‘त्या’ शौर्याचे ‘प्रतिक’ सैन्यदलाच्या संग्रहालयात जतन

15 Aug 2025 12:18:53

कल्याण : हुतात्मा सुभेदार श्रीरंग तात्याबा सावंत यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाबद्दल त्यांना राष्ट्रपतीकडून मानाचे शौर्यपदक प्रदान करण्यात आले आहे. हे शौर्यचक्र पदक सेनादलाच्या बॉम्बे सॅपर्सच्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या शौर्याचे प्रतिक सैन्यदलाच्या संग्रहालयात जतन करण्यात आले आहे. संग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्या तरूणाईला या शौर्यचक्रामुळे प्रेरणा मिळत आहे.


ब्रिटीशकाळापासून लष्कराचा इतिहास सांगणारे धगधगत्या इतिहासाची साक्ष देणारे सातारा जिल्ह्यात विसापूर हे गाव आहे. खटाव तालुक्यातील विसापूर या गावात सुमारे २००० हून अधिक आजी माजी सैनिक आहेत. सातारा जिल्हयातील मिलिटरी अपशिंगे या गावासोबत आता विसापूर या गावात ही घरटी सैनिकांची परंपरा निर्माण होवू लागली आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या विसापूर गावाला लष्करी सेवेचा एक धगधगता इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे ब्रिटीशच्या काळातही विसापूर गावातील गणपत जिजाबा सावंत हे ब्रिटीश सैनिकात जवान म्हणून कार्यरत होते. मूळचे विसापूरचे असणारे श्रीरंग सावंत हे एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मला आले. त्यांचे वडील मुंबईत माथाडी कामगार होते. खटाव तालुका हा पूर्वी पासूनच दुष्काळी भाग म्हणून परिचित आहे. सातारा जिल्हा हा 'सैनिकांचा जिल्हा' म्हणून ओळखला जातो. त्यामुळे श्रीरंग यांनी देखील सैन्यात जायचं ठरविले. घरात सैन्याची परंपरा नसताना ही श्रीरंग यांनी ते धाडस दाखविले. आणि १९६१ मध्ये ते भारतीय सैन्यात रु जू झाले. भारतीय लष्करात २६ वर्ष सेवा दिल्यानंतर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले.


भारतीय सेनेत कार्यरत असताना जिल्हा कोटा राजस्थान येथे जुलै १९८६ अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (पुणे) येथे कार्यरत सुभेदार श्रीरंग यांनी पूरग्रस्त नागरिकांना वाचवून सुरक्षितस्थळी पोचविण्यासाठी सैनिकी मदतकार्यात भाग घेतला होता. यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य करून देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्याबद्दल त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी एप्रिल १९८८ मध्ये मरणोत्तर ‘‘शौर्यचक्र’’ बहाल करून गौरव केला. तसेच राज्य सरकारने मे १९९० मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. विशेष म्हणजे सुभेदार श्रीरंग हे शौर्यचक्राने सन्मानित झालेले खटाव तालुक्यातील ते एकमेव सैनिक आहेत. शौर्यचक्र ३१ जानेवारीला भारतीय सेना प्रमुख जनरल मनोज पांडे(सीओएएस) आणि बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुपच्या कमांडंटकडे हुतात्मा सुभेदार श्रीरंग सावंत यांचे सुपुत्र डॉ. सुधीर सावंत यांनी कायमस्वरूपी सुपुर्द केले. बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या संग्रहालयात त्यांच्या कार्याचे व पदकाचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. देशाच्या कानकोपऱ्यातून, देश विदेशातील वरिष्ठ सैन्य अधिकारी, राष्ट्रपती, सैन्य प्रमुख हे संग्रहालय पाहण्यासाठी येतात.



Powered By Sangraha 9.0