‘पाकिस्तानी मोहल्ला’ झाला 'हिंदुस्तानी मोहल्ला' ; सूरतच्या रामनगर परिसरातील वसाहतीचे नामांतरण

15 Aug 2025 18:30:04


मुंबई : भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी मोठ्या संख्येने निर्वासित भारतात आले, त्यापैकी बहुतांश सिंधी समाजातील लोक गुजरातच्या सूरत येथे स्थायिक झाले. त्यानंतर येथील एका भागाला ‘पाकिस्तानी मोहल्ला’ असे नाव दिले गेले. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी स्थानिक रहिवाशांच्या आणि आमदारांच्या मदतीने त्याचे नाव बदलून 'हिंदुस्तानी मोहल्ला' करण्यात आले आहे.

अशी माहिती आहे की, जवळपास ६०० निर्वासित कुटुंबांनी तेव्हा रामनगरच्या या पाकिस्तानी मोहोल्ल्यात आश्रय घेतला होता. कालांतराने स्थानिकांची संख्या वाढत गेली. तेव्हापासून लोकांनी या भागाला ‘पाकिस्तानी मोहल्ला’ म्हणायला सुरुवात झाली. हळूहळू हे नाव येथील लोकांच्या अधिकृत कागदपत्रांवरही नोंदले गेले. लवकरच येथे राहणाऱ्या सुमारे ५ हजार लोकांच्या आधार कार्डवरील पत्ता आता अद्ययावत केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

७९ व्या स्वातंत्र्यदिनी वसाहतीच्या नावातून खरे स्वातंत्र्य मिळाल्याची भावना येथील स्थानिक रहिवासी करताना दिसतायत. स्थानिकांचे म्हणणे आहे की, ते या नावापासून सुटका करून घ्यायची इच्छा बऱ्याच काळापासून बाळगत होते. येथील लोकांचे म्हणणे आहे की याआधीही नाव बदलण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्यात यश आले नाही. लोक या भागाला ‘पाकिस्तानी मोहल्ला’ असेच म्हणत राहिले.

या नामांतराच्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार पूर्णेश मोदीही उपस्थित होते. ते म्हणाले, “फाळणीनंतर मोठ्या संख्येने सिंधी समाजाचे लोक येथे येऊन स्थायिक झाले आणि एका भागाला पाकिस्तान मोहल्ला असे नाव मिळाले. मी त्याचे नाव बदलण्याचा पुढाकार घेतला. काही वर्षांपूर्वी मी नगरपालिका नोंदीत नाव बदलून ‘हिंदुस्तानी मोहल्ला’ करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आणि आता त्याला मंजुरी मिळाली आहे.”




Powered By Sangraha 9.0