
गझनीच्या महमूदाने सोमनाथ मंदिर फोडले, त्यानंतर परमार राजांना बरोबर घेऊन त्याच्याविरुद्ध उभा राहणारा आणि सोमनाथ मंदिर परत उभे करणारा पराक्रमी राजा म्हणजे सोळंकी घराण्यातला भीमदेव! राज्यकारभार स्वीकारल्यावर त्याला लगेचच या संकटाला तोंड द्यावे लागले. या राजाने आपल्या कालखंडात एक अत्यंत सुंदर मंदिराची निर्मिती केली. भारतात खूप कमी सूर्य मंदिरे आहेत, त्यातलेच एक मंदिर म्हणजे मेहसाणापासून ३५ ते ४० किमीवर असणारे मोढेरा गावातले सूर्यमंदिर. आज याच मंदिराबद्दल आपण जाणून घेऊया.दिराच्या मंडपात सापडलेल्या शिलालेखाच्या अनुसार विक्रम संवत १०८३ म्हणजे साधारण ११व्या शतकाच्या सुरुवातीला या मंदिराची निर्मिती झाली. मरू गुर्जर शैलीत या मंदिराची रचना केलेली आहे. गर्भगृह, सभामंडप, बाहेरच्या बाजूला असलेला रंगमंडप आणि समोर असणारे सूर्यकुंड हे या मंदिराचे प्रमुख भाग आहेत. मध्ययुगात परकीय आक्रमणात मंदिराचे बरेच नुकसान झाले, गर्भगृहात असणार्या मुख्य मूर्तीचा नाश झाला, आजही गर्भगृहात कुठलीही मूर्ती नाही. ज्येष्ठ अभ्यासक डॉ. किरीट मंकोडी यांनी या मंदिरावर उत्तम पुस्तकदेखील लिहिले आहे.
मंदिराची रचना ही ‘सांधार’ पद्धतीची आहे, म्हणजेच मंदिराच्या गर्भगृहाच्या बाजूने आतूनच प्रदक्षिणापथ तयार केलेला असतो. इथे असणार्या देवकोष्ठात वेगवेगळ्या सूर्याच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. मोढेरा मंदिराचा रंगमंडप हा अतिशय आकर्षक आहे. वालुकाश्म वापरून बांधलेले हे मंदिर बारीक कोरीव कामाचा अप्रतिम नमुना आहे. अनेक स्तंभांवर उभा राहिलेला हा मंडप आपल्या स्थापतींच्या भौमितिक ज्ञानाचे दर्शन घडवतो. प्रत्येक स्तंभ हा पुराने, रामायण, महाभारत अशा कथांनी सजलेला आहे, स्तंभच काय पण मंडपाच्या वितानावर (छताचा भाग)देखील आपल्याला अनेक शिल्पं दिसतात.
मंदिराच्या आवारात गेल्यावर आपल्याला सर्वांत आधी दिसतो तो तिथला कुंड. चारही बाजूंनी १८ ते २० पायर्या उतरून खाली कुंडात असणार्या पाण्यापर्यंत जायची रचना केलेली आहे. मंदिराच्या बाजूचा भाग सोडून बाकी तिन्ही ठिकाणी मध्यभागी मंदिराची रचना आहे आणि चारही बाजूंनी पायर्यांवर छोटी छोटी देवकोष्ठ तयार केलेली आहेत, यात इंद्र, विष्णु, कार्तिकेय, शिव, ब्रह्मदेव, दुर्गा, पार्वती, सरस्वती, लक्ष्मी इत्यादी देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. तिथे भेट देणार्या लोकांची संख्या वाढल्याने आणि भेट देणार्या पर्यटकांच्या बेशिस्तीमुळे आज हे कुंड चारही बाजूंनी बॅरिकेट लावून बंद केलेले आहे. कुंडाकडे जातानाच डावीकडे पुरातत्त्व खात्याने संग्रहालय तयार केले आहे, तेही प्रत्येकाने भेट द्यावे, आवर्जून बघावे असे आहे.
मंदिराच्या स्थापत्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मोढेरा सूर्यमंदिर. बाहेरच्या बाजूने मंदिर बघताना अधिष्ठान, मंडोवर, जंघा भाग, कपोत असे सर्व भाग दिसतात. अधिष्ठानात गजथर, कीर्तिमुख थर सर्व बाजूंनी कोरलेले आहेत, त्यावर असणारा जो थर आहे त्यात वेगवेगळी युद्ध, समुद्रमंथन, राजाचा प्रवास, शिकार, इत्यादी प्रसंग कोरलेले आहेत. मंडोवर म्हणजे मंदिराची बाह्य भिंत, यावर जिथे शिल्पं असतात त्या भागाला ‘जंघा’ असे म्हणतात. इथे जंघाभागात १२ आदित्य, अष्ट दिग्पाल, देवी-देवता, अप्सरा यांची मूर्ती कोरलेल्या आहेत. या मंदिरातल्या काही शिल्पांचा परिचय आपण आता करून घेऊयात.
रामायणाच्या युद्धात इंद्रजीत आणि लक्ष्मण यांचे युद्ध सुरू असताना, अस्त्राचा आघात लक्ष्मणावर झाला. याने तो बेशुद्ध पडला. हा प्रसंग या शिल्पात कोरलेला आहे. शिल्पाचे निरीक्षण केल्यास आपल्याला दिसेल की, रामाने लक्ष्मणाला आपल्या मंदिरावर घेतलेले असून, लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेत आहे. आजूबाजूला सर्व वानरसेना चिंताक्रांत उभी आहे. यात एक वानर दुसर्या वानराची समजूत काढतानादेखील दिसते आहे.
मंदिराच्या स्तंभांचा जो वरचा भाग असतो, त्याला ‘स्तंभशीर्ष’ किंवा ‘पिलर कॅपिटल’ असे म्हणतात, इथे मंदिराचे वजन तोलून धरणारे भारवाहक यक्ष कोरलेले असतात. पण, या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा भारवाहक यक्षाचा चेहरा वराह स्वरूपात आहे. प्रदक्षिणा पथावर असणार्या दोन क्रमांकाच्या स्तंभावर हे शिल्पं दिसते.
आठ दिशांचे रक्षणकर्ते देव असतात त्यांना ‘दिग्पाल’ असे म्हणतात. आग्नेय दिशेचा देव म्हणजे अग्नी. मंदिराच्या दक्षिण भागावर हे शिल्पं दिसते. पायाशी असलेले वाहन हे भग्न झालेले असून डोयाच्या पाठीमागे असणार्या ज्वालांमधून अग्नी देवतेची ओळख पटू शकते. मूर्तीचे डावीकडचे दोन्ही हात भग्न असून उजवीकडच्या हातात एक पात्र दिसते.
याच देवतांमधला वायव्य दिशेचा देवता म्हणजे वायू. एका हातामध्ये अक्षमाला आणि एक हातात पद्म पकडलेले आहे. पण, पायाशी असलेल्या वायूसारख्याच चपळ हरीण या वाहनाने ही देवता ओळखू शकतो. हरणाचे तोंड जरी क्षतिग्रस्त असले, तरी त्याचे शिंग अतिशय सुंदर कोरलेले आहेत.
हे सूर्य मंदिर आहे म्हटल्यावर सूर्य मूर्तीची ओळख करून घेणेदेखील क्रमप्राप्त आहे. मंदिरावर अनेक सूर्यमूर्ती आहेत. सूर्यमूर्ती ओळखताना पुढील काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. सात घोड्यांचा रथ आणि हातामध्ये असणारी दोन कमळे या प्रमुख खुणा आहेत. शिल्पाच्या दोन्ही बाजूला हातात धनुष्य घेतलेल्या उषा आणि प्रत्युषा असतात. दंड आणि पिंगळ हे सूर्याचे दोन सेवक आणि अरुण नावाचा सारथीदेखील रथावर बसलेला दिसतो.
मोढेरा सूर्यमंदिरापासून १५ ते २० किमी अंतरावर जागतिक वारसास्थळ असलेले ‘रानी की वाव’ हे जमिनीखाली बांधलेले सातमजली खोल मंदिर आहे. फक्त दोन तास अंतरावर अहमदाबाद हे शहर असून, हे अखंड शहर जागतिक वारसा शहर म्हणून घोषित झालेले आहे. वाटेत लोथल नावाची जागा लागते. ३ हजार, ५०० वर्षे आधी बांधलेले बंदर म्हणजे ही जागा, आपल्या जागतिक व्यापाराचे प्रदर्शन घडवणारा प्रदेश. हे सर्व काही तीन दिवसांच्या काळात बघून होते, इथून पुढे वडोदरा, सरदार वल्लभभाई पुतळा इकडेदेखील जाता येऊ शकते. महाराष्ट्रातल्या सर्व मोठ्या शहरांमधून खूप उत्तम व्यवस्था अहमदाबाद इथे पोहोचण्यासाठी उपलब्ध आहेत. जागतिक कला इतिहास आणि वारसा संवर्धन यात मोलाचे योगदान देणार्या जागा प्रत्येकाने बघाव्या अशा आहेत.