मुंबई : (Maharashtra Police Bharati) महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत तब्बल १५ हजार पोलिस पदांच्या भरतीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक महिने थांबलेल्या भरती प्रक्रियेला वेग येणार असून, पोलिस दलाला ताज्या दमाचे मनुष्यबळ मिळणार आहे. राज्यातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा अखेर संपली आहे.
राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी सुरू होण्याची अपेक्षा होती, मात्र प्रशासकीय कारणांमुळे ती लांबणीवर गेली. यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीला मंजुरी मिळाल्यामुळे आता लवकरच भरती जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती आहे. यामुळे राज्यातील अनेक युवकांना त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मोठा संधी मिळणार असून, पोलीस दलाला नवीन ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या भरतीद्वारे राज्यातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील तसेच शहरातील हजारो उमेदवार पोलीस दलात सामील होण्यासाठी सज्ज आहेत. महायुती सरकारने राज्यातील सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी ही मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.