संघ आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत : राम माधव

16 Aug 2025 15:38:27

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा. स्व. संघ) आणि भाजप या दोन स्वतंत्र संघटना असल्या तरीही त्या एकाच वैचारिक कुटुंबाचा भाग आहेत. त्यामुळे रा. स्व. संघ आणि भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असे प्रतिपादन भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेस दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात संघाच्या शताब्दीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. याबद्दल समाधान व्यक्त करताना माधव यांनी विरोधकांनी निर्माण केलेल्या शंकांना ठाम उत्तर दिले. ते म्हणाले, भाजप राजकारणाच्या क्षेत्रात कार्य करते, तर संघ राजकारणाबाहेर सामाजिक सेवेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माण घडवतो. संघ आणि भाजपा हे एकाच वैचारिक परिवाराचे घटक आहेत. त्यामुळे तणाव निर्माण होण्याचे कोणतेही कारण नाही.

काही नेते केवळ राजकीय फायद्यासाठी संघाचा विरोध करतात, असे राम माधव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, संघाचे मूलभूत कार्य म्हणजे सुजाण माणूस घडविणे अर्थात ‘मॅन-मेकिंग’. हे काम समाजमान्य आहे. संघ राजकारणापासून दूर राहून विविध क्षेत्रांत सेवा कार्य करत आहे. विविध राजकीय पार्श्वभूमीतील लोक संघात कार्य करतात. काँग्रेससह इतर विचारसरणीतील लोकांनाही संघात काम करण्याची संधी आहे. मात्र काही नेते संघाचा विरोध केल्याने त्यांना राजकीय लाभ होईल, असा गैरसमज पसरवतात. त्याचप्रमाणे राजकीय टिकेसाठी अन्य कोणता मुद्दा न मिळाल्यास त्यावेळी संघ – भाजपमध्ये मतभेद असल्याचे दावे केले जातात, असेही राम माधव यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी केलेला उल्लेख प्रेरणादायी

पंतप्रधान मोदी यांनी संघाच्या १०० वर्षांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि स्वयंसेवक हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित केले. हा संदेश केवळ संघ कार्यकर्त्यांसाठीच नव्हे तर देशातील कोट्यवधी नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. पंतप्रधानांनी संघाच्या कार्याचा उल्लेख करून दिलेला संदेश स्वयंसेवकांसाठी अभिमानाचा क्षण होता. यामुळे संघाच्या कार्याकडे बाहेरून पाहणाऱ्या लोकांच्याही मनात सकारात्मक छाप पडली आहे, असेही राम माधव यांनी मुलाखतीत सांगितले.
Powered By Sangraha 9.0