घुसखोरीचे षडयंत्र मोडून काढणार, घुसखोरांना हाकलून लावणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल किल्ल्यावरून घोषणा

15 Aug 2025 16:34:24

नवी दिल्ली, नियोजनबद्ध षडयंत्र करून देशाच्या लोकसंख्येची रचना बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. घुसखोरांना वसवून देशातील वनवासी, माता आणि भगिनींनी लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र, यापुढे हा प्रकार खपवून घेतला जाणार नसून घुसखोरांविरोधात ‘हाय पॉवर डेमोग्राफी मिशन’ सुरू करून घुसखोरांना देशाबाहेर काढले जाईल; अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात देशास संबोधित करताना केले आहे.

देशासमोर सध्या एक नवीन समस्या उभी राहिली आहे. ठरवून रचलेल्या कटांतर्गत देशाची लोकसंख्या रचना (डेमोग्राफी) बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कारस्थानामुळे एक नवे संकट पेरले जात असून घुसखोर आपल्या तरुणांचे रोजगार हिरावून घेत आहेत, आपल्या बहिणींना व मुलींना लक्ष्य बनवत आहेत, हे अजिबात सहन केले जाणार नाही. हे घुसखोर भोळ्या-भाबड्या वनवासी बांधवांना फसवून त्यांच्या जमिनींवर कब्जा करत आहेत. सीमावर्ती भागात डेमोग्राफीमध्ये बदल झाल्यास राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर संकट निर्माण होते, देशाच्या एकतेला, अखंडतेला आणि प्रगतीला धोका पोहोचतो, तसेच सामाजिक तणावाचे बीज रोवले जाते. कोणताही देश आपला भूभाग घुसखोरांच्या हवाली करत नाही, तर मग भारत कसा करू शकेल?. आपल्या पूर्वजांनी त्याग व बलिदानाने मिळवलेले स्वातंत्र्य आपण जपणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे अशा हालचालींना विरोध करणे हाच त्यांना खरी आदरांजली ठरेल. म्हणूनच आता केंद्र सरकारने “हाय पॉवर डेमोग्राफी मिशन” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मिशन निश्चित कालमर्यादेत, ठरवून आखलेल्या योजनेनुसार, या गंभीर संकटाला तोंड देण्यासाठी काम करेल आणि घुसखोरांना त्यांची जागा दाखवून देईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शौर्य दाखवणाऱ्या वीर जवानांना सॅल्यूट करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारताच्या शूर सैनिकांनी शत्रूला त्यांच्या कल्पनेपलीकडची शिक्षा दिली. पहलगाममध्ये सीमापारून आलेल्या दहशतवाद्यांनी निर्दयी हल्ला केला, धर्म विचारून लोकांची हत्या केली, पत्नीसमोर पतीला गोळ्या घातल्या, मुलांसमोर वडिलांचा जीव घेतला. या नरसंहाराने संपूर्ण हिंदुस्तान संतापाने पेटून उठला, आणि जगही हादरले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे त्याच संतापाचे प्रत्युत्तर होते. केंद्र सरकारने सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि आपल्या सैन्याने ते करून दाखवले, जे अनेक दशकांत घडले नव्हते—शेकडो किलोमीटर आत शत्रूच्या भूमीत घुसून दहशतवादी मुख्यालये उध्वस्त केली, इमारती जमीनदोस्त केल्या. पाक अजूनही या विध्वंसामुळे हादरलेला आहे, रोज नवे खुलासे समोर येत आहेत. अनेक दशकांपासून भारत दहशतवाद सहन करत आला, पण आता आम्ही नवे धोरण ठरवले आहे—दहशतवादी आणि त्यांना आसरा, मदत देणारे यात काही फरक नाही; ते सर्व मानवतेचे शत्रू आहेत. ‘न्यूक्लियर ब्लॅकमेल’ आता सहन केले जाणार नाही. पुढेही जर शत्रूंनी अशा धमक्या दिल्या, तर ठोस प्रत्युत्तर दिले जाईल. भारताने रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, असेही स्पष्ट करून सिंधू जलकरार स्थगित केला आहे. आता भारताच्या हक्काच्या पाण्यावर हक्क फक्त भारताचा असेल, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.

यंदा साजरी करता येणार ‘डबल दिवाळी’

या दिवाळीत देशवासीयांना दुहेरी आनंदाचा क्षण मिळणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गेल्या आठ वर्षांत जीएसटीमध्ये मोठ्या सुधारणा करून करभार कमी केला, करव्यवस्था सुलभ केली. आता काळाची गरज लक्षात घेऊन ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स’ आणले जात आहेत. उच्चस्तरीय समितीमार्फत आढावा घेऊन, राज्यांशी चर्चा करून तयार झालेल्या या सुधारणा दिवाळीतच देशासाठी भेट ठरणार आहेत. सामान्य नागरिकांच्या गरजेवरील कर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, एमएसएमई व लघुउद्योजकांना मोठा फायदा मिळेल. दैनंदिन वस्तू स्वस्त होणार आणि अर्थव्यवस्थेलाही नवा वेग मिळणार आहे.

व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्येय

आजपासून नेमके शंभर वर्षांपूर्वी, राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा ध्यास घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला. “व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण” हा दृढ संकल्प घेऊन संघाने शतकभर मातृभूमीच्या कल्याणासाठी अविरत आणि निस्वार्थ सेवा दिली आहे. सेवा, समर्पण, संघटन आणि शिस्त ही संघाची ओळख ठरली असून, आज संघ जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना मानली जाते. या प्रवासात लाखो स्वयंसेवकांनी राष्ट्रहितासाठी आपले जीवन अर्पण केले, समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात योगदान देत राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी दिली. शंभर वर्षांच्या या तेजस्वी इतिहासात संघाने शिक्षण, संस्कार, आपत्ती निवारण, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जतन या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. प्रत्येक स्वयंसेवकाने मातृभूमीच्या कल्याणाला सर्वोच्च ध्येय मानून कार्य केले असून हीच संघाची खरी ताकद आहे. आज लाल किल्ल्यावरून या शतकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने, या प्रवासात योगदान देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना आदरपूर्वक स्मरण करणे कर्तव्य ठरते. देशाला या भव्य, समर्पित आणि प्रेरणादायी प्रवासाचा अभिमान आहे आणि ही वाटचाल पुढील पिढ्यांसाठी राष्ट्रसेवेचे अखंड प्रेरणास्थान राहील.

देशाच्या रक्षणासाठी ‘सुदर्शन चक्र’ सिद्ध करणार

आज जगभर युद्धाचे स्वरूप व तंत्र झपाट्याने बदलत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने सिद्ध केले की नवे युद्धतंत्र हाताळण्याची क्षमता आपल्याकडे आहे. युद्धात तंत्रज्ञानाची वाढ होत असताना, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे असलेले कौशल्य सतत विस्तारत आणि अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. या दृढ संकल्पाने २०३५ पर्यंत देशातील सर्व महत्त्वपूर्ण स्थळे—सैन्य व नागरी क्षेत्र, रुग्णालये, रेल्वे, आस्थेची केंद्रे—यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ‘राष्ट्रीय सुरक्षा कवच’ देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राच्या प्रेरणेने ‘सुदर्शन चक्र मिशन’ सुरू केले जाणार आहे. ही शक्तिशाली वेपन सिस्टीम शत्रूच्या हल्ल्यांना निष्प्रभ तर करेलच, पण अनेक पटीने प्रत्युत्तरही देईल. या मिशनअंतर्गत संशोधन, विकास आणि उत्पादन पूर्णपणे भारतातच होईल, भारतीय तरुणांच्या प्रतिभेवर आधारित असेल. युद्धातील संभाव्य बदलांचा पूर्वानुमान घेऊन ‘प्लस वन स्ट्रॅटेजी’ विकसित केली जाईल. तसेच सुदर्शन चक्राप्रमाणे अचूक व लक्ष्यित कारवाई करण्याची क्षमता निर्माण केली जाईल. बदलत्या युद्धतंत्रात राष्ट्र व नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही योजना कटिबद्धपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

अमेरिकेसही योग्य शब्दात संदेश

स्वातंत्र्यदिनानिमित्त लालकिल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला थेट संदेश देत स्पष्ट केले की भारत शेतकरी आणि मच्छीमारांच्या हितांवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही. “मोदी भिंतीसारखा ठाम उभा आहे,” असे सांगत त्यांनी स्पर्धेत इतरांची रेष कमी करण्याऐवजी स्वतःची रेष वाढवण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. आपल्या २५ वर्षांच्या प्रशासनाच्या अनुभवाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, इतरांच्या कमतरता शोधण्यात ऊर्जा वाया घालवण्याऐवजी स्वतःची ताकद वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे. त्यांनी अप्रत्यक्षपणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत सांगितले की, जागतिक परिस्थितीत आर्थिक स्वार्थ दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु भारताने आपला स्वतंत्र मार्ग निवडल्यास कोणत्याही देशाचा स्वार्थ त्याला जखडू शकत नाही. मोदी यांनी ठामपणे सांगितले की, भारताची रेष जितकी लांब होईल, तितके जगालाही भारताच्या क्षमतेची जाणीव होईल.
Powered By Sangraha 9.0