कोलकाता : (Dr. Vece Paes passes away) भारताचे दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांचे वडील वेस पेस यांचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी गुरुवारी १४ ऑगस्टला सकाळी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. वेस पेस १९७२ च्या म्युनिक ऑल्मिपिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा भाग होते.
कोण होते डॉ. वेस पेस?
डॉ. वेस पेस दीर्घकाळ भारतीय खेळांशी संबंधित होते. त्यांच्या देखरेखीखाली अनेक खेळाडूंना वेगवेगळ्या खेळांमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. भारतीय हॉकी संघात मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या पेस यांनी त्यानंतर अनेक खेळांमध्ये नाव कमावलं. डॉ. वेस हे फुटबॉल, क्रिकेट आणि रग्बी असे अनेक खेळ खेळले आहेत आणि १९९६ ते २००२ पर्यंत भारतीय रग्बी फुटबॉल युनियनचे अध्यक्ष म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले आहे. आशियाई क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) डोपिंग विरोधी शिक्षण कार्यक्रमांचे व्यवस्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पेस हे क्रीडा वैद्यकशास्त्रातील डॉक्टर होते आणि त्यांनी आशियाई क्रिकेट परिषद आणि बीसीसीआय व्यतिरिक्त अनेक क्रीडा संघटनांमध्ये वैद्यकीय सल्लागार म्हणून काम केले. त्यांनी कलकत्ता क्रिकेट आणि फुटबॉल क्लबचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. डॉ. वेस यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना, हॉकी इंडियाने त्यांना "भारतीय क्रीडाक्षेत्राचा अढळ आधारस्तंभ" आणि "भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळातील करिष्माई मिडफिल्डर" असे संबोधत श्रद्धांजली अर्पण केली.