नवी दिल्ली : (PM Modi warns Pakistan over Nuclear Blackmail) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. राजधानी दिल्लीत झालेल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी "स्वातंत्र्याचं हे पर्व १४० कोटी देशवासियांसाठी 'संकल्पांचा, सामूहिक सिद्धींचा आणि गौरवाचे' पर्व असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी पहलगाम दहशदवादी हल्ल्यानंतर राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या भारताच्या लष्करी कारवाईचा उल्लेख करत पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून कठोर संदेश दिला.
न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही
गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानकडून अनेक प्रकारची धमक्यांची वक्तव्यं येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानला उद्देशून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, "आता दहशतवादाला पोसणाऱ्यांना आम्ही वेगळं ठरवणार नाही. दहशतवाद माजवणारे आणि दहशतवादाला खतपाणी घालणारे सगळ्यांना एकच मानल जाईल. हे सगळेच मानवतेचे शत्रू आहेत. तसंच सैन्य दलांना त्यांच्या विरोधात कारवाईची खुली सूट असेल. आता भारताने ठरवलंय की, न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग आजवर खूप सहन केलं आता अजिबात सहन करणार नाही. इथून पुढेही, जर शत्रूंनी असा प्रयत्न सुरुच ठेवला, तर आमचं सैन्यचं सारं काही निश्चित करेल त्यानुसार, आम्ही सडेतोड उत्तर देऊ." असं म्हणत पंतप्रधानांनी आज पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावले.