‘लोकरंगनायिकां’ची उत्कंठावर्धक चरित्रगाथा

    16-Aug-2025
Total Views |

आजवर अनेक अभ्यासक-संशोधकांनी आपल्यापरिने लोकसंस्कृती-लोकसाहित्याचे जतन-संवर्धन केले आहे. अशाच परंपरेतले आजच्या काळातले अग्रणी नाव म्हणजे डॉ. प्रा. प्रकाश खांडगे होत. त्यांच्या नावाने लोकसाहित्यावर इंग्रजी-मराठीतून ग्रंथ आहेत. लोककलांची स्वतंत्र अभ्यास पद्धती त्यांनी निर्माण केली. अगणित लोककला-लोकपरंपरा त्यांनी राज्य-राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीवर पोहोचवल्या. त्यांनी लिहिलेले ग्रंथही अभ्यासपूर्ण, वाचनीय आहेत. त्या मालिकेतील ‘लोकरंगनायिका’ हा त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला ग्रंथ लोकपरंपरांचे सौंदर्य आणि सामर्थ्य दर्शविणारा म्हणावा लागेल.

लोकरंगनायिका’ या पुस्तकांत चितारलेल्या दहा लोकवतींची चरित्रे अस्वस्थ आणि धक्क करणार्या गाथाच आहेत. यात अंतर्भूत मराठी मातीतल्या चौघी आणि महाराष्ट्राचा पैस ओलांडून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभलेल्या सहा महान कलावतींचा समावेश आहे. यामध्ये मराठी मानाच्या ‘पद्मश्री’ यमुनाबाई वाईकर, ‘पद्म’ पुरस्कार विभूषित लावणी गायिका सुलोचना चव्हाण, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर आहेत. याशिवाय अभिजात लावण्यांना अर्थवाही करून लावणी लोकाभिमुख करणार्या राजश्री नगरकरही आहेत. शिवाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या लोकाभिनयाज कीर्तिवान असलेल्या छत्तीसगढच्या तीजनबाई आहेत. ‘कच्छच्या रणातील रानवेल’ म्हणून ओळखल्या जाणार्या धनाबाई कारा आहेत. पश्चिम बंगालमधील ख्यातनाम पार्वती बाउल आहेत. राजस्थानातील गुलाबो सपेरा, उत्तर प्रदेशातील गुलाबबाई नौटंकी आणि कर्नाटकातील महान लोकवती मंजम्माही आहेत. या सार्या लोकपरंपरेतल्या स्त्रिया मेरेवरच्या जनसमूहातून आलेल्या आहेत. उपेक्षितांच्या जंगलातून आलेल्या या लोकवतींच्या चितारलेल्या कथा अत्यंत संवेदनशील आणि अस्वस्थ करणार्या आहेत.

या पुस्तकात समाविष्ट लोकनायिकांच्या सान्निध्यात लेखक डॉ. प्रकाश खांडगे प्रत्यक्षी आल्याने लोकरंगाशी एकरूप झालेल्या लेखकाला वेगळे शब्द शोधायला लागले नाहीत. हर एक लोकनायिकेची कथा त्यांच्या जीवघेण्या संघर्षातून चपखलपणे बसवताना लेखकाचा अंतरीचा उमाळा पदोपदी जाणवतो. लेखकाची लोकसाहित्याची भाषा वास्तवदर्शी चित्रण उभे करते. त्यातून संवेदनेची, दुर्दशेची, करुणा आणि प्रार्थनेची तंतोतंत भाषा वाचकाला अस्वस्थ करीत राहते. सुरावटीसाठी हाती घेतलेलं तुणतुणं कुठेही बेसूर न होता, नेमकेपणाने सूर उमटवल्याचा प्रत्यय येत राहतो.

पहिली ‘लोकरंगनायिका’ आहे, ‘पद्म’ पुरस्कार विभूषित लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर. ‘महाराष्ट्राची लाडकी लेक (डॉटर्स ऑफ महाराष्ट्र)’ संबोधल्या गेलेल्या यमुनाबाईंच्या सान्निध्यात राहून अनेक पैलू लेखकाने या लेखांतून उलगडले आहेत. यमुनाबाईंनी हस्तमुद्रा, पदन्यास आणि मुद्राभिनयाच्या जोरावर मराठमोळी लावणी देशभर मिरवली-गाजवली. भरताच्या नाट्यशास्त्रातील अपरिहार्य अंगीक-वाचिक अभिनयाचे धडे यमुनाबाईंनी दिले; ख्यातनाम पं. बिरजू महाराजांनी लुब्ध होत, यमुनाबाईंच्या लावणीवर कथ्थक नृत्य सादर करणं, हा मराठीचा केवढा मोठा सन्मान होता. बैठकीची लावणी अजरामर करणार्या या लोकवतीस ‘पद्मश्री’ किताबाने गौरविलं गेलं. लोकसंगीतात मिळालेला हा एकमेव पुरस्कार होता. यमुनाबाईंच्या कथा-व्यथांचा वेध लेखकांनी मोठ्या खुबीने चितारला आहे. यमुनाबाई केवळ लावणी गात नव्हत्या, तर ती जगतही होत्या. त्यांचे डोळे गात होते. चेहरा गात होता. शरीर गात होते. त्यांच्या शरीराचेच जणू गाणे झाले होते.

ज्या गावात कीर्तन झालं नाही आणि ज्या गावाने तमाशा पाहिला नाही, असं महाराष्ट्रातलं एकही गाव नाही. मराठी लोकजीवनाशी एकरूप झालेला मनोरंजनाचा आविष्कार म्हणजे ‘तमाशा.’ अशा तमाशातील अनभिषिक्त तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर सर्वश्रुत आहेत. विठाबाईंना सर्वार्थाने रूढ करण्यात लेखकांचा मोठा सहभाग राहिला आहे. तमाशा कलेतलं अढळ ध्रुवपद विठाबाईंनी ज्या कष्टाने, संघर्षाने, जिद्दीने आणि निष्ठेने मिळविले, त्याचे साक्षीदार राहिलेले लेखक इथंपासून इतिपर्यंतचा इतिहास सहजतेने लिहू शकतात. वाचताना ते लक्षात येते.

महाराष्ट्राची अस्सल लावणी गायिका म्हणजे सुलोचना चव्हाण. त्यांच्या जडघडणीचा काळ पाहिलेले, त्यांच्या कैकदा मुलाखती घेतलेले, त्यांच्या कुटुंबीयांत समरस झालेले लेखक आपल्या आठवणी शब्द कुंचल्यांनी सहजतेने रेखाटतात. सुलोचनाबाईंच्या गायकीची नजाकत जीवनातील चढ-उतारांसह नेमकेपणाने टिपतात. मराठमोठी लावणी माजघरापर्यंत आणि पांढरपेशा महिलांना गुणगुणायला लावेपर्यंतचा सर्वार्थाने मान सुलोचनाबाईंचाच!

मराठी मानाची चौथी रंगनायिका म्हणजे राजश्री काळे-नगरकर, वयाच्या तेराव्या वर्षी त्यांच्या पायात चाळ बांधले गेले. पण, आपल्या कर्माला दोष न देता, त्यांनी चाळांनाच सुख-दुःखाचे सोबती केले. आयुष्यभर केलेले कलेच्या सारीपाठात जे-जे भोग वाट्याला आले, त्यातून स्वतःबरोबरच कुटुंबाची, मुलाबाळांची ससेहोलपट मोठ्या खुबीने लेखकाने मांडली आहे. भटयांच्या उपेक्षा त्यांच्याही वाट्याला आल्या. पण, आयुष्यात आलेल्या सुवर्णक्षणांना त्यांनी मोठ्या खुबीनं कवटाळलंही!

माना-सन्मानाच्या मराठमोळ्या कलावतींशिवाय डॉ. प्रा. खांडगेंनी भारतभरातल्या विशेषतः उत्तर भारतातल्या लोकवतींचे अनोखे दर्शनही ‘लोकरंगनायिका’त घडविलेले आहे. तेदेखील तितकेच लक्षवेधी आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरावे.

‘पंडवानी’ ही छत्तीसगढमधील आदिवासी गायनशैली जगभरात लोकप्रिय करणार्या लोककलावंत तीजनबाई! लेखकाला प्रत्यक्षात भेटीतून आपला जीवनप्रवास त्या उलगडत राहतात. ‘पंडवानी’ म्हणजे पाच पांडवांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांतील कथा. स्त्रीशक्तीचा जागर महाभारतातील ‘पंडवानी’सारख्या मिथकाचा वापर करून त्यांनी आयुष्यभर साकारला. भटयांचे जीवनभोग वाट्याला आलेल्या आणि पतीला सोडून तीन मुलांना घेऊन घराबाहेर पडलेल्या, वेदना उराशी कवटाळून केलेला संघर्ष म्हणजे तीजनबाई. आयुष्यभर त्या मातीने गाणे गायल्या. छत्तीसगढच्या ‘नाच्या’ शैलीचे संस्कार तीजनबाईंच्या अभिनय आणि गायनात होते, त्यामुळे त्यांच्या अभिनय-गायनाला संमोहित करणारी लयबद्धता प्राप्त झाली होती. त्यांच्याकडून द्रौपदी वस्त्रहरण कथा ऐकून पंडित जसराजही हळहळले होते. तीजनबाईंच्या आयुष्याची चित्तरकथा चित्रपट कथेला शोभेल अशीच आहे, असे नमूद करून ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविलेल्या तीजनबाई समकालीन संदर्भांसह प्रकट होणारी यशोगाथा आहे.

‘कच्छच्या रणातील रानवेल’ अशा सार्थ उक्तीने प्रशंसा केलेली लोकवती म्हणजे धनाबाई कारा. गुजरातमधील लोककला संगीतातील हे एक प्रसिद्ध नाव. त्या जशा लोकगीत गायिका होत्या, तशा प्रतिभाशाली कवयित्रीदेखील होत्या. त्यांची गीते अजूनही गुजरात आणि त्यातही कच्छच्या भूमीत लोकगीतांसारखी अधिराज्य गाजवून आहेत. लेखक धनाबाईंचं वर्णन करताना म्हणतात, "धनाबाई म्हणजे मातीला पडलेले मातीचे स्वप्न, तहानेला लागलेली तहान आणि लोकधुनीची आर्त तान...! धनाबाई कारा गुजरातच्या लोकसंगीताचा, लोकगीतांचा, लोकनृत्याचा मानदंड झाल्या, हा विलक्षण चमत्कार आहे.”

‘लोकरंगनायिका’ या लेखसंग्रहात समाविष्ट पार्वती बाउल हा या सगळ्यांमधला अपवाद. सनातनी ब्राह्मण कुटुंबातला त्यांचा जन्म. पार्वती बाउल स्वेच्छेने ‘बाउल’ परंपरेकडे वळल्या. एखाद्या अभिजात परंपरेतल्या कलावंताने एखाद्या लोककलेकडे आवडीने, स्वयंस्फूर्तीने वळावं, तशा वळल्या आणि त्यांनी स्वतःच्या पूर्वसिद्ध कलानिपुणतेच्या बळावर ‘बाउल’ संगीताला राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून दिला. ‘डुग्गी’, ‘नुपूर’, ‘एकतारा’ या वाद्यांच्या साथीने पार्वती यांनी आपले कार्यक्रम सुरू केले. त्यांची खासियत अशी की, त्यांच्या कार्यक्रमांत नाट्यतंत्राचा वापर असे. पदगायन, निरुपण, नर्तन, वादन यांचा सुमेळ म्हणून पार्वती यांचा प्रयोग ओळखला जातो. पार्वती यांची अशी अनेकविध रूपे लेखकांनी नेमकेपणाने मांडल्याने कृष्णरंगी रंगलेली बंगकन्या सहजतेने समजत राहते.

या मालिकेतील मंजम्मांची कहाणी चित्तथरारक आणि वेधक आहे. लेखकांनी मंजम्मांचं उत्कट भावनेने केलेलं शब्दचित्रण वास्तव असल्याने त्यातली दाहकता अस्वस्थ करते. पाचव्या इयत्तेत शिकत असतानाच, मंजुनाथाला आपल्यातल्या स्त्रीत्वाची जाणीव झाली. तो काळ त्याच्यासाठी मोठ्या मानसिक आणि शारीरिक संघर्षाचा होता. साधारणतः बाराव्या वर्षांपासून मंजुनाथ एक स्त्री म्हणून वावरू लागला. साडी नेसू लागला. कुंकू, पावडर लावू लागला. आईला मदत म्हणून पाणी आणू लागला. रांगोळी काढू लागला. असे शारीरिक-मानसिक बदल टिपल्यानं मंजम्मा जोगतिणीचं आयुष्य डोळ्यांपुढे सहज तरळू लागतं. स्वतः लेखक त्यांना भेटण्यासाठी कर्नाटकातील इलाख्यात जाऊन त्यांची कथा आत्मीयतेनं उभी करताना दिसतात. पूर्वाश्रमाचा ‘मंजुनाथ’ ‘मंजम्मा जोगती’ कसा झाला, त्यातल्या व्यथा काळीज पिळवटून टाकणार्या आहेत. मंजम्मांना ‘पद्म’ पुरस्कार मिळतानाच्या सोहळ्यात राष्ट्रपती भवनातील शिष्टाचारांहून भारतीय परंपरा कशी श्रेष्ठ आहे, याचा वस्तुपाठ लेखकाने अतिशय तन्मयतेने मांडला आहे.

राजस्थानातही लोकनृत्याची समृद्ध परंपरा. राजस्थानातील सर्पकन्या गुलाबो सपेरा यांनी ‘कालबेलिया’ या लोकनृत्य शैलीतून आपला ठसा उमटवला आहे. सपेरा म्हणजे साप. सापाचं नृत्य करून दाखविणारी ही राजस्थानातील आदिवासी जमात. ‘अपना उत्सव’च्या प्रसिद्धी समन्वयक म्हणून काम करताना आणि विविध वेळी लेखकांना गुलाबी सपेरांना भेटण्याचा, त्यांचे लोकनृत्य पाहण्याचा योग आला. त्यातून गुलाबो उमटत गेल्या. स्त्रीमुक्तीचा त्यांनी दिलेला लढा, तिसरी मुलगी झाली म्हणून मातीत पुरली गेलेली सपेरा, पुढे सगळ्या वाईट प्रथांना पुरून उरलीच! त्यांचा हा प्रवास उत्कट शब्दांतून लेखकाने गुंफला आहे.

‘कालबेलिया’ या शब्दात ‘काल’ म्हणजे ‘मृत्यू’ आणि ‘बेली’ म्हणजे ‘मित्र.’ मृत्यूशी केलेली मैत्री. या प्रख्यात लोकनायिकेने १६५ देशांमध्ये ‘कालबेलिया’चे कार्यक्रम करून जगभर दिगंती कीर्ती मिळवली आहे. त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या ‘लोकरंगनायिके’ची जीवनकहाणी वाचून वाचक एका वेगळ्याच अनुभूतीचा द्रष्टा अनुभव येतो.

‘लोकरंगनायिके’च्या मालिकेतील पुढची नायिका म्हणजे गुलाबबाई. महाराष्ट्रात जसा ‘तमाशा’ तशीच उत्तर प्रदेशातील लोकप्रिय झालेली ‘नौटंकी’ हा लोककला प्रकार. आपल्या ‘तमाशा’त पहिली स्त्रीनर्तिका म्हणून पवळा हिवरगावकर होऊन गेल्या, तशाच ‘नौटंकी’त काम करणार्या पहिल्या स्त्री कलावंत म्हणजे गुलाबबाई. त्यांच्यापासूनच स्त्री कलावंतांची परंपरा सुरू झाली. त्यांची कन्या मधू यांजकडून लेखकांनी जे वास्तव जमा केलं, त्यातून गुलाबबाईंच्या जीवनव्यथा त्यांना चितारता आल्या. गुलाबबाई उत्तम गायकही होत्या. अंगभूत अभिनय आणि गायन यांतून त्यांनी ‘नौटंकी’ला अमाप प्रसिद्धी मिळवून दिल्याचा बारीकसारीक तपशील लेखकांनी तन्मयतेने मांडल्याने हा भागही उत्कंठावर्धक आणि वाचनीय आहे. या कलावतीस भारत सरकारने १९९० साली ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले. गुलाबबाईंनी या कलेसाठी जे आयुष्य पणाला लावलं, म्हणूनच आजवर ‘नौटंकी’ बरोबर त्यांचं नाव टिकून आहे, असंही लेखक नमूद करतात.

‘लोकरंगनायिका’ ही शब्दरूपी कलाकृती प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहिलेल्या डॉ. प्रा. प्रकाश खांडगे यांनी अभिनिवेषाने मांडल्या आहेत, ज्या अंतरिक तळमळीतून रेखाटल्या आहेत. त्यांचं मोल नक्कीच वाखाणण्यासारखं आहे. हरएक रंगनायिकेच्या वाट्याला आलेलं शोषण, उपेक्षा, दारिद्य्र, अवहेलना भारलेपणासह मांडल्याने या ग्रंथाचे मोल अधिक आहे. प्रत्येक कलावंतीणीचा ध्यास, त्यांची कलेवरची निष्ठा, लढावू वृत्ती, ज्या लोकबोलीतून साकारली आहे, अशी कलाकृती लोकसाहित्यात पहिल्यांदाच उमटली आहे. मराठी वाणा-बाणाला तमाम वाचक भरभरून प्रतिसाद देतील.

प्रभाकर ओव्हाळ
(लेखक साहित्यिक आणि लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)
९८२२६५५१९१