विहारातून ब्राह्मणांना हटवा. पण, इतिहास सांगतो की, भगवान बुद्धांच्या सोबत किंवा त्यांचे अनुयायी म्हणून भिक्षू ब्राह्मण होते. दुसरीकडे इतिहास बघितला, तर स्पष्ट आहे की, इस्लामिक आक्रमणकर्त्यांनी आमचे महाबोधी महाविहार तोडले, नालंदा जाळले. पण, त्यानंतरच्या काळात महाबोधी महाविहाराची देखभाल हिंदू महंतांनीच केली. आता काही मुस्लीम संघटनांना आणि व्यक्तींनाही आमच्या महाबोधी महाविहारासंदर्भात पुळका आला आहे. हे बघून मला आठवते की, जगातील सर्वांत मोठी बुद्धमूर्ती मुसलमान असलेल्या तालिबान्यांनी तोडली होती. याच घटनेतून तालिबान्यांनी जगाला संदेश देण्यात आला की, बौद्ध आपले नाहीत. डॉ. बाबासाहेबांनी ही वृत्ती फार पूर्वीच ओळखली होती. म्हणूनच त्यांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या पुस्तकामध्ये आवर्जून विनंती केली होती की, मुसलमानांना वेगळा देश पाहिजे, तर सर्वांना तिकडे पाठवा आणि तिकडच्या हिंदूंना इथे भारतात बोलवा. राम मंदिर असू दे की, ‘कलम ३७०’ रद्द करण्याचा निर्णय असू दे की, तिहेरी तलाक असू दे, सगळी प्रकरणे स्फोटक होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर देशहित, समाजहित साधत मार्ग काढला. आम्हा बौद्ध बांधवांना खात्री आहे की, बोधगया विहाराबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश आणि समाजानुकूल मार्ग नक्कीच काढतील.
-नितीन मोरे, संस्थापक-अध्यक्ष, जयभिम आर्मी

...तर बौद्ध समाजाचे नुकसानच होणार!
वास्तविक जेव्हा ‘महाबोधी मंदिर कायदा, १९४९’ अस्तित्वात आला, त्यावेळी सर्वप्रथम बोधगया मठातील महंतांचाच या कायद्याला विरोध होता, जेणेकरून सदरील कायदा रद्द झाल्यास महाबोधी महाविहारावरील वर्षानुवर्षे असलेला हिंदू महंतांचा ताबा, नियंत्रण, हिंदू धर्माचेच वर्चस्व व एकाधिकारशाही विहारावर कायमस्वरूपी अबाधित राहील. परंतु, ‘महाबोधी मंदिर कायदा, १९४९’मुळेच महाबोधी महाविहारावरील बौद्ध धर्मीयांची असलेली आस्था व बुद्धकाळापासून असलेले वर्चस्व टिकून राहून, त्याला खर्‍या अर्थाने संरक्षण प्राप्त झाले. याच कायद्यामुळे हिंदू धर्मीयांच्या ताब्यातून महाबोधी महाविहाराची कायमस्वरूपी सुटका झालेली असून, महाबोधी महाविहार ही तपोभूमी बौद्ध धर्मीयांसाठीच नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी भगवान गौतम बुद्धांच्या धम्माचे उगमस्थान झालेले आहे. वर नमूद केल्याप्रमाणे, खरी वस्तुस्थिती असतानादेखील सद्यस्थितीमध्ये बौद्ध धर्मीयांकडून सदर कायदा रद्द करण्याची मागणी सातत्याने करणे, हे संयुक्तिक व योग्य ठरेल का? बोधगया मठातील महंत महाबोधी महाविहार जे मालकी हक्काचे वर्चस्व गाजवीत होते, या कायद्यामुळे ते वर्चस्व संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे १९४९चा कायदा रद्दा झाल्यास, बौद्ध समाजाला फायदा होणार की नुकसान, याचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच, महाबोधी महाविहार हे हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्माच्या धार्मिक ऐय, सद्भाव, सलोख्याचे द्योतक आहे. भगवान तथागतांच्या कृपेने सर्वांचे मंगल होईल. मात्र, पुन्हा एकदा सांगतो की, १९४९चा कायदा रद्द झाल्यास बौद्ध समाजाला फायदा होणार की नुकसान, याचा विचार करणे आवश्यक आहे.
-अ‍ॅड. संदिप जाधव, ‘बोधगया सत्य आणि विपर्यास’ पुस्तकाचे लेखक

पवित्र बोधगयेवरून राजकारण कुणीही करू नय
मी तथागत गौतम बुद्धांची अनुयायी आहे. आम्हा बौद्ध धर्मीयांसाठी बोधगया हे अतिपवित्र स्थान आहे. त्यामुळे बोधगयेवरून कुणीही राजकारण करू नये, असे वाटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिला. त्या धम्माच्या दिशेने वाटचाल करताना इतके कळते की, आपण सगळे भारतीय आहोत. आपसात जातभेद-धर्मभेद करणे, हे योग्य नाही. दुसरे असे की, समाजासमोर अनेक प्रश्न आहेत. आपल्या समाजात धर्मांतरणाचे प्रमाण वाढले आहे. आजही गरिबी, बेरोजगारी आणि इतरही अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर समाजातील प्रबुद्ध नागरिकांनी काम करणे गरजेचे आहे. या प्रश्नांना दुर्लक्षित करून समाजात अस्वस्थता निर्माण करणारे मुद्दे उकरून काढायची गरज नाही. आम्हीही बौद्ध आहोत आणि बुद्ध धम्माचा रास्त अभिमानही आहे. मात्र, देश आणि समाजात कोणत्याही कारणाने अस्वस्थता निर्माण होऊ नये, असे वाटते. मंगल मैत्रीची सम्यक दृष्टी ठेवूया. आपल्या बौद्ध समाजाला, देशाला नव्हे, जगाला दिशा दाखवायची आहे.
-योजना ठोकळे, अध्यक्ष, आधार महिला संस्था

सम्यकदृष्टीने विचार करणे गरजेचे
आम्ही बौद्ध आहोत आणि आम्ही तथागत गौतम बुद्धांचे अनुयायी आहोत. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार चालणारे आहोत. बाबांनी जे सांगितले, त्याचा स्वीकार तेव्हाही आमच्या पूर्वजांनी केला आणि आजही आम्ही करणार आहोत. बाबासाहेबांनी देश चालवण्यासाठी कायदा लिहिला. आमच्या बाबांच्या कायद्यानेच देश चालत आहे. बोधगयाच्या घटनेमध्ये हे लक्षात घेतले पाहिजे की, सध्याचे जे बोधगयेचे वास्तव आहे, ते १९४९च्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कायद्याच्या अंगाने याचा विचार होणे गरजेचे आहे. काही विघातक शक्तींनी कायम आमच्या बौद्ध समाजाला भरकवटण्याचे, दिशाहीन करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे बोधगया प्रकरणात समाजाने डोळसपणे विचार करणे गरजेचे आहे. कुणी आपल्याला बुद्धांच्या नावाने भावनिक बनवले आणि आपण बनलो, हे किती काळ चालणार? डॉ. बाबासाहेबांनी देशाच्या एकतेला आणि समाजाच्या कल्याणाला कायम महत्त्व दिले. बोधगया प्रकरणात आपण डॉ. बाबसाहेबांच्या या विचारांना प्राधान्य द्यायला हवे.
-स्नेहा भालेराव, अध्यक्ष, घे भरारी


Powered By Sangraha 9.0