मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण

15 Aug 2025 16:27:14

मुंबई : आज भारताच्या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र हे अतिशय वेगाने पुढे जाणारे राज्य आहे. महाराष्ट्राने विकसित भारताच्या स्वप्नामध्ये विकसित महाराष्ट्राची भर टाकण्याकरिता आपले कार्य सुरु केले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी केले.

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, मुख्य सचिव राजेश कुमार, अमृता फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ, मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, भारतीय सेना, नौसेना, वायुसेना, भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक आणि इतर विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भारतामध्ये येत असलेल्या थेट परदेशी गुंतवणूकीपैकी ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली बघितली असून या गुंतवणूकीतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. वस्तुनिर्माण, आयात-निर्यात, स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्राची एक मोठी घोडदौड सुरू आहे. एकीकडे उत्तम शिक्षण व्यवस्था आणि त्यासोबत मानव संसाधन विकसित करण्यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न सुरू केले आहेत. कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधनाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र हा देशाच्या संपूर्ण विकास व्यवस्थेत योगदान देईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताची विकासगाथा कुणीही थांबवू शकत नाही

"ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व आतंकवाद्यांचे आणि पाकिस्तानच्या लष्कराचे तळ उध्वस्त केले आणि त्यातून भारतावर आलेले हल्ले परतवून लावले. ऑपरेशन सिंदूरमुळे जगाला देखील नवीन भारत काय आहे, हे समजले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश सातत्याने प्रगती करत आहे. केवळ एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे. आज भारताची विकासगाथा कुणीही थांबवू शकत नाही. विविध क्षेत्रांमध्ये भारत प्रगती करतो आहे. अंतराळ क्षेत्रातही भारताने पाऊल ठेवले आहे. त्यामुळे आता ही विकासगाथा थांबणार नाही. त्याचवेळी पंतप्रधान मोदीजींनी दिलेला आत्मनिर्भर भारताचा नारादेखील महत्वाचा आहे. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी जगातले सगळे उत्पादन आणि व्यवस्था भारतामध्ये तयार कराव्या लागतील. नवाचार, स्टार्टअप्स, टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी भारतामध्ये तेवढ्याच समर्थपणे आपल्याला उभ्या कराव्या लागतील. त्या दिशेने भारताची वाटचाल सुरु आहे. पंतप्रधानांनी आपल्याला स्वदेशीचे आव्हान केले आहे. त्यामुळे जिथे जिथे शक्य असेल, त्या त्या ठिकाणी स्वदेशीचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी द्यायची आहे," असेही त्यांनी सांगितले.

भारताच्या विकासाच्या गाथेत महाराष्ट्र सर्वात मोठा सहभागी

महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असून तसेच १०० टक्के हरित वीज देणारा महाराष्ट्र हे पहिले राज्य तयार होईल. सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने भरारी घेतलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुरक्षा दलांनी, पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य निर्माण केलेले आहे. गडचिरोलीमध्ये काम करणाऱ्या पोलिसांनी जवळपास आता गडचिरोलीला नक्षलमुक्त, माओवादी मुक्त केले आहे. गडचिरोली हे आता देशाचे नवीन स्टील हब म्हणून तयार होत आहे. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. ही विकासाची गाथा अशीच प्रकारे पुढे जात राहणार असून भारताच्या विकासाच्या गाथेत महाराष्ट्र हा सर्वात मोठा सहभागी असेल. छत्रपती शिवाजी महाराज, संतांच्या मांदियाळींनी दाखवलेल्या मार्गाने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या अनुरूप आपला महाराष्ट्र यापुढेही चालत राहील," असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0