मुंबई : "स्वातंत्र्यात 'स्व' आणि 'तंत्र' आहे. 'स्व'च्या आधारावर तंत्र चालते तेव्हा स्वातंत्र्य येते. भारत हा एक वैशिष्ट्यपूर्ण देश असून तो जगात सुख-शांती आणण्यासाठी जगतो. जगाला धर्म देण्यासाठी जगतो. त्यामुळे 'स्व'च्या आधारावर चालले पाहिजे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुक्रवारी उत्कल बिपन्ना सहाय्यता समिती, भुवनेश्वर येथे ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ओडिशा पूर्व प्रांत संघचालक समीर महांती आणि उत्कल विपन्न सहाय्यता समितीचे अध्यक्ष अक्षय कुमार बिट उपस्थित होते.
'भारतीयांनी स्वातंत्र्याबाबत आत्मसंतुष्ट होता कामा नये. स्वातंत्र्य टिकवण्यासाठी कठोर परिश्रम आणि त्याग करण्याची गरज आहे', असे आवाहन सरसंघचालकांनी यावेळी केले. ते म्हणाले, "देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. इंग्रज निघून गेले, आणि देश आपल्या लोकांच्या अधीन झाला. आपण स्वतःचे राज्य चालवत आहोत, आपला व्यापार चालवत आहोत, आपण स्वतंत्र आहोत. पण स्वातंत्र्याचे कारण हे होते की आपल्या देशात सर्वांना सुख, सुरक्षा, शांती आणि प्रतिष्ठा मिळावी. आज सारे जग जे डगमगत आहे, गेली दोन हजार वर्षे अनेक प्रयोग करूनही ज्याच्या समस्यांचे निराकरण मिळाले नाही, त्याला आपल्या दृष्टीकोनावर आणि धर्मदृष्टीवर आधारित नवे सुख-शांतीयुक्त जग निर्माण करण्याचा उपाय देणे हे आपले कर्तव्य आहे."
संघाच्या महल स्थित कार्यालयात राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण
नागपुर महानगर संघचालक राजेश लोया यांनी संघाच्या महल स्थित कार्यालयात ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय ध्वज फडकावला. आपल्या उद्बोधनात राजेश लोया यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांच्या योगदानाचे स्मरण केले. भारतीय सशस्त्र दलांची प्रशंसा करताना ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतर जेव्हा केव्हाही कोणाच्या नजरेत भारतावर वाईट हेतू होता, तेव्हा त्यांनी त्याला कठोर प्रत्युत्तर दिले. जग आश्चर्यचकित आहे की भारताने स्वतःच्या संसाधनांचा वापर करून शत्रूंना पराभूत केले. हे शक्य झाले कारण अलीकडच्या वर्षांत आपला स्वाभिमान जागृत झाला आहे. आपण आत्मनिर्भर होत आहोत आणि आपल्या ‘स्व’ला जागवत आहोत.
यासोबतच, जगातील कलहमुक्ती, पर्यावरण समस्या इत्यादींचे निराकरण करून सुखी, सुंदर आणि कल्याणकारी विश्वगुरू भारत उभा करणे, हे देखील आपले कर्तव्य असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, आपण सर्वांनी आपले कर्तव्य लक्षात ठेवावे आणि त्या कर्तव्याच्या दिशेने लहान-लहान संकल्प करून जीवनात पुढे जावे. जसे आजकाल संघाचे स्वयंसेवक 'पंच परिवर्तन'ची चर्चा करतात. अशाच लहान-लहान संकल्पांनी समाजात, देशात आणि त्यातून जगात बदल घडवू. अशा लहान बदलांपासून आपल्याला आपल्या कर्तव्यपथावर पुढे जाण्याचे काम सुरू करायला हवे.