सुटबुटवाला लादेन म्हणजे असीम मुनीर - पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याची टिका

12 Aug 2025 17:48:59

नवी दिल्ली, असीम मुनीर म्हणजे सुटबुट ओसामा बिन लादेन आहे अशी तीव्र टीका अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे माजी विश्लेषक मायकेल रुबिन यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांवर केली आहे.

फ्लोरिडातील टॅम्पा येथे अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीदरम्यान मुनीर यांनी, “जर पाकिस्तान कोसळला, तर तो जगाचा अर्धा भाग घेऊन जाईल,” असे वक्तव्य केले होते. त्यावर मायकेल रुबिन म्हणाले, ही भाषा आम्ही यापूर्वी केवळ आयसिस किंवा ओसामा बिन लादेन यांच्याकडून ऐकली होती. पाकिस्तान राज्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याच्या स्थितीत आहे का, याबाबत गंभीर शंका निर्माण होते.रुबिन यांनी अमेरिकेला तातडीने पावले उचलण्याचा सल्ला दिला. यात पाकिस्तानचा ‘नॉन-नाटो प्रमुख सहयोगी’ दर्जा रद्द करणे, त्याला ‘दहशतवाद प्रायोजक देश’ घोषित करणे, तसेच जनरल मुनीर यांना ‘पर्सोना नॉन ग्राटा’ ठरवून अमेरिकन व्हिसा बंदी घालण्याचा समावेश आहे. त्यांनी असेही म्हटले की, अशा वक्तव्यांनंतर मुनीर यांना त्वरित बैठकीतून बाहेर काढून अमेरिकेबाहेर पाठवायला हवे होते.

याशिवाय, रुबिन यांनी पाकिस्तानच्या अणु धमक्यांमुळे दहशतवादी गटांना स्वतंत्रपणे अण्वस्त्रांचा गैरवापर करण्याची शक्यता वाढू शकते, असा इशाराही दिला. त्यांनी पाकिस्तानच्या ‘व्यवस्थापित अधोगती’चा विचार करण्याची, बळुचिस्तानसारख्या फुटीर प्रदेशांना मान्यता देण्याची आणि भविष्यात अण्वस्त्रे सुरक्षित करण्यासाठी लष्करी कारवाई करण्याचीही सूचना केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका-भारत संबंधांतील सध्याचा तणाव हा केवळ तात्पुरता असून तो दीर्घकालीन भागीदारीसाठी ‘स्ट्रेस टेस्ट’ ठरेल.
Powered By Sangraha 9.0