
आपल्या देशाला साधारण ७ हजार, ५०० किमी एवढ्या लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. यांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला सुमारे ८७७ किमीचा किनारा येतो. पण, सर्वसाधारण माणसाला समुद्राबद्दल काय माहिती असते? तर समुद्राचे पाणी खारे असते, यामुळे ते आपल्याला पिता येत नाही, एवढीच! अलीकडे कोकणातल्या वेगवेगळ्या किनार्यांवर पर्यटनासाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पण, त्यात दोन दिवस करमणूक अशा सौम्य हेतूपासून दारू पिऊन हैदोस घालणे, अशा तीव्र हेतूपर्यंत विविध जमिनींवरचे हेतूच दिसतात. समुद्राची माहिती करून घेणे, या हेतूने जाणारा पर्यटक लाखांत एखादा तरी निघेल का, अशी शंका आहे.किल्ले पाहणे, पदभ्रमण करणे असे निरोगी पर्यटक गटसुद्धा आहेत. ते हिमालयात, सह्याद्रीत पदभ्रमण करतात. शिवरायांचे जलदुर्ग पाहण्यासाठी समुद्रावरही फिरतात. फटफट्या घेऊन कारगिलला जातात. अथवा संपूर्ण देशाला प्रदक्षिणा घालतात. पण, यापलीकडे काही करायचे त्यांना सूचत नाही.
नाही कसे? पदभ्रमण करीत गड-किल्ले पालथे घालणार्या एका ट्रेकर मित्रांच्या गटाला एक नवी साहस कल्पना सूचली; आपण मुंबईहून निघून समुद्राच्या काठाकाठाने कलकत्याला (आता कोलकाता) जायचे. पश्चिम किनार्यावरची मुंबई ते पूर्व किनार्यावरचे कलकत्ता अशी भारताची सागरी परिक्रमाच करायची आणि हे अत्याधुनिक, सुसज्ज, यांत्रिक बोटीतून न करता शिडाच्या होडीतून करायचे. याला म्हणतात ‘सेलिंग.’ त्यातच तर साहस आहे, थरार आहे. यांत्रिक बोटीतून काय, कुणीही करेल.
पाश्चिमात्य देशांत ‘सेलिंग’ हा एक प्रस्थापित, प्रतिष्ठित खेळ आहे. तिथे अनेक हौशी लोक, यांत स्त्रिया आणि मुलेसुद्धा आहेत, नियमित ‘सेलिंग’ करतात. तिकडे ‘सेलिंग’च्या स्पर्धा होतात. लोकांच्या जशा स्वतःच्या मालकीच्या मोटारी असतात, तशा स्वतःच्या ‘सेलिंग बोटी’ जिला ‘याच’ किंवा ‘यॉट’ असा विशेष शब्द आहे, त्या असतात. आपल्याकडे या विषयीचे अज्ञान इतके घोर आहे की, मुंबईतल्या माहितगार व्यक्तीलासुद्धा मुंबईच्या अपोलो बंदरावर ‘बॉम्बे रॉयल यॉट क्लब’ नावाचा एक अतिश्रीमंत आणि लब्धप्रतिष्ठित लोकांचा लब आहे, एवढेच माहिती असते.
अशा स्थितीत ‘दर दर की ठोकरे’ खात फिरणार्या आपल्या साहसी पदभ्रमण चमूला प्रथम अॅडमिरल प्रकाश आवटी आणि मग जे. एस. जहांगीर उर्फ जे. जे. हे दोन समुद्र गुरू भेटले. जेजेने या उत्साही, साहसवीरांना आवश्यक ती सर्व माहिती दिली, प्रशिक्षण दिले, स्वतःची ‘सेलिंग बोट’ दिली आणि अत्यंत निष्णात असा सदुभाऊ चुनेकर नावाचा दर्यावर्दी तांडेल दिला.
मग या साहसी चमूने अॅडमिरल आवटींच्या आदेशानुसार प्रथम कलकत्ता ते मुंबई असा प्रवास केला. मग काही काळाने मुंबई ते लक्षद्वीप असा प्रवास केला. नंतर मुंबई ते कच्छ सीमेवरची सर खाडी असा प्रवास केला. अखेर नौदलाच्या ‘आयएनएस तरंगिणी’ या नौकेवरून पूर्व किनार्यावरच्या नागापट्टणम् ते इंडोनेशियापर्यंतच्या प्रवासाला ते निघाले. हा मार्ग चोल राजांचा होता. इसवी सनाच्या नवव्या शतकात तामिळनाडूमध्ये राज्य करणार्या राजेंद्र चोल याने याच मार्गाने आग्नेय आशियात आपले राज्य विस्तारले होते. त्याच्या मार्गावरून, त्याच्या नाविकांनी नोंदवलेली निरीक्षणे, आज सुमारे एक हजार वर्षांनंतर तपासत, नोंदवत प्रवास करणे, हा अद्भुत अनुभव होता.
मुकुंद देशपांडे, उमेश सोलापूरकर, विवेक गणपुले, सुरेंद्र कुलकर्णी, संदिप उन्नीयन या साहसवीरांनी जेजे आणि सदुभाऊ चुनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९९१ ते २००८ या कालखंडात केलेल्या समुद्री साहसयात्रांचा हा वृत्तांत प्रस्तुत ‘सागरवाटा’ या पुस्तकातून विवेक गणपुलेे यांनी कथन केला आहे. त्याचे शब्दांकन मैत्रेयी गणपुले-जोशी यांनी केले आहे.
या साहस सफरी फारच अनोख्या आहेत. कारण, त्या आधी किंवा त्यानंतरसुद्धा कुणाही मराठी माणसाने अशा अनोळखी सागरी वाटा धुंडाळून त्यांचा वृत्तांत मराठी वाचकांना सादर केलेला नाही. त्यादृष्टीने या पुस्तकाची गुणवत्ता मोठी आहे. पण, लेखकाने कदाचित पृष्ठसंख्या वाढते म्हणून खूपच काटछाट करून कथन केल्यासारखे वाटते. अॅडमिरल आवटी, जे. जे., सदुभाऊ, प्रा. अरुणाचलम् या महान व्यक्ती आणि ‘मेरिटाईम हिस्ट्री सोसायटी’सारख्या महत्त्वपूर्ण संस्था यांचा नीट, विस्तृत परिचय यायला हवा होता. एकंदरीतच या पुस्तकावरून जाणत्या संपादकांचा साक्षेपी हात फिरण्याची गरज होती. लेखक आणि प्रकाशक यांनी दुसर्या आवृत्तीच्या वेळेस हे अवश्य करावे.
मंगेश भायदे यांचे मुखपृष्ठ नेत्रसुखद! ‘बीज प्रकाशन’ची मांडणी, मुद्रण, निर्मिती इत्यादी तांत्रिक अंगे समाधानकारक.
पुस्तकाचे नाव : सागरवाटा
लेखक : विवेक गणपुले
मैत्रेयी गणपुले-जोशी
प्रकाशक : बीज प्रकाशन
पृष्ठसंख्या : १०४
मूल्य : २००/- रु.