राज्यातील सर्व मशिदींवर सन्मानाने तिरंगा फडकवा छत्तीसगड वक्फ बोर्डाचे निर्देश

12 Aug 2025 21:01:53

मुंबई : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. अशातच छत्तीसगड वक्फ बोर्डाने जारी केलेल्या निर्देशाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. छत्तीसगड वक्फ बोर्डाने राज्यातील सर्व मशिदी, दरगाह आणि मदरशांमध्ये १५ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवणे आणि राष्ट्रगीत गाण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय राष्ट्रीय एकता आणि बंधुता वाढवण्यासाठी घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

वक्फ बोर्डाने दिलेल्या पत्रामध्ये सर्वांना आपला राष्ट्रध्वज सन्मानाने फडकवण्याचे आवाहन केले आहे. बोर्डाचे अध्यक्ष डॉ. सलीम राज यांनी या उपक्रमाला राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हटलेय. त्यांनी सांगितले की, हा निर्णय देशातील एकता आणि बंधुता बळकट करण्यासाठी घेण्यात आला आहे. आपला देश सूफी संतांचा देश आहे, जिथे गंगा-जमुनी तहजीबीनुसार सर्व धर्मांचे लोक एकत्र नांदतात. इस्लाम मातृभूमीवर प्रेम करायला शिकवतो आणि तिरंगा फडकवणे हे देशप्रेम आणि कर्तव्यभावनेचे प्रतीक आहे.

या निर्णयाच्या विरोधात असणारे लोक देशद्रोही आहेत आणि अशा लोकांना देशात राहण्याचा अधिकार नसावा, असे स्पष्ट मत डॉ. सलीम राज यांनी व्यक्त केले आहे.
Powered By Sangraha 9.0