मुंबई : (Dadar Kabutar Khana) मुंबईतील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ बुधवारी १३ ऑगस्ट रोजी मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली होती. दरम्यान, या आधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटीसा देण्यात आल्या. बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली होती. आंदोलकांना पाहताच पोलिसांनी तातडीने त्यांची धरपकड सुरू केली. पोलिसांनी आणीबाणीचा काळ आणू नये, असे आंदोलकांनी म्हटले.
कबुतरखान्याचा प्रश्न हा धार्मिक नाही, समाजाच्या आरोग्याचा प्रश्न आहे. शस्त्र उचलण्याची भाषा मराठी माणसाला कोणी सांगू नये, असेही यावेळी आंदोलकांनी म्हटले. मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाला अटकाव का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. काही दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनात आंदोलकांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले. ते पोलिसांच्या अंगावर धावून गेले, ताडपत्री-शेडची मोडतोड केली, त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्न समितीच्या आंदोलकांनी उपस्थित केला.
आणीबाणीचा काळ आणू नये
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोवर्धन देशमुख हे इथे पोहोचल्यानंतर लगेचच त्यांना पोलिसांनी घेराव घातला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी गोवर्धन देशमुख यांनी “पोलिसांनी आम्हाला आमची भूमिका मांडू द्यावी, आम्ही फक्त आमचं म्हणणं मांडायला आलो आहोत. आम्ही फक्त पोलिसांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत", असे गोवर्धन देशमुख म्हणाले. "पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये. त्यांनी ही दडपशाही थांबवावी, तसेच आणीबाणीचा काळ आणू नये”, असेही गोवर्धन देशमुख यांनी सांगितले.
यावेळी काही आंदोलकांना पोलिसांना ताब्यात घेतल्याने वाद चिघळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी मराठी एकीकरण समितीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. तर, दुकाने बंद ठेवण्याची सूचना केली होती. मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते.