मुंबई : "भारतीय कला-संस्कृतीची जी ताकद आहे ती आपण विसरत चाललो आहोत. त्यासाठी सांस्कृतिक आणि शैक्षणिक उत्थानाची गरज आहे", असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. जयपूरच्या पाथेय कण संस्थानमध्ये आयोजित ‘राष्ट्रोत्त्थान’ ग्रंथाचा प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधत ते म्हणाले, 'बनेंगे हिंद के योगी, धरेंगे ध्यान भारत का' या गीताप्रमाणे सर्व स्वयंसेवकांच्या मनात तोच भाव कायम असतो. अनेकदा असे म्हटले जायचे की, आपण प्रसिद्धीपासून दूर राहतो. ज्याचे आपण आपण वर्षानुवर्षे पालनही केले. स्वयंसेवकांना जिथे-जिथे राष्ट्रसेवेची संधी मिळाली, कार्य लहान असो वा मोठे, त्यांनी ते प्रामाणिकपणे केले. आज देश जो विकास पाहत आहे, त्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
त्यांनी सांगितले की, स्वयंसेवकांची हीच प्रामाणिकता होती की पंडित नेहरूंनी १९६३ मध्ये संचलनासाठी आमंत्रित केले. १९६५ मध्ये शास्त्रीजींनीही जिथे गरज भासली, तिथे संघाच्या स्वयंसेवकांचा राष्ट्रासाठी उपयोग केला. भारताची ताकद जगभर वाढत आहे, आपण म्हणतो ताकद वाढवायची आहे, पण ही ताकद कोणाला घाबरवण्यासाठी किंवा धमकावण्यासाठी नव्हे, तर स्वसंरक्षणासाठी वाढवायची आहे.
हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे म्हणाले की, संघाने शताब्दी वर्षात स्वबोध, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरिक कर्तव्य आणि पर्यावरण या पाच क्षेत्रांमध्ये काम करण्याचा संकल्प केला आहे. संविधानाची कमी जाण असल्यामुळे सर्व लोक अधिकारांचीच चर्चा करतात, पण आपला विचार अधिकारांसोबत कर्तव्यांचीही चर्चा करणारा आहे. समाजात कर्तव्याचे जागरण करण्याची गरज आहे, त्यासाठी नागरिक कर्तव्यांचे पालन आवश्यक आहे.