कल्याण , कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात आज ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन समारोह आयुक्त अभिनव गोयल यांचे शुभहस्ते ध्वजारोहणाने संपन्न झाला.
यावेळी आमदार राजेश मोरे ,महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड ,शहर अभियंता अनिता परदेशी आणि महापालिकेतील इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.यावेळी राष्ट्रगीत गायनानंतर, राज्य गीताची ध्वनिफीत वाजविण्यात आली. तद्नंतर हुतात्मा स्मारकास वंदन करण्यात आले.
यावेळी २७ गावातील कर्मचारी वर्गापैकी एका कर्मचाऱ्यास प्रातिनिधिक स्वरूपात महापालिकेतील समावेशनाचा आदेश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे हस्ते देण्यात आला. त्याचप्रमाणे अग्निशमन विभागात कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या दिवंगत मधुकर कांबळे यांच्या पत्नी पौर्णिमा कांबळे यांस सदनिकेच्या रकमेएवढा धनादेशही आयुक्त अभिनव गोयल यांचे हस्ते प्रदान करण्यात आला . महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्रशासन पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत उत्तीर्ण झालेल्या नवसाक्षरांपैकी एका नवसाक्षर व्यक्तीस प्रमाणपत्राचे वितरण आयुक्त यांचे हस्ते करण्यात आले .
महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालय आणि सोनोग्राफी सेंटर यांच्या नोंदणी, नूतनीकरण कार्यपद्धती ऑनलाइन स्वरूपात होणार असून या कार्यपद्धतींचा एसओपी देखील आयुक्तांच्या हस्ते आयएमए कल्याणच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर व डॉ. प्रशांत पाटील यांस सुपूर्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मिशन शक्ती कर्करोगमुक्त महिला अभियानाच्या लोगोचे अनावरण तसेच या अभियानांतर्गत आशा सेविकांच्या रॅलीचा प्रारंभ आयुक्तांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. त्याचप्रमाणे नव्याने प्राप्त होणाऱ्या ११ रुग्णवाहिकांपैकी ६ रुग्णवाहिकांचे लोकार्पणही आयुक्त यांचे हस्ते करण्यात आले .
महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांचे शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपायुक्त रमेश मिसाळ कार्यकारी अभियंता मनोज सांगळे ,सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, राजेश सावंत तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तद्नंतर डोंबिवली येथील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलातील कॅ. विनयकुमार सचान स्मारकास महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कॅप्टन विनयकुमार सच्चान यांचे बंधू, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे शहर अभियंता अनिता परदेशी तसेच महापालिकेचे इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
तदनंतर डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौक येथील दीडशे फुटी उंच ध्वजाचे ध्वजारोहण महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. "हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत दोन ऑगस्ट पासून विविध कार्यक्रम महापालिकेमार्फत करण्यात येत आहे आपल्या मनात देशभक्तीची भावना दृढ झाली पाहिजे ,आपले जवान, सैनिक आपल्या रक्षणासाठी काम करीत असतात, आपणही नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडूया असे सांगत आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त उपस्थित असलेल्या मान्यवरांना तसेच नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार राजेश मोरे, माजी पदाधिकारी शरद गंभीरराव इतर मान्यवर ,महापालिका अधिकारी, कर्मचारी वरिष्ठ पोलीस अधिकारी ,नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.