दिघी आणि काशीद रो रो सेवा मार्चपर्यंत कार्यान्वित करा - मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

Total Views |

मुंबई, मुंबईकरांचा कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर करणारी मुंबई दिघी आणि मुंबई काशीद ही रो रो सेवा मार्च अखेर पर्यंत कार्यान्वित करावी अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार,दि.१२ रोजी दिल्या. मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी मंत्री राणे यांनी या सूचना दिल्या. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दिघी आणि काशीद या दोन्ही ठिकाणच्या जेटीच्या कामांना गती देण्याच्या सूचना देऊन मंत्री राणे म्हणाले की, मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रो रो सेवा हा एक उत्तम पर्याय असणार आहे. या सेवेमुळे वेळेची ही बचत होणार आहे. त्यामुळे या योजनेच्या कामांना गती द्यावी. जेटीचे काम सुरू असताना इतर परवानग्यांचे प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी. मार्च अखेर पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करावीत.

दरम्यान यावेळी आमदार महेश बालदी यांच्या उपस्थिती मच्छीमार नौकाना द्यावयाच्या डिझेल परतावा या विषयी बैठक झाली. यावेळी एकही पात्र मच्छीमार नौका डिझेल परतावा पासून वंचित राहणार नाही असे मंत्री राणे यांनी सांगितले. तसेच मच्छीमार संस्थानी त्यांच्या बोटी मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी उपलब्ध करून द्याव्यात. या विषयी मच्छीमारांना समाधानकारक निर्णय घ्यावा, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या. तसेच अलिबाग येथील जातीचे काम दिवाळी पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.