लाडक्या बहिणींकडून एसटीला विक्रमी उत्पन्न चार दिवसीय १३७ कोटीची ओवाळणी ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

12 Aug 2025 20:43:36

मुंबई, यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये एसटीमधून महामंडळाला १३७.३७ कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी ) या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामी गेली कित्येक वर्ष रक्षाबंधनच्या सणाच्या कालावधी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.

रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवार,दि.६ रोजी ३०.०६ कोटी रुपये, शनिवार,दि.७ रोजी म्हणजेच रक्षाबंधन दिवशी म्हणजे शनिवारी ३४.८६ कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार,दि.१० रोजी ३३.३६ कोटी रुपये तर सोमवार,दि.११ रोजी तब्बल ३९.९ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ८-११ ऑगस्ट या ४ दिवसात १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ८८ लाख आहे. रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी आभार मानले आहेत. तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करुन विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
Powered By Sangraha 9.0