मुंबईचे डबेवाले म्हणजे मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक अविभाज्य भाग! मागच्या एका शतकाहून अधिक काळ अविरतपणे मुंबईकरांना सेवा देणार्या डबेवाल्यांच्या व्यवस्थेचा गौरव जागतिक स्तरावर केला गेला. कर्तव्य आणि सेवा या संगमातून निर्माण झालेली डबेवाल्यांची सेवा ही मुंबईकरांच्या साम्यर्थाचे एक प्रतीक आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचा हाच इतिहास, आता मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. १४ ऑगस्ट रोजी वांद्रे येथे ‘मुंबई डबावाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चे लोकार्पण संपन्न झाले. त्याच पार्श्वभूमीवर या वस्तुसंग्रहालयाचा घेतलेला आढावा.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतामध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले आणि मुंबई शहर धावतं झालं. तत्कालीन इंग्रज शासनाच्या धोरणानुसार मुंबईमध्ये औद्योगिकीकरणाचे वारू चौफेर उधळले गेले. पुढील काही दशकांमध्ये मुंबईचे रूपांतर भारताच्या आर्थिक सत्ताकेंद्रात झाले. स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, यासाठी या मातीतील भूमिपुत्रांना अतोनात संघर्ष करावा लागला. काळाची पाने वेगाने उलगडत गेली आणि मुंबई अधिक वेगाने धावतच राहिली. या मायानगरीच्या पायाला जी भिंगरी तेव्हा लागली होती, तिच्यामुळे आजही इथले कोट्यवधी लोक धावत आहेत. ही धावपळ कशासाठी, तर पोटासाठी! कामावर पोट आणि पोटासाठी काम, अशा या जंजाळातून कुणाचीच सुटका झाली नाही. पोटात जर सकस अन्न असेल, तरच काम करायची शक्ती मिळते.
घरातल्या जेवणाची लज्जत चाखायला मिळावी, अशी आशा एका बँकेत काम करणार्या माणसाने धरली. त्याच्या या इच्छेसाठी धावून गेले ते महादेव हावजी बच्चे, ज्यांनी त्यांच्यापर्यंत घरगुती जेवणाचा डबा पोहोचवला आणि इथेच मुंबईच्या डबेवाल्यांची वारी सुरू झाली.
१८९०चा तो काळ, महादेव हावजी बच्चे यांच्या कार्यातून ‘मुंबईचे डबेवाले’ ही आगळीवेगळी संकल्पना जन्माला आली आणि मुंबईकरांच्या ‘डीएनए’चा एक अविभाज्य भाग बनली. एका शतकाहून अधिक काळ मुंबईचे डबेवाले कार्यरत राहिले व आजसुद्धा त्यांची घोडदौड तशीच सुरू आहे. काळ बदलला, समाज बदलला, परंतु घड्याळाच्या काट्यावर धावणार्या मुंबईला आजसुद्धा या डबेवाल्यांचा आधार आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचा हाच इतिहास उलगडून दाखवणारी वास्तू मुंबईकरांसाठी खुली झाली आहे. दि. १४ ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वांद्रे येथील ‘मुंबई डबावाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चे लोकार्पण पार पडले. मुंबईच्या डबेवाल्यांचा इतिहास, आधुनिक तंत्राच्या आधारे लोकांसमोर मांडणारे हे वस्तुसंग्रहालय आता प्रेक्षकांसाठी सज्ज झाले आहे.
मुंबईसारख्या महानगराला जितका अवाढव्य भूगोल आहे, तितकाच किंबहुना त्यापेक्षा अधिक समृद्ध इतिहासदेखील आहे. सात बेटांना एकत्र करून तयार झालेलं हे शहर, देशाची आर्थिक राजधानी म्हणून, कोट्यवधींच्या संसाराचा गाडा हाकत आहे. लोकल ट्रेन म्हणजे या शहराची जीवनवाहिनी! हे शहर चालवणारे आणि क्रमाने (देश चालवणारे) कोट्यवधी लोक या लोकलमधूनच प्रवास करतात. याच लोकलमधून प्रवास करताना आपल्या नजरेस येतात काही साधी माणसं. कपाळावर केशरी टिळा, डोयावर गांधीटोपी, पांढरा सदरा किंवा पांढरं शर्ट आणि धोतर परिधान केलेली ही मंडळी म्हणजे अन्नपूर्णेचे संपर्कसेतू, अर्थात मुंबईचे डबेवाले! लोकलमध्ये चढल्यानंतर विठूनामाचा गजर करत ही मंडळी, कर्मचारी वर्गापर्यंत डबा पोहोचवण्यासाठी अक्षरश: जीवाची मुंबई करतात. कार्यालयात जेवणाची वेळ होण्यापूर्वी, त्या त्या ठिकाणच्या कर्मचार्यांना घरचा डबा पोहोचलेला असतो. मागची कित्येक दशकं डबावाल्यांची ही वारी अखंडितपणे सुरू आहे. या वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून मुंबई पालथी घालायला येणार्या पर्यटकांना, इतिहास अभ्यासकांना मुंबईच्या डबेवाल्यांची ही वारी अनुभवायला मिळणार आहे.
खरं तर मुंबईसारख्या शहराच्या अंतरंगात अशी अनेक वारसास्थळे दडलेली असतात. वारसा म्हणजे केवळ एखादी जागा किंवा एखादी वास्तू नाही, तर पिढ्यान्पिढ्या सुरू असलेली एखादी परंपरा, एखादा व्यवसाय हासुद्धा त्या शहराशी जोडलेला असतो. सदर वस्तुसंग्रहालयाला नाव देतानासुद्धा ‘अनुभव केंद्र’ असे संबोधित करण्यात आले आहे. कारण, मुंबईच्या डबेवाल्यांची संस्कृतीसुद्धा, केवळ ऐकिवात किंवा वाचून कळणारी नाही, तर तिला जोड हवी ती अनुभवाचीच!
वस्तुसंग्रहालयात प्रवेश करतानाच, श्रीविठ्ठलाची असलेली मनमोहक मूर्ती डबेवाल्यांच्या सेवा अधिष्ठानावर भाष्य करते. भागवत धर्माची पताका, सर्वदूर फडकावणार्या वारकरी संप्रदायाच्या सेवेचा विचार आपल्याला मुंबईच्या डबेवाल्यांच्या कामामध्ये दिसून येतो. डिजिटल प्रिंटच्या माध्यमातून, मुंबईच्या डबेवाल्यांचा स्फूर्तीदायक प्रवास आपल्याला या वस्तुसंग्रहालयात बघायला आणि अगदी ऐकायलासुद्धा मिळतो. सुरुवातीच्या काळात जेवणाच्या डब्यावर रंगीबेरंगी धाग्यांच्या माध्यमातून, खुणा करत डबे पोहोचवले जायचे. १९५०च्या दशकानंतर या धाग्यांची जागा तैलरंगांनी घेतली. यानंतर १९७०च्या दशकानंतर सांकेतिक भाषा प्रणालीचा विकास झाला आणि अक्षर आणि अंक यांच्या जोडीतून मुंबईचे डबेवाले संवाद साधू लागले. कालौघात अशा पद्धतीने संवाद साधण्याचे माध्यम बदलले; परंतु घरगुती जेवणाची चव मात्र तशीच राहिली. ही सांकेतिक भाषा नेमकी कशी काम करते, याचीसुद्धा माहिती आपल्याला इन्फोग्राफिसच्या माध्यमातून बघायला मिळते.
इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स २००३ साली भारतात आले होते. त्यावेळेस त्यांनीसुद्धा डबेवाल्यांच्या या कामाचं विशेष कौतुक केलं. प्रख्यात व्यावसायिक रिचार्ड ब्रॅन्सन यांच्यासारख्या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांनीसुद्धा मुंबईच्या डबेवाल्यांचा गौरव केला. व्यवस्थापकीय विश्वामध्ये व्यवसायाच्या कार्यक्षमतेसाठी ‘सिस सिग्मा’ ही संज्ञा वापरली जाते. याच धरतीवर १९९८ साली ‘फोर्ब्स’ या मासिकाने मुंबईच्या डबेवाल्यांच्या कामाला ‘सिस सिग्मा’ दर्जा बहाल केला. एकाच वेळेला कार्यक्षमता, वक्तशीरपणा, तत्परता अशा अनेक गुणांचा मिलाप असणारी ही कार्यप्रणाली जगाच्या पाठीवर, एक आदर्श वस्तूपाठ म्हणून समोर आली आहे.
या वस्तुसंग्रहालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’ (वीआर)च्या माध्यमातून डबेवाल्यांचा प्रवास हा नेमका कसा होतो, हेसुद्धा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मुंबईकरांची क्षुधाशांती करण्यासोबतच, सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मुंबईच्या डबेवाल्यांनी पंढरपूर, जेजुरी, भीमाशंकर यांसारख्या तीर्थक्षेत्रांवर भाविकांसाठी धर्मशाळासुद्धा उभारल्या आहेत. कर्तव्य आणि सेवा या दोन्हींच्या संगमातून तयार होणारी भक्ती कशी असते, याचीच आपल्याला यामधून प्रचिती येते. मुंबईचे डबेवाले म्हणजे मुंबईचा जिवंत इतिहास. हा इतिहास आणि वारसा अनुभवण्यासाठी या वस्तुसंग्रहालयाला नक्कीच भेट द्यायला हवी.