नवी दिल्ली : (Independence Day 2025) भारत आज आपला ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदींनी सलग १२ व्यांदा ध्वजारोहण केले आहे. पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केले. 'नवा भारत' ही यंदाची थीम असून, २०४७ पर्यंत समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचे ध्येय आहे.
<!-- Inject Script Filtered -->
देशवासीयांसाठी दोन मोठ्या घोषणा
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदींना लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वीर जवानांना मानवंदना दिली. पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की या दिवाळीला सरकार जीएसटी रिफॉर्म्स घेऊन येईल. यामुळे लोकांना करांमध्ये दिलासा मिळेल. याबरोबरच त्यांनी विकसित भारत रोजगार योजना लागू करण्याची घोषणा देखील केली. या योजनेअंतर्गत प्रायव्हेट सेक्टरमध्ये पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून १५००० रुपये दिले जातील. त्या कंपन्यांना देखील सरकार प्रोत्साहन देईल. या योजनेमुळे ३.५ कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
५००० हून अधिक विशेष पाहुण्यांना निमंत्रण
यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातून ५००० हून अधिक विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये ऑलिंपिक्स २०२५ चे खेळाडू, शेतकरी, युवा लेखक, स्वच्छता कर्मचारी आणि देशभरातील ८५ सरपंचांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा राष्ट्रगीत वाजवणाऱ्या बँडमध्ये पहिल्यांदाच अग्निवीरांचा सहभाग आहे. त्यासोबतच यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशाचा गौरवही या सोहळ्यात करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.