तिसर्‍या नजरेतून स्वातंत्र्यपर्व!

15 Aug 2025 11:40:27

स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रवेश करत असताना आपसूकच, देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या काळाचे पुनरावलोकन करणेही तितकेच गरजेचे होऊन बसते. त्यातसुद्धा परकीयांच्या दृष्टीने, एका भिन्न नजरेने या काळाकडे बघणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या इतिहासाचे आपल्याला नव्याने आकलन होते. यामध्ये कधी नजरेआड राहिलेले नवे विषय गवसतात, तर कधी तत्कालीन नेतृत्वाविषयीच्या नव्या गोष्टींचा उलगडा होतो. याचा आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नव्या विचारांचा आढावा घेणारा हा लेख...

आधुनिक भारताची निर्मिती ही मागच्या शतकातील जगाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना. कारण, भारताच्या निर्मितीसोबतच इंग्रज शासनाच्या साम्राज्यवादाचासुद्धा अंत झाला. आशिया खंडातील राष्ट्रांपासून ते अगदी दक्षिण अमेरिकेतील छोट्या छोट्या द्वीपराष्ट्रांपर्यंत इंग्रजांनी सत्ता गाजवली. त्या त्या राष्ट्रांमधल्या अब्जावधी संसाधनांची लूट करून, इंग्लंड देश समृद्ध झाला. एका बाजूला इंग्रजांनी राजकीय वर्चस्ववाद आपल्या वसाहतींमध्ये प्रस्थापित केला, तर दुसर्‍या बाजूला त्या त्या समाजाचं सांस्कृतिक खच्चीकरणही सुरूचं ठेवलं. वसाहतवाद या गोष्टीचा विचार म्हणून केवळ राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये करता येत नाही, तर त्याला असलेले वेगवेगळे आयामही लक्षात घ्यावे लागतात.

भारतासारखा देश, ज्यावर अनेक शतके वेगवेगळ्या परकीय आक्रांतांनी राज्य केलं, त्यामध्ये इंग्रजी सत्तेचं स्थान हे वेगळं आहे. कारण, इंग्रजांच्या राज्यकारभारामुळे एक प्रशासकीय प्रारुप निर्माण झाले. राजकीय व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, यांमध्ये टप्प्याटप्प्याने भारतीयांचा समावेश झाला. अर्थात, ही प्रक्रिया साधी सोपी निश्चितच नव्हती, न्याय तसेच केंद्रीय सत्तेच्या विधिमंडळात साधे प्रतिनिधित्व असावे, यासाठी काही दशकांचा संघर्ष भारतीयांना करावा लागला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात संविधानिक पद्धतीने लढणार्‍या लोकांची फळी काँग्रेसच्या माध्यमातून एकत्र आली होती, तर दुसर्‍या बाजूला, या मवाळ गटाच्या राजकारणावर ज्यांचा विश्वास नव्हता, ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा उठाव केला, असे नायकसुद्धा संघर्ष करत होते. कालौघात इंग्रजांच्या सत्ताकारणाला हादरा देण्याचे काम भारतीयांनी केले आणि अखेर दि. १५ ऑगस्ट १९४७ साली भारतात स्वातंत्र्याची ऐतिहासिक पहाट उजाडली. परंतु, इंग्रजांनी देश सोडला, तो भारतावर अखेरचा जीवघेणा वार - फाळणी करूनच! कोट्यवधी नागरिकांचे झालेले स्थलांतर, धर्माच्या आधारे झालेल्या दंगली व कत्तली, यांमुळे भारत देश स्वतंत्र होण्याआधीच आपल्या अंगावर असंख्य जखमा वागवत होता. येणार्‍या काळात हे राष्ट्र एकसंध राहील का, याविषयीसुद्धा तेव्हा देशविदेशातून शंका उपस्थित केल्या गेल्या. मात्र, काळाच्या ओघात भारत उभा राहिला. एका बाजूला पाकिस्तान, दुसर्‍या बाजूला चीन अशा राष्ट्रांची आव्हाने झेलत, त्यावर मात करत भारताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. भारताच्या अमृतकाळात, इतिहासाचं आपल्या जडणघडणीचं आकलन सध्या सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळालं. त्याच अनुषंगाने, फाळणीचा तो काळ, राजकीय सत्तेचे डावपेच, त्यातली गुंतागुंत याचा पुन्हा एकदा नव्याने अभ्यास होणे गरजेचे आहे.

एक बाजू असते, ती राज्यकर्त्यांची, दुसरी ती अंकित झालेल्या नागरिकांची व प्रजेची. परंतु, त्याचबरोबर तिसरी बाजू असते, ती या दोन्हींमध्ये बघणार्‍या तत्वनिष्ठ अभ्यासकांची व इतिहासकारांची. स्वातंत्र्याच्या इतया वर्षांनंतर पुन्हा एकदा इतिहासाच्या वेदनादायी पर्वाची आठवण करावी का, असा प्रश्न काहींना जरुर पडत असेल. परंतु, त्याच पर्वामुळे आधुनिक भारताचा पाया रचला गेला. स्वातंत्र्योत्तर काळातील सत्ताकारण, समाजकारण याचा विचार करायाचा झाल्यास, १९४७ हे वर्ष आणि या कालावधीतील घटनांचे अवलोकन अत्यावश्यक आहे. विशेषतः अपरिचित अशा व्यक्तींच्या, साहित्याच्या माध्यमातून होणारे हे आकलन, अभ्यासकांसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे.

ब्रिटिश लेखिका अ‍ॅलेस वॉन टुन्झेलमन या लेखिकेने २००७ साली ‘इंडियन समर : द सिक्रेट हिस्ट्री ऑफ द एंड ऑफ एन एम्पायर’ हे पुस्तक लिहिले. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असलेला भारत देश आणि त्या काळातील घडामोडींचा एका अत्यंत वेगळ्या अंगाने या पुस्तकात विचार करण्यात आला आहे. इतिहास म्हटलं की, सर्वसाधारणपणे घटनाक्रमांच्या जंत्रीमध्ये आपण अडकून पडतो. परंतु, त्या त्या काळाचे नायक, जे आपल्या कार्यातून काळ घडवत आहेत, त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचे अनुबंध यावर फारसं भाष्य केलं जात नाही. इथंच लेखिका वेगळी ठरते. पंडित जवाहरलाल नेहरु, लॉर्ड माऊंटबॅटन, महात्मा गांधी या व्यक्तिरेखांच्या भूमिकेचा आढावा घेणारं लेखन लेखिकेने या पुस्तकात केलं. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या काळात सत्ताकेंद्राच्या मध्यवर्ती होते. फाळणीच्या निर्णयप्रक्रियेचा आरंभ इथंपासून ते फाळणीचा परिणाम, राज्यघटनेची निर्मिती या सगळ्या वाटचालीमध्ये नेहरूंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यावेळेला नेहरूंचे तत्कालीन इंग्रज सत्ताधार्‍यांबरोबर संबंध नेमके कसे होते, याचा रोचक आढावा लेखिकेने घेतला आहे. पंतप्रधानपदी विराजमान झालेले नेहरू यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले होते. आंग्ल संस्कृतीचा, समाजवादी धोरणांचा, त्यांच्यावर असलेला प्रभाव याचे महत्त्वपूर्ण चित्रण यामध्ये करण्यात आले आहे.

भारताची फाळणी आणि क्रमाने झालेला रक्तपात हे इंग्रजांचे प्रशासकीय अपयश होते, राष्ट्राच्या सत्तेचे हस्तांतरण करताना, राज्यकर्त्यांच्या धोरणाची परिणीती प्रशासकीय दुस्वप्नात कशी झाली, याचासुद्धा आढावा लेखिकेने घेतला आहे. भारत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्त्रियांचे अतुलनीय योगदान आहे. तत्कालीन काँग्रेस पक्षामध्ये असलेला स्त्रियांचा सहभाग हा तेव्हाच्या इतर देशातील राष्ट्रीय पक्षांमध्ये असणार्‍या सहभागापेक्षा दसपटीने अधिक होता, अशी महत्त्वपूर्ण नोंदसुद्धा लेखिकेने केली आहे. मोहम्मद अली जिन्ना यांच्या कूटनीतीमुळे पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यांना तत्कालीन ब्रिटिश सत्ताधारी विनस्टन चर्चिल यांचा पाठिंबा होता व पंडित नेहरू यांच्या पाठीशी लॉर्ड माऊंटबॅटन होते. अशा या गुंतागुंतीच्या राजकारणाचासुद्धा यामध्ये आढावा घेण्यात आला आहे. लॉर्ड माऊंटबॅटन यांचा नेहरूंवर नेमका प्रभाव कसा होता, त्यातून नेहरूंची पुढची वाटचाल कशी घडली, या संबंधित विस्तृत विवरण आपल्या या ग्रंथामध्ये वाचायला मिळते.

भारतीय वंशाचे अमेरिकन लेखक, पत्रकार निसिद हजारी यांनी २०१५ साली ‘मिडनाईट्स फ्युरीज : द डेडली लेगसी ऑफ इंडियाज पार्टिशन’ हा ग्रंथ लिहिला. सदर ग्रंथामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्या राजकीय कारकिर्दीचा आणि व्यक्तिगत प्रभावाचा आढावा घेतला आहे. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा भारतीय समाजावर असलेला प्रभाव आणि परिणाम व त्यातून उद्भवलेली फाळणीची आपत्ती याविषयी भाष्य करण्यात आले आहे. सत्ताचक्रामध्ये अडकलेल्या नेतृत्वामुळे, समाजाताला ताण दिवसेंदिवस कसा वाढत गेला, त्याची परिणीती सांप्रदायिक द्वेषामध्ये कशी झाली, याचा सविस्तर आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे. सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे, या सगळ्या काळाकडे तटस्थ पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वर्तमानकाळातील पाकिस्तान, पाकपुरस्कृत दहशतवाद या सगळ्या समस्यांची पाळेमुळे फाळणी आणि याच काही महिन्यांमधील नेतृत्वाच्या निर्णयामध्ये आहेत, हेसुद्धा लेखक या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना सांगतात.

मागच्या दोन दशकांमध्ये भारताची फाळणी, स्वातंत्र्यप्राप्ती या विषयावर विपुल लेखन करण्यात आले आहे. या लिखाणामध्ये कधी व्यक्ती केंद्रस्थानी असते, तर कधी राजकारण व समाजकारणाच्या अनुषंगाने याचा विचार केला जातो. आजसुद्धा सॅम डॅलरिम्पल आपल्या ‘श्याटर्ड लॅण्ड्स : फाईव्ह पार्टिशेन्स अ‍ॅण्ड द मेकिंग ऑफ मॉडर्न एशिया’ या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून, मागच्या शतकामध्ये झालेल्या फाळणीमुळे वर्तमानातील दक्षिण आशिया कसा निर्माण झाला, याचा लेखाजोखा मांडला आहे. राष्ट्र उभारणीच्या अमृतकाळात प्रवेश करत असताना, इतिहासाच्या या टप्प्याचे पुनरावलोकन गरजेचे आहे. कारण, आजही त्या काळातील महत्त्वपूर्ण निर्णयांची सावली, भारताच्या वर्तमानावर पडत आहे. सिमला करार असो किंवा सिंधु जलकरार, तत्कालीन भूराजकीय स्थितीचा विचार करता, इतिहासाचे हे अध्याय येणार्‍या काळासाठी आपल्याला मार्गदर्शक ठरतात.

९९६७८२६९८३
Powered By Sangraha 9.0