मंत्र मातृका पुष्पमाला स्तोत्र (भाग ६)

14 Aug 2025 12:48:20

श्लोक क्रमांक १०

लक्ष्मीमुज्ज्वलयामि रत्ननिवहोद्भास्वत्तरे मन्दिरे
मालरूपविलम्बितैर्मणिमयस्तम्भेषु संभावितैः|
चित्रैर्हाटकपुत्रिकाकरधृतैर्गव्यैर्घृतैर्वधिर्तै
-र्दिव्यैर्दीपगणैर्धिया गिरिसुते संतुष्टये कल्पताम्॥


या श्लोकात आदि शंकराचार्य देवीच्या महालात मानसपूजेच्या माध्यमातून दीपार्चन पूजा अर्पण करत आहेत. आचार्य म्हणतात, हे गिरिसुते! (पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती!) तुझ्या दिव्य महालात असंख्य रत्नजडित स्तंभ आहेत. त्या रत्नसमूहांच्या कांतीमुळे संपूर्ण महाल झळाळून निघत आहे. त्या स्तंभांवर मौल्यवान दिवे लटकावलेले आहेत, जणू काही तेजोमय पुष्पहारच आणि ते रत्नांच्या तेजाला अधिकच देदीप्यमान करतात. सुवर्णमूर्ती असलेल्या अप्रतिम स्त्रिया, आपल्या हातात दिवे धरून उभ्या आहेत. त्या दिव्यांमध्ये गायीच्या तुपाचे पवित्र तेज प्रज्वलित आहे. या सर्व दिव्यांच्या रांगा, त्यांचा प्रकाश आणि रत्नांवरील त्याचे प्रतिबिंब मिळून, तुझ्या संपूर्ण निवासाला तेजाने परिपूर्ण करतात. मी मनोभावे त्या दिव्यांना प्रज्वलित करत असून, या मानसिक दीपार्पणाचे फळ तुझ्या आनंदरूपी कृपेसाठी अर्पण करत आहे.

या श्लोकात काही अत्यंत वेगळ्या पद्धतीने, आचार्य आपल्या मनीचा भाव प्रकट करत आहेत. या श्लोकातील ‘मालरूपविलम्बितैर्मणिमयस्तम्भेषु’ या पदाने दिव्यांचे हार जणू दोन दोन रत्नस्तंभांना बांधले आहेत, अशी प्रतिमा उभी राहते. हे दिवे लावल्यावर त्यांचा प्रकाश रत्नांत प्रतिबिंबित होऊन, संपूर्ण महाल देदीप्यमान करत असल्याचा भाव यातून प्रकट होतो. ‘चित्रैर्हाटकपुत्रिकाकरधृतैः’ म्हणजे सुवर्णमूर्ती (हाटकपुत्रिका). स्त्रिया आपल्या हातात दिवे घेऊन त्या प्रकाशोत्सवात सहभागी आहेत. ‘गव्यैर्घृतैः’ अर्थात गायीच्या तुपाने लावलेले दिवे हे शुद्धता, पवित्रता आणि मंगलतेचे प्रतीक आहेत.

शास्त्रानुसार, गो उत्पादने (दूध, दही, तूप, गोमूत्र, गोमय) हे पवित्र मानली जातात. दीपार्पण हे पूजेतले महत्त्वाचे अंग असून, केवळ प्रकाश देणेच नव्हे तर, अंधकार नष्ट करणे, अंतःकरणातील अज्ञान दूर करण्याचा तो एक आध्यात्मिक संकेत आहे.

आचार्य या श्लोकात आपल्या मनःकल्पनेत त्या दिव्यांचा प्रकाश उभा करत असून, ही मानसिक अर्पणभावना प्रत्यक्ष क्रियेपेक्षाही अधिक प्रभावी ठरते. केवळ याच श्लोकात नाही, तर संपूर्ण स्तोत्रावलीमध्ये समस्त जगताची तूच स्वामिनी आहेस आणि मी करत असलेली मानसपूजा ही, ज्योतीने तेजाची आरती या स्वरूपाची आळवणी आहे हा भाव विद्यमान आहे. श्री ललितादेवीच प्रकाश-विमर्श-महामाया-स्वरूपिणी असून, प्रकाश आणि त्याचे प्रतिबिंब या दोन्ही रूपांनी विश्वाला व्यापणारी श्री ललितांबिकाही तीच आहे, हाच भाव यातून प्रकट होतो.

कठोपनिषदात याचा फार अनुपम उल्लेख केला गेला आहे. (खख.ळळ.१५) ब्रह्माच्या उपस्थितीत सूर्य, चंद्र, तारे, वीज वा अग्नी काहीच चमकत नाही. ब्रह्म जेव्हा तेज देते, तेव्हाच बाकी सर्व प्रकाशित होते. त्याच्या तेजानेच हे सर्व उजळते. आचार्यांच्या या चिंतनात त्याच्या आध्यात्मिक उंचीचे दर्शन घडते. त्यांचे प्रत्येक अर्पण केवळ देवीच्या आनंदासाठी आहे.


श्लोक क्रमांक ११

ह्रींकारेश्वरि तप्तहाटककृतैः स्थालीसहस्रैर्भृतं
दिव्यान्नं घृतसूपशाकभरितं चित्रान्नभेदं तथा|
दुग्धान्नं मधुशर्करादधियुतं माणियपात्रे स्थितं
माषापूपसहस्रं अम्ब सफलं नैवेध्यमावेदये॥


या श्लोकात आदि शंकराचार्य, देवीच्या चरणी षड्रसयुक्त प्रसाद अर्पण करत आहेत. आचार्य म्हणतात, हे ह्रींकारस्वरूपिणी ईश्वरी! तुझे ह्रींकारस्वरूप हे शिवाशी सामरस्यरूप आहे. तुझ्या या रूपाचा महिमा शब्दांत मांडणे शय नाही. तुझ्यासाठी मी हजारो सोन्याच्या भांड्यांमध्ये भरलेले दिव्य भोजन अर्पण करत आहे. या भांड्यांमध्ये तुपाने सुगंधित केलेला भात, रुचकर सूप, ताज्या भाज्यांचे शाक, आणि विविध प्रकारचे चित्रान्न, लिंबूभात, दधिभात, नारळभात, गोड भात, मसालेभात असे सर्व प्रकारचे रुचकर अन्नपदार्थ आहेत.

तसेच, माणियरत्नांच्या कलशात ठेवलेली दुधात शिजवलेली गोड खीर, ज्यात मध, साखर आणि दही मिसळले आहे, हे विशेष नैवेद्य तुझ्या चरणी अर्पण करतो. हजारो ‘माषापूप’ अर्थात उडीद डाळीपासून तयार केलेले सोनसळी तळलेले वडे आणि सोबत ताज्या फळांचा भरगच्च साठा, हे सर्व तुला प्रेमाने अर्पण करत आहे.

नैवेद्य हे पूजाविधीतील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. हे केवळ अन्नाचे अर्पण नसून, देवत्वाला माझी अर्पणभावना याचे प्रतीक आहे. इथे ‘तप्तहाटक’ म्हणजे शुद्ध सोन्याचे पात्र हे भौतिक संपन्नतेचे नव्हे, तर साधकाच्या अंतःकरणातील निर्मळतेचे प्रतीक आहे. चित्रान्नभेद म्हणजे विविध रंग, स्वाद आणि गंध असलेले भातपदार्थ हे विश्वातील विविधता दर्शवतात, जी देवीचीच लीला आहे. दुग्धान्न हे मातृभाव व पोषणाचे प्रतीक आहे. दूध, मध, दही, साखर हे चारही पदार्थ, सत्त्वगुण वाढवणारे आणि शुद्धीकरण करणारे आहेत. ‘माणियपात्र’ म्हणजे विशुद्ध प्रेम. साधक आपले हृदयच माणियरत्नाप्रमाणे देवीसमोर ठेवतो. माषापूप हे उत्सवप्रसंगी अर्पण केले जाणारे पौष्टिक अन्न आहे.

या श्लोकात आचार्य प्रत्यक्ष अन्नप्रसाद देत नसून, मनोमय नैवेद्य अर्पण करतात. त्यांच्या कल्पनेत सोन्याचे भांडे, रत्नजडित पात्रे, असंख्य पक्वान्ने आहेत. या कल्पनाशक्तीमुळे त्यांचे अंतःकरण देवीच्या स्मरणात पूर्णपणे रंगते. देवीला अर्पण केलेले हे अन्न प्रत्यक्ष तिच्यासाठी नसून, साधकाच्या अंतःकरणातील अर्पणभावना तिच्या चरणी पोहोचते. शास्त्र म्हणते की, देवाला काय अर्पण केले, त्यापेक्षा कोणत्या भावनेने अर्पण केले हे महत्त्वाचे आहे. श्री ललितादेवी जगताची स्वामिनी आहे, या सर्व अन्नघटकांना निर्माण करणारी तीच आहे आणि आचार्य ‘जे तुझे, ते तुलाच’ या भावातून हा नैवेद्य अर्पण करत आहेत.

श्लोक क्रमांक १२

गच्छायैः वरकेतकीदलरुचाताम्बूलवल्लीदलैः
पूगैः भूरिगुणैः सुगन्धिमधुरैः कर्पूरखण्डोज्ज्वलैः|
मुक्ताचूर्णविराजितैः बहुविधैर्वक्त्रांबुजामोदनैः
पूर्णा रत्नकलाचिका तव मुदे न्यस्ता पुरस्तादुमे॥


आचार्यांनी उत्तमोत्तम भोजनानंतर देवीच्या चरणी सुगंधित विडा अर्पण केला आहे. आचार्य म्हणतात, हे उमे! मी तुझ्यासाठी रत्नजडित सुंदर डबी (कलाचिका) भरून, हिरव्या ताज्या तांबूल वेलीची पाने, सुवासिक केतकी दलांची कांती, सुगंधी व गोड चवीची सुपारी, लहान लहान चमकदार कपूरखडे, मोत्याच्या बारीक चूर्णाने सजविलेले आणि मुखकमलाला सुगंध व ताजेपणा देणारे अनेक प्रकारचे पदार्थ असे तांबूल अर्पण करत आहे. हे सर्व तुझ्या आनंदासाठी तुझ्या समोर ठेवले आहे.

तांबूल अर्पण ही पूजा व उपासनेतील अंतिम व पवित्र क्रिया मानली जाते. देवतेस भोजन, नैवेद्य, सुवासिक द्रव्ये अर्पण केल्यानंतर तिला तांबूल देणे, म्हणजे आदर आणि सत्काराचा सर्वोच्च आणि अंतिम टप्पा गाठणे आहे. तांबूल हे पान+सुपारी+चुना+सुगंधद्रव्ये यांच्या एकत्रीकरणातून बनवले जाते. तांबूल हे केवळ मुखशुद्धी नाही, तर त्याच्या सेवनाने शारीरिक ताजेतवानेपणा जाणवतो, पचनशक्ती वाढते आणि याच्या सेवनाने प्रसन्न वाटते. केतकी अर्थात नागवेलीची पाने, ही देवपूजेत अर्पण केली जाणारी सुवासिक वनस्पती आहे. तिची पाने व पुष्प देवतेच्या सत्कारासाठी वापरणे, हे आपल्याकडे वैदिक काळापासून प्रचलित आहे. कर्पूर शुद्धता व थंडावा दर्शवितो, मोत्याचे चूर्ण हे ऐश्वर्याचे प्रतीक आहे. इथे आचार्यांनी अर्पण केलेले तांबूल हे प्रत्यक्ष पान-सुपारी नसून, यांच्या माध्यमातून आचार्य आपल्या गुणांचेच अर्पण देवीच्या चरणी करत आहेत. (क्रमशः)


सुजीत भोगले
९३७००४३९०१

Powered By Sangraha 9.0