चीनमध्ये काळी जादू!

16 Aug 2025 12:31:31

तुमचा पाळलेला पशू मृत झाला आहे आणि तुम्हाला त्याची आठवण येते का? तुमच्या मृत पाळीव प्राण्यासोबत बोलायचे आहे का? मृत पावल्यानंतर त्या प्राण्याचा पुनर्जन्म झाला का? तो कसा आहे वगैरे पाच प्रश्न विचारून उत्तर मिळवायला १८ डॉलर्स, तर सहा महिन्यांच्या कालावधीत अमर्याद प्रश्न विचारायला ४२० डॉलर्स लागतील! असा अंधश्रद्धेची परिसीमा असलेला थोतांड धंदा सध्या चीनमध्ये सुरू आहे. विशेष म्हणजे, आपल्या मृत पाळीव प्राण्याच्या आत्म्याशी बोलण्यासाठी चिनी लोक मोठ्या संख्येने जातातही! काय म्हणावे या अंधश्रद्धेला?

कम्युनिस्ट चीनमध्ये सार्वजनिक जीवनात लोक तांत्रिक विद्या, काळी जादू, अंधश्रद्धा यांना आजही मानतात. कारण, तिथे त्यांच्या पूर्वज राजघराण्यांमध्ये कशी काळी जादू वगैरे केली जायची, याच्या कथा पिढ्यान्पिढ्या सांगितल्या जातात. त्यापैकी एक हान वंशाच्या राजाची लाडकी दासी चेन जियांग ही नंतर त्याची पत्नी बनते. राजाला ताब्यात ठेवण्यासाठी ती काळ्या जादूचा वापर करते. ती चुफू नावाच्या तांत्रिक विद्या जाणणार्‍या महिलेला भेटते. राजा वशमध्ये राहावा म्हणून त्याची बाहुली बनवून त्याच्यासोबतच्या संबंधांचे चित्र जियांग बनवत असते. राजाच्या दुसर्‍या राण्यांना संशय येतो. चेन जियांग काळी जादू करते म्हणून कारवाई होते. पण, या कारवाईमध्ये चुफू हिच्यासकट ३०० जणांना मृत्युदंड दिला जातो. मात्र, राजावर काळी जादू केली, असा जिच्यावर आरोप असतो, त्या चेन जियांगला राजा मुक्त सोडतो. चीनमध्ये वदंता आहे की, काळ्या जादूसाठी ३०१ जणांना मृत्युदंड दिला गेला. मात्र, जियांगला मुक्त सोडून दिले. याचाच अर्थ जियांगने राजावर काळी जादू करून त्याला वशमध्ये केले होते आणि चीनमधले तांत्रिक-मांत्रिक स्वतःला याच चेन जियांगचे वंशज मानतात.

असो! आपल्या घरी पैशाचा पाऊस पडावा, ही तर सगळ्यांची इच्छा असतेच. त्यासाठीही चीनमध्ये तोडगा आहे. (अंधश्रद्धेचा!). कोट्यवधींची उलाढाल करणार्‍या बँकेच्या आसपासची माती घ्यायची आणि घरात ठेवायची. मग घरात पैसेच पैसे येतील. अर्थात, कोणतीही बँक अशी त्यांच्या वास्तूतील माती उकरून काढायला परवानगी देतच नाही. मग चिनी लोक ती माती चोरून आणतात. इथल्या काही लोकांनी नामी शक्कल लढवली. त्यांनी संकेतस्थळच सुरु केले. त्यावरुन दावा केला की, ‘बँक ऑफ चायना’, ‘इंडस्ट्रियल अ‍ॅण्ड कमर्शियल बँक ऑफ चायना’, ‘अ‍ॅग्रीकल्चरल बँक ऑफ चायना’, ‘चायना कन्स्ट्रक्शन बँक’ आणि ‘बँक ऑफ कम्युनिकेशस’ या पाच बँका कोट्यवधींची उलाढाल करतात. याच बँकांची एकत्रितरित्या मिसळलेली माती आम्ही विकतो. चिनी प्रसारमाध्यमांनुसार पाच बँकांची एकत्रित केलेल्या मातीचे पाऊच घेण्यासाठी चिनी लोकांची झुंबड उडते. ८८८ युआन (१२० डॉलर्स ) देऊन लोक ती माती विकतही घेतात.

चीनमध्ये अंधश्रद्धा, जादूटोणा, काळी जादू वगैरे वगैरेवर विश्वास ठेवणारे लोक आजही मोठ्याप्रमाणात आहेत. काही महिन्यांपूर्वी चीनच्या शांघायमध्ये एका कंपनीत पाच कोटी रुपयांची चोरी झाली. चोरी करणार्‍या तरुणीला पकडण्यात आले. पाच कोटी रुपये का चोरले? याबद्दल चौकशी केली असता तिने सांगितले, तिचे एका तरुणावर प्रेम होते. त्याचेही त्या मुलीवर प्रेम होते. पण, आता तो मुलगा तिच्यावर प्रेम करत नाही. त्याचे प्रेम परत मिळवण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. पण, तो परत आला नाही. शेवटचा पर्याय म्हणून तिने काळी जादू करायचे ठरवले. त्या काळ्या जादू करणार्‍याने तिला प्रेम परत मिळवणारा तावीज द्यायचे कबूल केले. पण, त्याची किंमत पाच कोटी होती. इतके पैसे तिच्याजवळ नव्हते म्हणून, तिने ते पैसे चोरले. अर्थात, पाच कोटी दिल्यानंतर त्या तावीज देणार्‍या काळी जादू करणार्‍याने तिथून पोबारा केला. तो तसे करणारच होता. कारण, तावीजने जर प्रेम मिळाले असते, तर मानवी प्रेमभावना या जगात कशाला असत्या? तसे पाहायला गेले, तर अंधश्रद्धेच्या विळख्यात जगभरातले लोक अडकले आहेत. या परिप्रेक्ष्यात काळ्या जादूच्या अंधश्रद्धेने साम्यवादी चीनचे सामाजिक जीवन जगासमोर आले एवढेच!
Powered By Sangraha 9.0