सांस्कृतिक पुनरुत्थानाचे सुवर्णपर्व

14 Aug 2025 19:23:03

विकसित भारताचा ध्यास घेऊन जगणारा समाज, झटणारे नेतृत्व, आपल्या कार्यकाळात यशाची नवनवीन शिखरे गाठत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत आणि आपल्या संस्कृतीचे नव्याने आकलन झालेला भारतीय समाज सांस्कृतिक पुनरुत्थनाचे सुवर्णपर्व अनुभवत आहे. त्याच अनुषंगाने या अमृत काळाचा घेतलेला आढावा.

प्रत्येक राष्ट्राचा स्वतःचा एक विचार असतो आणि विधिलिखित ध्येय असते. मानवतेला दिशा दाखवणे हे भारताचे ध्येय आहे. भारत ज्यावेळेस इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता, त्या काळात स्वामी विवेकानंदांनी काढलेले हे उद्गार! एका बाजूला इंग्रज सत्तेची जुलमी राजवट, तर दुसर्या बाजूला दिशाहीन झालेला समाज. अशा या काळामध्ये स्वामीजींना उज्ज्वल भारताची स्वप्नं कशी पडली असतील? येणार्या पिढीवर त्यांचा इतका ठाम विश्वास कसा होता? या प्रश्नांच्या उत्तराचा मागोवा घेत असताना लक्षात येते की, स्वामींचा भारतीय संस्कृतीवर आणि या संस्कृतीच्या पुनरुत्थानावर ठाम विश्वास होता. भारताचा युवा हे परिवर्तन घडवून आणेल, यावर त्यांचा विश्वास होता. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करताना स्वामीजींचे विचार किती संयुक्तिक होते, याची आपल्याला प्रचिती येते. कुठल्याही राष्ट्रासाठी ७५ वर्षांचा काळ ही वाटचाल तशी थोडीच असते. कारण, जगाच्या पाठीवर, शतकांच्या वाटचालीमध्ये मुळापासून बदल घडवणारे परिवर्तन, हे काही काळापुरतेच मर्यादित असते. त्याचा समाज मनावर कसा परिणाम होईल व त्यातून कुठली व्यवस्था जन्माला येईल, हे प्रथम दर्शनी सांगणे अवघड असते. हा काळ ज्या वेळेस इतिहास जमा होतो, त्याच वेळेस मागे वळून पाहताना आपल्याला परिवर्तनाचे समग्र आकलन होते. भारताच्या बाबतीत मात्र, राष्ट्र म्हणून या देशाला मिळालेली परिवर्तनाची दिशा याचा वेगळ्या अंगाने विचार करावा लागेल. भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा जवळपास वसाहतवादाचा सूर्यास्त झाला. अमेरिका आणि रशिया हे दोनच राष्ट्र महासत्ता म्हणून उदयाला आले. पुढे १९९० सालच्या दशकामध्ये ङ्गसोव्हिएत युनियनफच्या लाल सूर्याचा सूर्यास्त झाला. नंतरच्या काळात भारतासहित अनेक राष्ट्रांमध्ये जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरण या गोष्टींची लाट आली. व्यापक अंगाने विचार करायचा झाल्यास, या प्रत्येक टप्प्याचे समाजामध्ये काही सांस्कृतिक पडसादसुद्धा उमटले. समाजवादाचा, साम्यवादाचा पुरस्कार करणार्या एका पिढीने आपल्या विचारांना पूरक अशा कलाकृतींच्या माध्यमातून लोकांमध्ये स्थान मिळवले. संस्कृतीचे प्रवाह हे सातत्याने बदलत राहिले. अभिव्यक्तीच्या कुठल्याही साधनेवर एका विशिष्ट विचारसरणीचा पगडा फार काळ टिकला नाही. समांतर रंगभूमी, चित्रपटसृष्टी, साहित्य अशा वेगवेगळ्या माध्यमातून समाजमन व्यक्त होत होते. मात्र, उदारीकरणाच्या लाटेनंतर जेव्हा माध्यमांचे लोकशाहीकरण झाले, तेव्हा जगाचे वेगवेगळे प्रवाह सामान्यांच्या नजरेस आले. अशा या सगळ्या प्रवाहांमध्ये भारताचे अस्तित्व नेमके कुठे आहे? भारताचा संस्कृती विचार नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांवर विचारविमर्श होत असताना २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले. सनातन संस्कृतीचा विचार ज्यांच्या मनात वास करत होता, ज्यांच्या आचरणामध्ये राष्ट्रनिर्मितीचा ध्यास होता, अशा पंतप्रधानांनी देशाचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला.

भारताला बलशाली बनवण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या महापुरुषांच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रामध्ये सुरू झाला. भारतीय संस्कृती, धर्मविचार हा या राष्ट्राचा पाया तर आहेच. परंतु, त्याचबरोबर प्रत्येक माणसाला जोडणारी ही एक शक्ती आहे. हाच विचार मनात ठेवून स्वदेश दर्शन या कार्यक्रमांतर्गत विविध विषयांवर आधारित प्रवासी मार्ग व त्यामध्ये ७६ प्रकल्प विकसित करण्यात आले. पर्यटनाच्या अनुषंगाने लोकांना जोडण्याचा, रोजगारनिर्मितीचा व्यापक विचार यामध्ये केला गेला आहे, असे आपल्याला दिसून येते. याच धरतीवर  प्रकल्पांतर्गत शहरांच्या शाश्वत विकासाचा विचारसुद्धा करण्यात आला.

अयोध्येमध्ये उभारण्यात आलेले तेजस्वी राम मंदिर म्हणजे केवळ आपला वारसा जपण्यासाठी केलेला प्रयत्न नसून, या पवित्र कार्यामुळे नव्या युगाचा आरंभ झाला आहे. भारतामध्ये मंदिरे ही जशी श्रद्धास्थान आहेत, त्याचबरोबर इथल्या सर्व समुदायांना जोडणारे, माणसाच्या जीवनाला अध्यात्माचा व्यापक अधिष्ठान प्राप्त करून देणारे तीर्थक्षेत्र आहे. याच पार्श्वभूमीवर केदारनाथ पुनर्विकास प्रकल्पासाठी २०० कोटींहून अधिक रक्कम सरकारच्या माध्यमातून खर्च करण्यात आली. प्रशाद या योजनेंतर्गत सांस्कृतिक स्थळांचा विकास करण्यासाठी १ हजार, ९०० कोटींची गुंतवणूक आजतागायत झाली आहे. संस्कृती म्हणजे केवळ आचार, विचार, पेहराव, सण-समारंभ इतयाच गोष्टींपुरते मर्यादित नसून व्यक्तीच्या जीवनामध्ये संस्कृतीचे असलेले अविभाज्य स्थान यामुळे अधोरेखित झाले.

संस्कृती ही कुठल्याही राष्ट्रासाठी जीवनवाहिनी असते. भारतासारखा विशाल देशसुद्धा याला अपवाद नाही. भारतावर अनेक शतकं वेगवेगळ्या आक्रमणकर्त्यांनी राज्य केले. राजकीय आणि सामाजिक सत्तेबरोबरच, सांस्कृतिक वर्चस्ववादसुद्धा भारतावर लादला गेला. मंदिरे तोडण्यापासून ते अभिजात कलाकृती चोरण्यापर्यंत अनेक शतकांचे नुकसान भारताला सोसावे लागले. देश स्वतंत्र झाल्यावर स्वकीयांची सत्ता असतानासुद्धा, भारत या मानसिक गुलामगिरीच्या अवस्थेतून पूर्णपणे बाहेर पडला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात याच गुलाम मानसिकतेला मूठमाती देत, राष्ट्रीयत्वाचा नवा विचार जनमानसांमध्ये रुजवण्यात आला. राजपथाचे नाव कर्तव्यपथ करणे असो किंवा पंतप्रधानांनी स्वतःला प्रधान सेवक म्हणून घेणे असो, हे केवळ शब्दबदल नसून, त्या त्या नावामागच्या प्रतिमा समजून घेणे, त्यांच्यावरची वसाहतवादी पुटं बाजूला सारणे हा यामागचा वेगळा विचार आहे. आक्रमणकर्ते वसाहतवादी शक्तींनी भारताच्या अनेक कलाकृतींची लयलूट केली. काही अपप्रवृत्तींनी काळ्या बाजारात या कलाकृती विकल्या. मात्र आता, सातासमुद्रापार असलेल्या या कलाकृती आपल्या मायदेशी परतत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एकूण ६४२ कलाकृती अधिकृतरित्या भारतात आणल्या गेल्या. अर्थात ही केवळ सुरुवात आहे. जगाच्या पाठीवर असलेल्या अशा अनेक कलाकृती येणार्या काळात आपल्या मायदेशी परतणार आहेत.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पंतप्रधानांनी ङ्गहर घर तिरंगाफसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून एक वेगळेच राष्ट्रचैतन्य तेवत ठेवले. विविधतेने नटलेला हा देश, जो भौगोलिकदृष्ट्यासुद्धा अत्यंत विस्तृत आहे, अशा देशाला जोडण्यासाठी राष्ट्रविचारांचा एक पक्का धागा लागतो, ज्याच्या माध्यमातून लोक एकत्र येतील. या अभियानांतर्गत, अशाच एक भारत, श्रेष्ठ भारताची परंपरा आपल्याला अनुभवायला मिळाली.

अमृत काळाचा हा वारसा जपत पुढे जात असताना, एक राष्ट्र म्हणून आपल्या संस्कृतीचे संचित, एक भारतीय म्हणून जगाच्या हितासाठी झटणारा समाज अशा वेगवेगळ्या भूमिकेतून भारत प्रगतिपथावर वाटचाल करतो आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सांस्कृतिक पुनरुत्थनाचे हे सुवर्णपर्व देशाला उज्ज्वल दिशा दाखवणार आहे, यात शंका नाही.
Powered By Sangraha 9.0