दु:साहस केल्यास ‘वेदनादायी परिणाम’ भोगावे लागतील - भारताचा पाकिस्तानला इशारा

14 Aug 2025 19:55:20

नवी दिल्ली, पाकिस्तानने आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवावे आणि भारताविरोधात कोणतेही दु:साहस करण्याचा विचार केल्यास त्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’प्रमाणेच ‘वेदनादायी परिणाम’ भोगावे लागतील, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने पाकला दिला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी साप्ताहिक पत्रकारपरिषदेत पाकचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, पाक नेतृत्वाकडून भारताविरोधात सतत बेजबाबदार युद्धजन्य वक्तव्ये आणि द्वेषपूर्ण भाष्ये होत आहेत. पाक नेतृत्वाने आपली वाणी संयमित ठेवावी, अन्यथा कोणतेही दु:साहस केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील. पाकने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये याचा अनुभव घेतला आहे, असेही जयस्वाल यांनी म्हटले आहे.

पाक नेतृत्व आपले अपयश लपवण्यासाठी वेळोवेळी भारतविरोधी वातावरण पेटवत असते. अण्वस्त्रांच्या धमक्या देणे हे पाकिस्तानचे जुने धोरण आहे. अशा वक्तव्यामुळे पाकचा बेजबाबदारपणा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर स्पष्ट आहे. लष्कर दहशतवादी गटांशी हातमिळवणी करून काम करणाऱ्या देशात अण्वस्त्र नियंत्रणाची विश्वासार्हता कितपत असेल, हे जगाने पाहावे; असेही जयस्वाल यांनी म्हटले आहे.


Powered By Sangraha 9.0