"ऑपरेशन सिंदूर हे आक्रोशाचे प्रतीक"; स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांकडून सैन्यदलाच्या कार्याचे कौतुक

15 Aug 2025 17:12:43

नवी दिल्ली : (PM Modi on Operation Sindoor) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'विषयी बोलताना पाकिस्तानला कडक संदेश दिला आहे.

'ऑपरेशन सिंदूर' हे आक्रोशाचे प्रतीक

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या या 'ऑपरेशन सिंदूर'विषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय की, "ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्यांनी शौर्य आणि पराक्रम दाखवला त्या सगळ्या वीरांचं कौतुक करण्याची संधी मला मिळाली आहे. आमच्या वीर सैनिकांनी शत्रूंना कल्पनेपलीकडची शिक्षा दिली आहे. पहलगाममध्ये ज्याप्रकारे हल्ला झाला आणि धर्म विचारुन लोकांना मारलं गेलं पत्नीसमोर पतीला मारलं, मुलांसमोर त्यांच्या वडिलांना ठार केलं. ते पाहता, संपूर्ण भारत आक्रोश करत होता. पण ऑपरेशन सिंदूर त्याच आक्रोशाचं उत्तर होतं."

...अशी कामगिरी अनेक वर्षांत झाली नाही

२२ एप्रिलनंतर आपण आपल्या सैन्य दलांना कारवाईसाठी पूर्ण सूट दिली होती. रणनीती त्यांनी ठरवावी, वेळ त्यांनी ठरवावी, लक्ष्य त्यांनी ठरवावं आणि आपल्या सैन्य दलांनी अशी कामगिरी केली जी अनेक वर्षांत झाली नाही. आपल्या सैन्य दलानी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे पाकिस्तानची झोप अजूनही उडाली आहे. पाकिस्तानात झालेला विध्वंस इतका मोठा आहे की रोज नवे खुलासे होत आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.




Powered By Sangraha 9.0