लातूरचे व्यंकटेश गायकवाड हे नुकतेच ‘संघ लोकसेवा आयोग केंद्रीय सशस्त्र पोलीस दला’ची परीक्षा ३९व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...सगळ्या नकारात्मक परिस्थितीवर मात करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करणार्याही काही व्यक्ती या जगात आहेत. त्या व्यक्ती स्वप्न पाहतात, स्वप्न जगतात आणि स्वप्न जिंकतातही. अशा स्वप्न जिंकणार्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व करणारे लातूर निलंग्याचे व्यंकटेश गायकवाड. ते ‘संघ लोकसेवा आयोग केंद्रीय सशस्त्र पोलीस दल’ (लरषि रीीळीींरपीं लेाापवरपीं) याची परीक्षा ३९व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तो दिवस त्यांच्यासाठी, त्यांच्या सात पिढ्यांसाठी, तसेच त्यांच्या समाजासाठी सोन्याचा दिवस होता. कारण, त्यांनी मिळवलेले यश हे सहजसोपे नव्हते. हे यश मिळवण्याआधीची व्यंकटेश यांच्या जीवनाची स्थिती,
रत्ती-रत्ती सच्ची मैंने जान गवाई हैं
गिन-गिन तारे मैंने उंगली जलाई हैंअशी काहीशी होती. अर्थात, आयुष्यात अथांग संघर्षाची, दुःखाच्या परिसीमेची कथाव्यथा होती. माझं नशीबच नाही, मला संधीच नाही, त्यामुळे जे आहे त्यात रडत-कुडत जगत राहीन. ते किड्यामुंगीचेच जगणे असेल, तरी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न काय, विचारही करणार नाही, अशा लोकांची जगात कमी नाही. नव्हे अशाप्रकारे रडगाणं गाणार्यांनी जग भरलेले आहे की काय, अशीच शंका आहे. त्या पार्श्वभूमीवर व्यंकटेश गायकवाड यांचे यश निर्विवाद प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेतला असता जाणवते, ‘कोशिश करने वालो की हार नहीं होती!’
निलंगा, लातूर येथील प्रकाश आणि कांताबाई हे दाम्पत्य अत्यंत कष्टाळू. मातंग समाजाच्या पारंपरिक धर्मयुक्त श्रद्धांनुसार जीवन जगणारे हे गायकवाड कुटुंब. दोघे विटभट्टीवर मजुरी करायचे. भरपूर मेहनत करायचे. मजुरी मिळाली, त्यात चूल पेटली की, झाला या कुटुंबाचा दिन साजरा! त्यांचे सुपुत्र व्यंकटेश. भाकरीच्या चंद्रासाठी आयुष्य झिजवल्यामुळे या कुटुंबाला आणि परिसरातील सगळ्यांनाच चूल आणि भाकरी यापलीकडील स्वप्नच नव्हते. पण, याही परिस्थितीमध्ये गायकवाड दाम्पत्यांची इच्छा होती की, त्यांच्या मुलांनी शिकावे. गायकवाड दाम्पत्य मरमर कष्ट करायचे. मात्र, व्यंकटेश यांना सांगायचे, "तू आमच्या कष्टाची चिंता करू नकोस, तुला शिकायलाच हवे.” शिकायचे कशासाठी? तर सगळ्या दैन्य- दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी. आईवडिलांचे कष्ट पाहून व्यंकटेश यांनाही वाटे की, आपण शिकायलाच हवे. ही परिस्थिती बदलायला हवी. तसेच, सगळे सोंग आणता येतात, मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळेच शिक्षणासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न होता. गरिबीसोबत येणार्या सगळ्या विदारक अनुभवांची जत्राच होती. मात्र, या सगळ्या खडतर वेळी व्यंकटेश यांनी उच्च शिक्षणाची आस सोडली नाही. त्यांनी दहावीनंतर महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच त्यांना वाटले की, शिकून, कष्ट करून सगळे दैन्य दूर करायचे असेल, तर ‘एमपीएससी’, ‘युपीएएसी’ची परीक्षा देऊया. त्यासाठी त्यांनी अभ्यास सुरू केला. शैक्षणिक खर्चासाठी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले. बारावीनंतर त्यांनी निर्णय घेतला की, ‘यशवंतराव मुक्त विद्यापीठा’तून उर्वरित पदवीपर्यंतचे शिक्षण घ्यायचे. त्याचसोबत संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची. हॉटेलमध्ये काम करत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. मात्र, त्यांच्या मोठ्या भावाने सांगितले की, "तू फक्त अभ्यास कर. खर्चाचे मी पाहतो!” बरं, हा भाऊसुद्धा हॉटेलमध्येच काम करायचा. त्याची आर्थिक परिस्थितीही अशीच यथातथा. पण, व्यंकटेश यांना त्यांच्या भावाने स्वप्नपूर्तीची जिद्द दिली. व्यंकटेश अभ्यास करायचे. काहींना वाटे की, हे स्वप्न वगैरे पाहणे आपले काम नाही. ही थेरं मोठ्या लोकांच्या घरची. त्यातच आर्थिक विवंचनेतून आणि सामाजिक मागासलेपणामुळे त्यांना अनेक अनुभवांचा सामना करावा लागला. पण, या सगळ्या अनुभवांना पुरून उरत, त्यांनी अभ्यास सुरू ठेवला. दुर्दैवाने संघ लोकसेवा आयोगाच्या पहिल्या परीक्षेत त्यांना यश आले नाही. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. पण, आपण संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण व्हायचेच, हे स्वप्न त्यांनी सोडले नाही. उलट दीड दिवसाची शाळा शिकणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,’ असे शिक्षणाचे महत्त्व समाजात रूजवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महामानवांच्या प्रेरणेने ते आता सगळ्या नकारात्मक गोष्टींना दुर्लक्षित करून, जोमाने अभ्यास करू लागले. शिक्षणासाठी हॉटेलमध्ये मजुरी करणारा तसेच, विटभट्टी मजूर दाम्पत्यांचा मुलगा आज संघ लोकसेवा आयोग केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची परीक्षा ३९व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन प्रशिक्षण घेत आहे. व्यंकटेश म्हणतात, "मी प्रत्येक क्षणी माझ्या देशाशी, माझ्या कामाशी प्रामाणिक राहायचे. माझ्यावर जबाबदारी असलेल्या कामामुळे भारतीय बांधवांचे कसे भले होईल, याकडे मी मुख्यतः लक्ष द्यायचे आहे.” साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील लोकनायक किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातला युवक कसा असावा, तर व्यंकटेश गायकवाड यांच्यासारखा असावा, असे वाटले तर त्यात नवल काहीच नाही. अशा व्यंकटेश यांच्या ध्येयाला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!