वरुणराजाच्या आशीर्वादाने दहा थरांच्या विश्वविक्रमाची नोंद!

16 Aug 2025 19:57:07

(छाया  : अजिंक्य सावंत ) 

मुंबई , राज्यसह देशभरात दि. १६ ऑगस्ट रोजी, दहीहंडीचा सण उत्साहात साजरा झाला. यावेळी दहीहंडीच्या उत्सवामध्ये पावसाच्या दमदार हजेरीमुळे, दहीहंडीचा थरार आणखीनच रंगला. मुंबईतील दहीहंडी उत्साहात यंदा नव्या विक्रमांची शर्यत प्रेक्षकांना अनुभवायाला मिळाली. घाटकोपर येथे मनसे गणेश चुक्कल, अरविंद गिते मित्र परिवार आयोजित दहीहंडीमध्ये " जय जवान गोविंदा पथकाने १० थरांची हंडी लावून नवीन विक्रम रचला. त्याचबरोबर ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संकल्प प्रतिष्ठाण आयोजित दही हंडी उत्सवात कोकण नगर गोविंदा पथकाने १० थरांचा विश्वविक्रम केला. कोकण नगर गोविंदा पथकाने केलेल्या विक्रमानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंडळाला तब्बल २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले. ९ थर लावणाऱ्या गोविंद पथकांना ११ लाखांचे बक्षीस तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर ८ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला २५ हजार व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली.

गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय नेते, सिने तारकांनी हजेरी लावली. राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विश्वविक्रमाचे कौतुक केले.दादरच्या सुप्रसिद्ध आयडियलच्या दहीहंडीमध्ये महिलांच्या दही हंडी पथकाच्या सलामीने मुंबईच्या दही हंडीची उत्साहात सुरुवात झाली. यानंतर दही हंडीच्या उत्सावाला पारावर उरला नाही, वेगवेगळ्या गोविंदा पथकांनी अत्यंत उत्साहाने हंडी फोडून अत्यंत उत्साहाने दहीहंडी साजरी केली. यावर्षीच्या दही हंडीचे वैशिष्ठय म्हणजे, दही हंडीच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान दर्शवणारे देखावे सुद्धा उभारण्यात आले. वरळीच्या जांबोरी मैदानातील परिवर्तन दहीहंडी येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने दही हंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवात एका गोविंदापथकाने छावा सिनेमातील देखावा मनोऱ्यावर साकारला. संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज भेट, तसेच संभाजीराजेंच्या शौर्याचं बलिदान या देखाव्यातून साकारण्यात आले. त्याचबरोबर दहीहंडीच्या उत्सवात मराठी कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शवून गोविंदा पथकांना प्रोत्साहित केले. पुण्यामध्ये सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, यांच्यासह धनश्री काडगांवकर, अक्षया देवधर, प्राजक्ता गायकवाड यांनी वेगवेगळ्या मंडळांमध्ये हजेरी लावली. संस्कृती आणि शौर्याच्या अनोख्या संगमातून साकारलेला दहीहंडी उत्सव राज्यभरात अत्यंत उत्साहात साजरा झाला.

तेजस्विनी महिला पथकाकडून स्त्री शक्तीचा जागर!

दादरच्या श्री साई दत्त मित्र मंडळ आयोजित दही हंडी उत्सवामध्ये तेजस्विनी महिला पथकाकडून स्त्री शक्तीचा जागर साकारण्यात आला. यावेळी तेजस्विनी महिला पथकाकडून सलामी देताना स्त्री साम्यर्थाचा अनोखा संदेश देण्यात आला. " स्त्री अबला नसून, अन्यायाविरोधात उठणारी ज्वाला आहे " अशा आशयाचा फलक यावेळी दर्शवण्यात आला. त्याचबरोबर मुलगी म्हणजे शक्ती, संस्कृती आणि परिवर्तनाचा चेहरा आहे. असा विचार सुद्धा यामध्ये मांडण्यात आला.

उत्सावात विरजण! एका गोविंदाचा मृत्यू तर जखमी गोविंदावर उपचार सुरु

राज्यभरामध्ये दही हंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होत असताना दुर्देवाने उत्सवाला गालबोट लागले. मुंबईतील मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथे दहीहंडी उत्सवाची तयारी करत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला. जगमोहन शिवकिरन चौधरी असे या गोविंदाचे नाव असून, दहीहंडीची रश्शी बांधत असताना, तोल जाऊन, त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांना तातडीने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र भर्ती करण्याच्या पूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुंबईमध्ये एकूण ३० गोविंदा जखमी झाले असून, त्यांच्यावर रुगणालयात उपचार सुरु आहे.
Powered By Sangraha 9.0