धरालीनंतर जम्मू - काश्मीरच्या किश्तवाडमध्ये निसर्गाचा कोप! ढगफुटी होऊन आलेल्या पूरात ३३ जणांचा मृत्यू

14 Aug 2025 17:03:06


श्रीनगर : (Jammu Kashmir Cloudburst) काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडच्या धराली येथे ढगफुटी होऊन खीरगंगा नदीला पूर आल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. अशातच आता जम्मू आणि काश्मीरलाही ढगफुटीचा तडाखा बसल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड येथे ढगफुटी होऊन भीषण पूर आल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, किश्तवाड जिल्ह्यातील मचैल मट्टा यात्रा मार्गावरील चुशोती भागात ढगफुटी झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले, की प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले असून बचाव पथके घटनास्थळाकडे रवाना झाली आहेत. या घटनेनंतर नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान या दुर्घटनेत ३३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी किश्तवाडचे डीसी पंकज कुमार शर्मा यांच्याशी, तसेच त्यांनी स्थानिक आमदार आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते सुनील कुमार शर्मा यांच्याशी देखील याबद्दल चर्चा केल्याचे सांगितले. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, ढगफुटीनंतर या प्रभावित क्षेत्रामध्ये साधारण २०० ते ३०० नागरिक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.







Powered By Sangraha 9.0