भारताची फाळणी काँग्रेसच्या राजकारणातून जन्माला आलेला काळा अध्याय : योगी आदित्यनाथ

    15-Aug-2025
Total Views |


मुंबई (प्रतिनिधी) : १९४७ ची फाळणी हा काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून जन्माला आलेला काळा अध्याय होता, ज्यामुळे सनातन भारताची एकता डागाळली गेली आणि देशाला खोल जखमा झाल्या. असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केले. गुरूवार दि. १४ ऑगस्ट रोजी लखनऊ येथे विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली, तर काँग्रेसने सत्तेच्या लोभापोटी देशाची फाळणी केली. काँग्रेसच्या धोरणांमुळे पश्चिम पाकिस्तानातील लाहोर, कराची, रावळपिंडी आणि मुलतान इथल्या हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मियांच्या हत्या झाल्या. या हिंसाचारात १५ ते २० लाख लोकांचा बळी गेला आणि कोट्यवधी लोक विस्थापित झाले. हिंदू, शीख, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मियांना वडिलोपार्जित घरे सोडण्यास भाग पाडले गेले, त्यांची स्मारके उभारली गेली नाहीत, त्यांचे दु:ख लोकांच्या आठवणीतून पुसले गेले. भारतीयांनी फाळणीच्या इतिहासातून बोध घेऊन तरूण पिढीला इतिहासासोबत जोडले पाहिजे. 

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून योगींनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. पहिल्यांदाच जम्मू - काश्मिर आणि इतर भागातील विस्थापितांना नागरिकत्व मिळाले आणि ते भारताच्या विकासात हातभार लावू लागले. त्यांच्या पुर्नवसनासाठी काँग्रेसने कधीही प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत.