मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील भारतीय वाणिज्य दूतावासात भारतीय स्वातंत्र्योत्सव साजरा करण्यासाठी येथील भारतीय समुदायाचे लोक जमले होते. या आनंदोत्सवात विघ्न आणण्याचा प्रयत्न त्यावेळी काही खलिस्तानींकडून करण्यात आला. त्यांनी दूतावास परिसरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तथापि, त्यांच्या पुढ्यात न झुकता भारतीयांनी भारत मातेचा जयजयकार करत, देशभक्तीपर गाणी गात खलिस्तानींना चोख प्रत्युत्तर दिले.
यासंदर्भातील एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात असे दिसतेय की, लाऊडस्पीकरवर वाजणाऱ्या देशभक्तीपर गाण्यांनी खलिस्तानींची घोषणाबाजी दाबून टाकली आणि त्यामुळे भारतीयांमधील उत्साह कुठल्याही प्रकारे कमी झाला नाही. त्यानंतर स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून उपाययोजना केल्या.