बोरन्हाण - एक भावस्पर्शी नाट्यप्रयोग

    16-Aug-2025
Total Views |

श्रावण महिन्यात घरगुती सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांनी एका बाळाचे ‘बोरन्हाण’ कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले. परंपरेनुसार हा कार्यक्रम लहान मुलांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या नाट्यप्रयोगात प्रौढ माणसे जमतात आणि साजरा करतात. त्यांच्या घरातील लहान मुलं त्रासदायक असतात, कार्यक्रमांमध्ये कशी अडचण निर्माण करतात, अशा गमतीशीर तक्रारी ते करू लागतात. शेवटी ते ठरवतात की, मुलांशिवायच कार्यक्रम शांततेत पार पडेल.

याच क्षणी सुरू होतो मुलांचा अभिनय! लहान मुलं वृद्धांची नक्कल करतात, त्यांच्या लकबी, बोलण्याची ढब उचलून विनोदी पण विचार करायला लावणारे प्रसंग रंगवतात. त्यातून मुलं काही गंभीर प्रश्न प्रौढांना विचारतात. नाटकाच्या शेवटी बालकलाकारांनी प्रौढ प्रेक्षकांना विचारलेले प्रश्न गंभीर आहेत; विचार करायला लावणारे आहेत. कल्पनारम्य नाटकातून उत्पन्न झालेले हे मुलांचे प्रश्न आहेत; याकडे आपण मोठ्यांनी गांभीर्याने बघायला हवे. हे प्रश्न बालकलाकार मोकळेपणाने मांडू शकले. हे शय केले नाटकाने! नाटकाचे माध्यम वापरून प्रेक्षकांना विचारलेले प्रश्न कितीही बोचणारे असले, तरी ते बोचत नाहीत. का? कारण ते कल्पकतेने, भावनांचा आदर करून, प्रेक्षकांपासून अंतर ठेऊन विचारलेले आहेत. त्यामुळे ते थेट जरी असले, तरी रंगभूमीवरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचता पोहोचता ते सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पोहोचतात. प्रश्न सगळ्यांना उद्देशून असल्याकारणाने कोणाएकालाच सांगितल्यासारखे होत नाही. असे अनेक प्रश्न मुलांना पडतात, ज्याची हवी तशी समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. किंबहुना आपण त्यांना समजावून सांगत नाही. मुलांनी बसवलेले मुलांचे नाटक; पण वयाने मोठ्या प्रेक्षकांसाठीचे हे ‘बोरन्हाण’ नाटक सगळ्यांनी विचारात घेतले. मुलांनी नाटकाच्या शेवटी असे प्रश्न का विचारले असतील? त्यांची नेमकी उत्तरे त्यांना मिळतील का? असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आला. या लेखात आपण त्यांचे प्रश्न, त्यामागची भूमिका, बालमानसशास्त्र, पालकांची भूमिका, त्यांच्या समस्या जाणून घेऊ या.

बाल कलाकारांचे प्रेक्षकांना विचारलेले प्रश्न

तुम्ही म्हणता आम्ही भांडतो; पण आईबाबा आम्ही तुम्हाला पाहिले आहे की, तुम्हीही एकमेकांशी भांडता.

मुलांना वारंवार आपण सांगतो भांडू नका. पण, नकळत भांडायचे कसे ते आपल्याला बघूनच शिकतात. मुलांनी भांडायचेच नाही, असे आपल्याला वाटणे साहजिक आहे. पण, त्यांचे भांडण अनेकदा प्रयोगशील असते. त्यांना त्यातून मजा येते. त्यांचे म्हणणे पटवून द्यायचे असते. आवाज मोठा करून पाहायचा असतो. रडून, चिडून महत्त्व वाढवून घ्यायचे असते. मी मोठा आहे, मला जास्त कळते हे सांगायचे असते. मी लहान मुलांच्या भांडणात टोकापर्यंत गेल्याशिवाय मध्ये पडत नाही. अगदी गरजच पडली तर म्हणते, अजून मोठ्याने भांडा. याचा परिणाम होतो. मुलं शांत होतात आणि सामंजस्याने प्रश्न सोडवायला तयार होतात. आईबाबा भांडतात, तेव्हा मुलांना आवडत नाही, ते हताश होतात. आपण काहीच करू शकत नाही या विचाराने निराश होतात. असे होऊ नये म्हणून आईबाबांनी मुलांसमोर भांडू नये.

कधी विचार करता का, आम्ही विचित्र वागतो त्यामागे काही कारण असू शकते?

मुलं विचित्र वागतात ते आपल्याला दिसले की, लगेचच त्याच्या मागचे कारण शोधून काढणे गरजेचे आहे. अशी कुठली गोष्ट आहे जे ते आपल्याला सांगू शकत नाहीत? असे नेमके काय बिनसले आहे? कशाचा त्रास होतो आहे, हे शोधणे गरजेचे आहे. बर्याचदा या समस्या विचित्र वातावरणामुळेसुद्धा असू शकतात. विचित्र वागले म्हणून फटकारणे योग्य आहे. पण, त्याच्या मुळाशी गेलो नाही, तर मग फटकारा वाया जाणार. मुलं हा प्रश्न नाटकातून विचारता आहेत; पण सामान्यतः ते विचारू पण शकणार नाहीत.

तुम्ही काय बोलता, कसे वागता हे आम्ही लक्ष देऊन पाहतो, अगदी अलेसासारखे.


अलेसा हे यंत्र आजकाल घराघरात पोहोचलेले आहे. त्यातली बाई तिचे नाव घेताच सगळे ऐकते. तिच्याशी बोललो नाही, तरी ती ऐकत असते. मुलं आहेत, ती काही ीशरलीं करत नाहीत, याचा अर्थ घरच्यांनी असा समजू नये की ऐकत नाहीत. ती ऐकतातही आणि तुमचे निरीक्षणही करतात. भाषेचे संस्कार होत नसले, तरी मनावर आपोआप संस्कार होत असतात, याची नोंद घ्यायला हवी.

आम्ही काही न केल्यावरही तुम्ही आमच्यावर ओरडलात की, आम्हाला खूप वाईट वाटते.


कोवळ्या मनावर घाव गहिरे होतात. मनाचा ताबा सुटला, दिवस वाईट गेला, कामाचा ताण आला की, मुलांबरोबर खेळण्याऐवजी त्यांना आपण ओरडलो, असे झाले आहे का? हो तुमचेसुद्धा? असे प्रसंग सर्वांबरोबर कधी ना कधी घडतात. पण, कोवळ्या वयात जर वारंवार तसे झाले, तर मुलं तुमच्याशी बोलेनासे होतात, त्यांना बोलायची भीती बसू शकते. मुलांना वाईट वाटते, त्यांना रडूही येते. मग अशावेळी काही वेळाने का होईना, मुलाला जवळ घेऊन परिस्थिती समजावून सांगणे गरजेचे आहे, तेही थोड्या शब्दात.

कधी खरं-खोटं कळेनासे होते. विचारले तर म्हणता, किती प्रश्न विचारता? त्यामुळे आम्ही गोंधळतो.

मुलांचे असे होणे साहजिक आहे. खोटे बोलायचे नाही, हे आपण हमखास शिकवतो; पण आपण नेहमी खरंच बोलतो का? बॉसला सांगतो आजारी आहे. नणंदेला सांग मला वेळ नाही आहे. असे संवाद जर आपण करत असू, तर खोटे बोलणे आपण मुलांसमोर नॉर्मल करत आहोत, हे लक्षात घ्या.

घरी खेळलो तर म्हणता बाहेर जा, बाहेर खेळलो तर तिथले मोठे ओरडतात. नेमकं आम्ही काय करावे?

आपण लहान मुलं मोठ्यांना नको आहोत, अशी भावना जन्माला येऊ शकते. मुलांच्या छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष केले, तर त्या समस्या मोठ्या होऊ शकतात. छोट्या समस्यांचे छोटे समाधान देणे कधीही चांगले, नाहीतर त्याच पुढे जाऊन मोठ्या होतात.

मराठीत बोला म्हणता, पण मराठी बोलल्यावर इंग्रजी सुधारा म्हणता. मग आम्ही कन्फ्युज होतो.

भाषा आणि संस्कृती दोन्ही जपली पाहिजे. भाषेची भेळ आणि संस्कृतीचा उपहास होता कामा नये. मुलांना योग्य तेच आपण देतो; पण त्यात विचारांची, संस्कृतीची, भाषेची भेसळ नको, नाहीतर मुलं कन्फ्युज्ड राहणार.

आम्ही सगळं समजून घेतो. कारण, आमचे तुमच्यावर प्रेम आहे. आणि आम्हाला माहीत आहे की, तुमचेही आमच्यावर खूप प्रेम आहे.

हे वाय प्रेक्षकांचे मन जिंकते. त्यांच्याकरिता जग अगदी साधे, सोपे असते.

या नाटकाद्वारे मुलांचे मनोगत हलया-फुलया विनोदी शैलीत मांडले गेले. ‘बोरन्हाण’ या पारंपरिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सादर केलेला हा नाट्यप्रयोग केवळ एक करमणूक नसून, मोठ्यांनी विचार करण्याची एक संधी होती. आपल्या लहानग्यांचे प्रश्न ऐकण्याची, त्यांचे भाव समजून घेण्याची.

हा प्रयोग मुलांनीच लिहिला, बसवला. मी त्याचे संकलन केले आणि फक्त मार्गदर्शन केले. त्यामुळे तो खराखुरा आणि मनाला भिडणारा ठरला.

रानी राधिका देशपांडे