कर्नाटक – राजण्णांच्या हकालपट्टीनंतर समर्थकांची निदर्शने - मतचोरीच्या राहुल गांधींच्या दाव्यावर घेतली होती शंका

14 Aug 2025 13:39:26

नवी दिल्ली,  काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या दाव्यास छेद दिल्याने मंत्रिपद गमवावे लागलेले कर्नाटक काँग्रेसचे नेते के. एन. राजण्णा यांच्या समर्थकांनी बुधवारी निदर्शने केली.

कर्नाटक सरकारमधून सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांना पदावरून हटवल्यानंतर बुधवारी त्यांच्या समर्थकांनी तुमकुरू शहरातील टाउन हॉल सर्कल येथे जोरदार निषेध आंदोलन केले. आंदोलकांनी हातात बॅनर व राजन्ना यांचे छायाचित्र घेत घोषणाबाजी केली.

राजण्णा यांनी आपल्या हकालपट्टीवर प्रतिक्रिया देताना मंत्रिपदावरून काढण्यामागे निर्णयामागे “मोठे षड्यंत्र” असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितले की, मतदार यादीतील अनियमिततेवर आपण बोललो, मात्र आपल्या माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. “मतांची चोरी” या संदर्भातील आपले विधान हे सत्यावर आधारित होते, मात्र त्याचा विपर्यास करण्यात आला, असे ते म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना राजण्णा यांनी काँग्रेस नेतृत्वावर थेट टीका केली होती. त्यांनी, “मतदार यादी कधी तयार झाली? ती आमचेच सरकार असताना तयार झाली. त्या वेळी सर्वजण डोळे मिटून बसले होते का? या अनियमितता झाल्या, हे सत्य आहे, त्यात खोटे काहीच नाही. पक्षातील नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि योग्य वेळी हरकत घेतली नाही,” असे म्हटले होते.

मतदारयादी घोळाच्या मुद्द्यावर त्यांनी केलेल्या टिप्पण्यांमुळे काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेशी विसंगती निर्माण झाली होती. विरोधकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि काँग्रेसवर आक्रमक टीका केली होती. परिणामी, काँग्रेसने त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली होती.
Powered By Sangraha 9.0