धारावीत घरोघरी सर्व्हेक्षण थांबले कागदपत्रे थेट कार्यालयात सादर करावी लागणार

12 Aug 2025 20:48:02

मुंबई, धारावीत घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या 'डोअर टू डोअर' सर्वेक्षणाचा काल मंगळवार,दि.१२ ऑगस्ट हा अखेरचा दिवस होता. मात्र, ज्या धारावीकरणी अद्याप सर्व्हेक्षण केले नाही मात्र आता सर्व्हेक्षणात सहभागी व्हायचे आहे अशा धारावीकरण डीआरपीने जारी केलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधायचा आहे किंवा कागदपत्रांसह धारावीतील डीआरपी/एनएमडीपीएल कार्यालयाला भेट देता येईल, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, 'डोअर टू डोअर' सर्वेक्षण १२ ऑगस्टला संपणार असल्याची माहिती जुलै महिन्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी)वतीने जारी करण्यात आली होती. पोस्टर्स आणि प्रसिद्धीमाध्यमांद्वारे सर्वेक्षणाच्या अंतिम मुदतीबाबत स्थानिकांना अवगत करण्यात आले होते. मात्र, डोअर टू डोअर सर्वेक्षणाची मुदत संपली असली तरी स्थानिकांना अद्यापही पुनर्विकासात सामील होण्याची संधी उपलब्ध आहे. या सर्वेक्षण यादीत स्वतःचे नाव नोंदविण्यासाठी स्थानिकांना डीआरपी हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल अथवा आवश्यक कागदपत्रांसह धारावीतील डीआरपी/एनएमडीपीएल कार्यालयाला भेट देता येईल. धारावीतील ज्या ठिकाणी पूर्वी डोअर टू डोअर सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशा ठिकाणी नव्याने डोअर टू डोअर सर्वेक्षण होणार नसल्याचे डीआरपीने स्पष्ट केले आहे.

सर्वेक्षणात सहभागी होण्याची संधी गमावलेल्या स्थानिकांबाबत पुनर्विचार जरूर करण्यात येईल. मात्र, त्यासाठी परिशिष्ट २ प्रसिद्ध झाल्यानंतर सदनिकाधारकाला सर्वेक्षणात सामील करून घेण्याच्या विनंतीचा अर्ज दाखल करावा लागेल. धारावी पुनर्विकास प्रकल्पात 'प्रत्येकाला घर' हे धोरण राबविले जाणार असून हक्काच्या घरासोबतच स्थानिकांना रोजगाराची हमी देण्यासाठी डीआरपी कटिबद्ध आहे, असेही डीआरपीने स्पष्ट केले आहे.

अद्याप ८७,५०० हून अधिक सदनिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून १ लाखाहून अधिक सदनिकांवर सर्वेक्षण क्रमांक टाकण्यात आला आहे. कोणत्याही कारणाने अद्याप सर्वेक्षणात सहभागी न होऊ शकलेल्या धारावीकरांनी त्यांच्या सदनिकेवर क्रमांक टाकण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी त्वरित पुढाकर घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना पुनर्विकासाचा लाभ घेता येईल, असे आवाहन डीआरपीए केले आहे.
Powered By Sangraha 9.0